बॉम्बची आई, बाबा वगैरे! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 15 एप्रिल 2017

सगळं खानदान निबर असलं 
तरी मागली पिढी सोबर होती 
रणांगण गाजवायची त्यांची 
ऊर्मीच जबर होती.

एक होता बॉम्ब, 
त्याला शंभर भाऊ 
सगळे लेकाचे माजलेले. 
म्हटलं तर सख्खे, 
म्हटलं तर सावत्र, 
म्हटलं तर मानलेले. 

त्यांची आई अमेरिकन 
तर बाप रशियन, 
काका होता अरबी. 
सगळंच खानदान तसं 
उद्दाम-बिन-सद्दाम, 
सगळ्यांनाच सारखी चरबी. 

सगळं खानदान निबर असलं 
तरी मागली पिढी सोबर होती 
रणांगण गाजवायची त्यांची 
ऊर्मीच जबर होती. 

रणांगणातच कित्येक फुटले 
देशासाठी कामी आले, 
गनिमी काव्याने शत्रूच्या पायाशी 
भुईसुरुंग म्हणून उडाले. 

कुणी धुळीस मिळवले रणगाडे 
नेस्तनाबूत केल्या पहारे-चौक्‍या 
कुणी गडगडत गेले शत्रूच्या बंकरात 
कुणाच्या निघाल्या वाती फुसक्‍या 

घरघरणाऱ्या विमानाच्या पोटातून 
कुणी घेतली शांतपणे उडी 
क्षणात उठलेल्या आवर्तानंतर 
कोसळली मृत्यूची झडी. 
पण हा झाला इतिहास, 
खूप मोठी आहे बॉम्बची वंशावळ. 
पृथ्वीच्या पोटात, वर अवकाशात 
सर्वदूर पोचली आहे पिलावळ. 

पुढली पिढी नादान निघाली, 
त्याचं तेवढं दु:ख आहे... 
माणसं मारण्याची त्यांच्यात 
अजून मोठी भूक आहे... 

आता कुणी फुटतं दर्ग्यात, 
मशिदीत किंवा देवळात. 
एखाद्या नाट्यगृहात किंवा 
भर वस्तीच्या कल्लोळात. 

ॅफुटबॉलच्या स्टेडियममध्ये, 
इमारतीच्या मजल्यांमध्ये, 
किंवा कुठल्या पोलिस ठाण्यात 
अगदी रेल्वेच्या डब्यांमध्ये 

बॉम्ब फुटतात, माणसं मरतात 
सगळीकडेच होतं असं 
एवढ्या मोठ्या खानदानाचं 
उगाच चारचौघात हसं 

अमेरिकन मम्मा आणि रशियन डॅडी, 
त्यांच्या जोरावरच असते आरडीएक्‍सची उडी! 
बॉम्बच्या पिलावळीला नाही कसला अडसर 
माणसाच्या मनातच त्यांचं असतं घर! 

बॉम्ब आहेत म्हणून आपण आहोत, 
आपण आहोत म्हणून बॉम्ब. 
पायाखाली काय जळतंय? 
अहो, बघा, नाहीतर होईल- 'ढॉम'! 

।। ॐ शांति: शांति: शांति:।।

Web Title: Dhing Tang by British Nandi