किल्ले आर्बीआयगड! (ढिंग टांग!)

Dhing Tang
Dhing Tang

महाराष्ट्र शक्‍तियुक्‍तिबलस्थान सह्याद्रीव्याघ्र अखिल मऱ्हाट कुलमुखत्यार प्रजाकल्याणचिंतक राजाधिराज श्रीमान उधोजीराजे ह्यांचे आदेशानुसार निवडक शिबंदी घेवोन आम्ही आरबीआयगडाकडे कूच केले. राजियांचा बोल, म्हंजे देवावरचें फूल. खाली पडतां उपेगाचे नाही. नोटाबंदीचे तुघलकी, जुलमी आणि अन्याय्य आदेशाने रयत बेहाल जहाली. खात्यात सहस्त्र होन; परंतु दांताडावर मारण्यास दिडकी नाही, ऐसी आवस्था प्राप्त जाहाली. आस्मान फाटले, सुलतानाने फटकविले...कोणाकडे पाहावे?

अखेर राजियांनी तिसरा नेत्र उघडून अंगार ओकिला. आरबीआयगडाचे दिशेने अंगुळी करोन कडाडले : पाड ती सिंहासने दुष्ट अन पालथी! नोटाबंदीचे मिषाने गोरगरीब रयतेचे पसेखिसे उल्टेपाल्टे करणाऱ्या ह्या शेटियांस काढण्या लावा. मुसक्‍या आवळा आणि हापटत धोपटत आमचे समोर रुजु करा. तोफेच्या तोंडी द्या, पोत्यात घालोन टकमक कड्यावरोन लोटून द्या. बस्स्स!! आता हद्द जाहाली. मस्तकावरोन पाणी गेले...'' 

...राजियांच्या आदेशानुसार निवडक शिबंदी जमेस धरोन चंपाषष्ठीचे मुहुर्तावर आम्ही आरबीआयगडाकडे कूच केले. अरविंदाजी सावंत, गजाजी कीर्तिकर, राहुलाजी शेवाळे, अनिलाजी देसाई आणि आम्ही!! राजियांचे खासे पांच शिलेदार!! एकेक गडी ऐसा हिरा की येकास काढावे, शंभरांस झांकावे!! असो. 

...गडाचे पायथ्यापास घोडी बांधिली आणि खरमरीत खलिता किल्लेदार पटेल ह्यांसी रवाना केला.- 'जेवत असाल तर तस्से उठोन हात धुवोन बांधोन सामोरे यावे. राजियांचे शिष्टमंडळ आले आहे. सबब साहेबकामी सेवेसी रुजू व्हावे. बदअंमल केलियास हजाराच्या नोटेप्रमाणे कस्पट व्हाल!' 

...खलिता मिळताक्षणी एक गृहस्थ गडावरोन पायउतार जाहला. 

''खासा गवर्नेर पटेल हाजिर जाहला की काय?'' अरविंदाजींनी दुर्बिणीतून बघत विचारणा केली. 

''हे म्या कसे सांगावे? दुर्बिण आपल्या हातात आहे!,'' राहुलाजी शेवाळे. 

...येवढे संभाषण होते न होते तेवढ्यात किल्लेदार सामोरा आला. 

''आपण कोण?'' गजाजी कीर्तिकरांनी करडा आवाज लावला. 

''मी गांधी!'' त्याने उत्तर दिले. गांधी आडनाव सांगतो आहे, पण नोटेवर तर ह्यांचे चित्र नाही. हे कुठले गांधी? हॅ:!! 

''मिस्टर, थापा मारू नका. गांधी पिक्‍चर आम्हीही पाहिला आहे!'' अनिलाजी देसायाने संशय व्यक्‍त केला. 

''...आणि मुन्नाभाईसुद्धा!! तुम्ही दिलीप प्रभावळकरांसारखेही दिसत नाही! गांधी म्हणे!!'' आम्ही त्यांना तडकावले. खोटेपणाचा आम्हाला भयंकर राग आहे. मागे एकदा नकली नोट आहे म्हणून आम्ही वीसाची खरी नोट फाडली होती. तीर्थरुपांनी आम्हाला उभे फाडले होते. असो. 

''मी ग...ग...गांधी...मी डेप्युटी गवर्नर आहे!'' गवर्नेराने चाचरत उत्तर दिले. 
अखेर अनिलाजींनी पुढाकार घेवोन राजियांचा आदेश फर्माविला. नोटाबंदीमुळे रयतेस अपरंपार त्रासदीस तोंड द्यावे लागत असोन नोटा पुरविण्याच्या कामी आरबीआयगडाने अक्षम्य चालढकल चालवली आहे. सबब, परिणाम चांगला होणार नाही!'' अरविंदाजी सावंतांनी सुनाविले. 

''अहो, काय करू? नोटाच नाहीत! देऊ कुठून? कितीही छापल्या तरी कमी पडताहेत! काही दिवस कळ काढा, होईल सर्व नीट हं!'' अशी त्यांनी समजूत काढण्याचा घाम पुसत प्रयत्न केला. थोडक्‍यात, गवर्नेर गांधी हे भलतेच कनवाळू आणि अहिंसक गृहस्थ निघाले; पण आमचे शिष्टमंडळ जाम ऐकेना. गवर्नेर पटेल आणि त्यांच्या जुलमी चौकडीस जेरबंद करोन आणण्याचे फर्मान असून मुकाट्याने आमचेसोबत चलावे, असे त्यास अरविंदाजींनी करड्या आवाजात फर्माविले. 

''ऐसा मत करो. कुछ तो कळ सोसो!! आपुन लोग फिलहाल ऍडजस्ट कर लेंगे! लेकिन राजासाहब के सामने मत लेके जाना. प्यार मुहब्बत में,'' गवर्नेर गांधी यांनी डायरेक्‍ट मांडवलीचीच भाषा सुरू केल्याने बोलणेच खुंटले. बराच वेळ खल झाला. पण तिढा सुटेना. 

''मंगता है तो तुमकू मैं दो-दो हजार के सुट्टे दे सकता हूं!'' गवर्नेर गांधी यांनी प्रपोजल ठेवले...आणि 

आम्ही रिझर्व ब्यांकगडाची मोहीम फत्ते करोन परतलो. जय महाराष्ट्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com