निमंत्रण! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब, यांस जीवलग मित्राचा शतप्रतिशत प्रणाम. नागपूरहून आणलेला संत्रा बर्फीचा पुडा देण्यासाठी स्वत: येणार होतो, पण घरात कार्य असल्याने गडबडीमुळे प्रत्यक्ष येता आले नाही. ती. श्री. चंदूकाका आणि मा. श्री. विनोदवीर ह्या जोडगोळीला आपल्या घरी पाठवतो आहे. संत्रा बर्फीचा पुडा त्यांच्याकडून मागून घ्यावा!! (सहजासहजी देणार नाहीत!!) असो. 

प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब, यांस जीवलग मित्राचा शतप्रतिशत प्रणाम. नागपूरहून आणलेला संत्रा बर्फीचा पुडा देण्यासाठी स्वत: येणार होतो, पण घरात कार्य असल्याने गडबडीमुळे प्रत्यक्ष येता आले नाही. ती. श्री. चंदूकाका आणि मा. श्री. विनोदवीर ह्या जोडगोळीला आपल्या घरी पाठवतो आहे. संत्रा बर्फीचा पुडा त्यांच्याकडून मागून घ्यावा!! (सहजासहजी देणार नाहीत!!) असो. 

सर्वश्री चंदूकाका आणि विनोदवीर ही जोडी तुम्हाला शिवस्मारकाच्या उद्‌घाटनाचे आमंत्रण देईल. कृपया येणेचे करावे. कार्य सिद्धीस नेण्यास श्रीनमोजी समर्थ असले तरी आपण स्वत: येऊन कार्यास शोभा आणावी (शोभा करावी असे कृपया वाचू नये!) ही कळकळीची विनंती. शिवस्मारकाच्या उद्‌घाटनाची तयारी जोरदार सुरू आहे. त्या तयारीच्या गडबडीतच मी आहे. मध्यंतरी स्वत: जाऊन समुद्रातील स्मारकाची जागा एकदा पाहून आलो. (पोहून आलो असे कृपया वाचू नये!) चौपाटीवरून बोट घेऊन दीड किलोमीटर समुद्रात जावे लागते. (बोट धरून असे कृपया वाचू नये!!) मी तीन वेळा चौपाटीवर गेलो, पण माझ्याआधीच बोटीत उडी मारून मा. विनोबा मेटे जाऊन बसायचे. सबब, नंतर जाऊ शकलो नाही. उद्या, शुक्रवारी तुमच्याबरोबर जाईन! आय मीन येईन!! ह्या विनोबा मेट्यांनी मला शिवस्मारकावरून अक्षरश: मेटाकुटीला आणले आहे. कुठल्याही कामात असलो की हे हातात स्मारकाची छोटी प्रतिकृती घेऊन समोर उभे राहतात. काय करू? 

उद्‌घाटन समारंभात सरकारी पाहुण्यांसाठी एक व्यासपीठ असेल. राजघराणी, सरदार घराण्यांसाठी दुसरे व्यासपीठ असेल. उद्योग क्षेत्रातील व्हीआयपींसाठी वेगळे आणि फिल्मी सिताऱ्यांसाठी वेगळे व्यासपीठ असेल. अशी किमान आठ-दहा व्यासपीठे उभारण्याचा प्लॅन आहे. कुणाचेही मन मोडायचे नाही, असे ठरवले आहे. मानापमान नाट्यासाठी वेगळे स्टेज उभारूया, असे एका सांस्कृतिक खात्याच्या अधिकाऱ्याने सुचवले. त्याला पुढला पगार जुन्या नोटांमध्ये द्यावा, असे आदेश मी काढले आहेत. इतकेच नव्हे, तर एकाने प्रेक्षकांसाठीही वेगळे व्यासपीठ उभे करावे, अशी सूचना केली. त्याचा पगार रोखणार आहे. असो. 

शिवस्मारकाचे उद्‌घाटन झोकात होईल, ह्यात शंका नाही. तुमचे स्वागत आणि सन्मान डब्बल झोकात होणार, ही तर काळ्या खडकावरची रेघ! उद्‌घाटनाचे खरे हिरो तर तुम्ही आहात!! समारंभात तुमचा सन्मान ठेवावा, अशी विनंती मला तुमच्या पक्षाच्या काही आमदारांनी समक्ष भेटून केली. मा. प्रतापराऊ सरनाईक (ठाणे कसबा) आणि मा. ना. एकनाथराऊ शिंदे (ठाणे कसबाच!) ह्यांनी भेटून सांगितले की ''आमच्या राजियांचा मान न ठेविला, तर पुंडाव्यास तय्यार राहाणे. हयगय न करणे. बदअंमल केलियास कडेलोटास तोंड देणे!'' मी मान डोलावली. 

साहेब, तुमचा मान आम्ही नाही ठेवणार तर कोण ठेवणार? किंबहुना, आपला सन्मान करण्याची संधी मिळावी, म्हणूनच हा शिवस्मारकाचा घाट घातला आहे, असे समजावे. वास्तविक ह्या स्मारकाचे उद्‌घाटन आपल्याच शुभहस्ते करावयाचा माझा इरादा होता. पण तुम्ही येणार असे कळल्यावर मला दिल्लीहून खुद्द नमोजीहुकूम ह्यांचाच फोन आला. ''उधोजीभाई आवे छे, तो हुं पण आवीश!'' काय करणार? आम्हाला त्यांचा सन्मान ठेवणे भागच होते!! सबब, त्यांनाही बोटीत घेऊन जावे लागणार आहे. 

बाय द वे, चौपाटीपासून होडक्‍यात बसून प्रस्तावित खडकावर आपल्याला जायचे आहे. मला किंचित टेन्शन आले आहे. एक म्हंजे मला बोट लागत्ये, आणि दुसरे म्हंजे मला पोहता येत नाही!! सोबत पाव किलो आवळासुपारी घेऊनच मी बोटीत चढणार आहे. तुम्हालाही थोडी देईन! 

भेटीअंती फार बोलणे होणार नाही, म्हणून हा पत्रप्रपंच. बाकी सुक्षेम. सदैव तुमचाच. नाना फडणवीस. 

ता. क. : तुमच्या युवराजांसाठी नंतर बोट राइड नेऊ या का? बोटीत जागा नसल्याने त्यांना वेगळे निमंत्रण देता आले नाही. त्यावरून कृपया मानापमान नाट्य नको! आपलाच. नाना.

Web Title: Dhing Tang by British Nandi