दाढी : एक चिंतन! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 11 मार्च 2017

पण माणूस दाढी का वाढवतो, हा खरा चिंत्य सवाल आहे. काही मनुष्ये पंतप्रधान होण्यासाठी दाढी वाढवतात. काही मनुष्ये नशीब बदलण्यासाठी दाढी वाढवतात. काही श्रावण पाळण्यासाठी, तर काही श्राद्धापुरती... काही मनुष्ये मात्र निव्वळ ब्लेड लागल्यामुळे दाढी वाढवतात, हे सत्य आहे.

''टर्रर्रक...या साएब!'' तो म्हणाला. मान तुकवून आम्ही त्याने दाखवलेल्या उंच पाठीच्या खुर्चीत बसलो. (खुलासा : 'टर्रर्रक' हा आवाज खुर्चीच्या निघालेल्या मानेचा होता. त्याचा वा आमचा नव्हे!!) पृथ्वीतलावरचा हा एकमेव देवमाणूस आम्हांस साहेब म्हणतो. साहेब! (म्हणून आम्ही दाढी करावयास त्याचेकडे जातो.) दाढीचे खुंट किंचित ओढत त्याने किंचित नापसंतीचे आवाज काढत एक टावेल आमच्या मानेभोवती गुंडाळला. आम्ही डोळे मिटून चिंतनात बुडालो. 

''क्रीम की साधी?'' वास्तविक हा प्रश्‍न तो आम्हाला करीत नाही. बेसावध असावा. तथापि, आम्ही काही उत्तर देण्याच्या आत त्याने फुस्सकन पाण्याचा फवारा मारून आम्हाला किंचित्काल गुदमरवून टाकिले. 

''मान्साने वेळच्या वेळी दाढी करीत जावे...काय?'' तो म्हणाला. डब्याचे झाकण धरावे, तसे त्याने आमचे मस्तक घट्ट धरून ठेवले होते. हो किंवा नाही म्हणण्यास काहीच स्कोप नव्हता. 

''मान्साणे कधीही दाढी वाडवू णये...काय?'' तो. ह्या क्षणाला आमच्या मुखातून एक अस्फुट किंकाळी फुटली. (येक शंका : किंकाळी फुटली, तर ती अस्फुट कशी? असो.) चूक आमची नव्हती. 'शिल्वर शिझेर हेअर कटिंग सलून'चा कारागीर आपल्या व्यवसायास जागला होता. केशकर्तनाचे दुकानी सिंहासनाधिष्ठित झाल्यावर डोळा लागला असता हे कारागीर नेमक्‍या वेळी पाण्याचा फवारा का मारतात? हे येक शेकडो वर्षांचे कोडे आहे. पुन्हा असो. 

''काय बोल्ले?'' त्याने आमच्या डाव्या गालावर खरखरीत ब्रश ओढला. आम्ही काही बोललोच नव्हतो. सलूनमध्ये दाढी करणाऱ्या 'मान्सा'ने तोंड कधी उघडू नये, येवढे आम्हालाही कळते. पण त्याने टावेलने आमच्या मुसक्‍या वळायच्या आत 'पण का?' येवढे आम्ही शर्थीने विचारून घेतले. 

''का म्हंजे? किती वायट दिसतं...काय?'' कारागीराने खुलासा केला. त्याच्या चेहऱ्यावर संजय निरुपमछापाचे भाव उमटले. आम्ही निकराने मान हलवून 'हो' म्हणालो. 
''दाढी वाडवलेला मानूस कंडम दिसतो!!..काय?'' काचकिनी आमचे थोबाड विरुद्ध दिशेला ढकलून त्याने तुच्छतानिदर्शक उद्‌गार काढले. आम्ही कळ सोसली. आता त्याच्या हाती शस्त्र आले होते. 

''आता तुमचंच उदाहरन घ्या, साहेब!'' तो म्हणाला. अर्धवट भादरलेल्या अवस्थेत नसतो, तर त्याचे तेथल्या तेथे दोन्ही हातांनी फेशियल केले असते. पण कारागिराच्या खुर्चीवरील शहाण्या माणसाने प्रतिकार करू नये म्हंटात. 

आता दाढी वाढविण्यासाठी आम्ही काहीही करत नाही. म्हंजे करायची गरज नसत्ये, हे सत्य आहे. 

किंबहुना, दाढी शिंची काहीही न करता वाढत्ये, असा आमचा खुरटा अनुभव आहे.

मुंबईत कलानगरच्या सिग्नलवर आम्ही कित्येकदा तांबड्याचा हिरवा होण्याच्या आत आम्ही हिरवे झालो आहो!! चालायचेच. त्यातून राजबिंड्या माणसाने दाढी वाढवायची ठरवली की लोकांच्या उगीचच भिवया उंचावतात. विनाकारण गॉसिप होते. 'दाढी..दाढी...दाढी वाढवलेली दिसते...दाढी...दाढी... वाढलीये बरीच...दाढी... दाढी...काय कारण?...वगैरे वगैरे. 

पण माणूस दाढी का वाढवतो, हा खरा चिंत्य सवाल आहे. काही मनुष्ये पंतप्रधान होण्यासाठी दाढी वाढवतात. काही मनुष्ये नशीब बदलण्यासाठी दाढी वाढवतात. काही श्रावण पाळण्यासाठी, तर काही श्राद्धापुरती... काही मनुष्ये मात्र निव्वळ ब्लेड लागल्यामुळे दाढी वाढवतात, हे सत्य आहे. 

''अवो, बढती का नाम दाढी...काय?'' तो म्हणाला. 

हे अंतिम सत्य श्रीमान चुलतराजांस जावून सांगितले पाहिजे. आम्हाला तरी टाळी देतील...देतील? 

असो.

Web Title: Dhing Tang by British Nandi