निपटारा! (ढिंग टांग!)

Dhing Tang
Dhing Tang

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे. 
वेळ : निपटण्याची. 
प्रसंग : अर्थात निपटानिपटीचा! 
पात्रे : राजाधिराज उधोजी महाराज आणि सौभाग्यवती कमळाबाई. 
......................................... 

आपल्या सर्वांच्या लाडक्‍या कमळाबाई खुशीत गाणे गुणगुणत गवाक्षातून बाहेरचा देखावा पाहत आहेत. तेवढ्यात उधोजीराजे तावातावात किंवा ताडताड येतात. सतरंजीवर अडखळून पडू नये म्हणून हळूचकन पाय टाकून उभे राहतात. अब आगे... 

उधोजीराजे : (खाकरत) अ...जरा गंभीर विषयावर बोलायचं आहे! हे आपलं अखेरचं बोलणं असेल!! 
कमळाबाई : (गाणं गुणगुणत) काडीमोडाचंच नं? इश्‍श...ते काय गंभीरपणानं घ्यायचं? बोला की!! 

उधोजीराजे : (धीर करून) काडीमोडाच्या भयानं एक माणूस चांगलंच घाबरलंय वाटतं! हहह!! 
कमळाबाई : (गुणगुणणं थांबवत) होऽऽ...घाबरलेय! म्हणून गाणं म्हणतेय!! काहीत्तरीच तुमचं!! तुम्हाला कोण घाबरेल? 

उधोजीराजे : (विनोद करण्याचा दुबळा प्रयत्न) डर लगे तो गाना गा...असं एक हिंदी गाणं आहेच मुळी!! 
कमळाबाई : (नाक उडवत) अडलंय माझं खेटर! आम्ही कशाला कोणाला घाबरू? कर नाही त्याला डर कशाची? तुम्हीच घाबरता सदानकदा! 

उधोजीराजे : (दर्पोक्‍तीनं) अच्छा? हा उधोजी कुणाच्याही बापाला घाबरत नाही, हे सत्य विदर्भासहित अवघा महाराष्ट्र जाणतो! उधोजीच्या हातातली तेग ही खरी घाबरण्याची वस्तू आहे! ज्याच्या हातात सदैव ही तलवार असते, त्याला कशाची डर? 
कमळाबाई : (पटकन पलंगाखाली बोट दाखवत) तो पाहा, उंदीर पळाला..!! 

उधोजीराजे : (टुणकन पलंगावर उडी मारत) क...क...कुठाय! 
कमळाबाई : (खुदुखुदु हसत) गंमत केली!! 

उधोजीराजे : (पलंगावरून सावधपणाने उतरत) मग ठीक आहे! खरा उंदीर असता तर इथल्या इथे लंबे केला असता! हा उधोजी भलतेसलते लाड खपवून घेणारा नाही! एक घाव, दोन तुकडे असा आमचा खाक्‍या आहे, हांऽऽ!! 
कमळाबाई : (खेळीमेळीनं) आता दिसेलच! रणमैदान काही दूर नाही!! (जवळ येत) शत्रू समीप येऊन ठेपला आहे!! 

उधोजीराजे : (ताडताड पावलं टाकत दूर जात) येऊ देत कोणीही! गनिमास म्हणावं, उदईक येणार तर आजच या!! आज येता, तर आत्ताच या!! हा उधोजी तुम्हाला आवतणच देतो आहे!! या, जरूर या...आत्ता जमले नाही, तर आमच्या विजयसभेला तर नक्‍कीच या!! (तलवार उपसत त्वेषाने) येता मुंबई, जाता उईउई!! 
कमळाबाई : (थट्‌टेखोरपणानं) खरंच येतील हं!! 

उधोजीराजे : (गोरेमोरे होत) येऊ...येऊ देत...घाबरतो की काय! एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाकायचाच आहे आम्हाला!! फार झालं!! आमचा जीव आता ह्या संसारात रमत नाही!! 
कमळाबाई : (अत्यंत कुटिल आवाजात) कुणी भेटलं वाटतं बाहेर!! 

उधोजीराजे : (धीर एकवटून) वाट्‌टेल ते बोलू नका!!आम्हाला...आम्हाला...काडीमोड हवा आहे!! 
कमळाबाई : (खुदकन हसत) इश्‍श!...ही काय भलती चेष्टा? 

उधोजीराजे : (कळवळून) चेष्टा नाही हो! खरंच आम्हाला काडीमोड हवा आहे!! आई शप्पथ!! आम्ही नोटिससुद्धा दिली आहे... 
कमळाबाई : (भिवई उंचावत) माझं ऐका!! तुम्ही नं...एका बंद खोलीत किनई, आमच्या पुतळ्याला नौवारी साडी नेसवा आणि त्याला चांगलं फटकवून काढा!! आमच्यावरचा राग गेला की मग या परत!! 

उधोजीराजे : (खचलेल्या आवाजात) गेली पंचवीस वर्षं आम्ही तेच करत आहोत कमळाबाई! 
कमळाबाई : (खोट्या उदासीनं) मग जाऊ म्हंटा आम्ही महाल सोडून? 

उधोजीराजे : (मिशीवरून बोट फिरवत) निघा!! 
कमळाबाई : (निर्वाणीच्या सुरात) बघा हं!! नंतर म्हणाल की... 

उधोजीराजे : (किंचित विचार करत) त्यापेक्षा असं करा...तूर्त राहा इथंच! नोटिस पीरियड संपल्यावरच करू सगळा निपटारा! काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com