शेतकऱ्याचा खरा मित्र! (ढिंग टांग!)

Dhing Tang
Dhing Tang

प्रिय मित्र फडणवीसनाना, 

फारा दिवसात आपली गाठभेट नाही. पण ते ठीक आहे. सध्याचे दिवस भेटण्याचे नाहीतच. (शिवाय तुमच्या आवडीचे मासे सध्या ताटातून गायब आहेत.) नाहीतरी हल्ली मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरच असतो. सतत शेतकऱ्यांच्या सहवासात राहावे असे वाटते. त्यांची विचारपूस करणारा हल्ली उरलाय कोण? मी शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे. शेतकरी पेरणी नांगरणी करतो, तेव्हा मी बांधावर बसून त्याच्याशी गप्पागोष्टी करतो. तेवढाच त्याचा वेळ चांगला जातो. हे मित्राचे लक्षण नाही तर कोणाचे मानायचे? पण परवा त्या राष्ट्रवादीवाल्या धाकल्या धन्यांनी (तेच ते दादाजीसाहेब!) आम्हाला चक्‍क गांडुळ म्हणून घेतले! गांडुळावर मीठाची चिमट टाकली की ते जसे तडफडते, तशी जिवाची तडफड झाली. 

आम्ही दुतोंडी गांडुळ?ज्याच्या डरकाळ्यांनी अवघ्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या दणाणून जातात, त्या वाघाला गांडुळ म्हणायची ह्यांची हिंमत झालीच कशी? ही हिंमत झाली, आपल्या धोरणामुळे. आपण त्या लोकांना फार लाडावून ठेवले आहे, असे आमचे मत झाले आहे. बऱ्या बोलाने ह्यांना तोंड आवरायला सांगा, नाहीतर गाठ ह्या उधोजीशी आहे, हे लक्षात घ्या. 

कळावे. आपला. उधोजी. 

ता. क. : सध्या महाराष्ट्रभर हिंडत असलो तरी हेलिकॉप्टरने मुळीच जात नाही. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. उ. ठा. 
* * * 
प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब, तुमचे अक्षर लागता लागत नव्हते, तरीदेखील तुमचे पत्र मी मिटक्‍या मारीत वाचले. असे पत्र तुम्ही लिहाल, असे मुळी वाटलेच नव्हते. माझे तुमच्याकडे बारीक लक्ष आहे. शेतकऱ्यांशी संवाद वाढवणे गरजेचे आहे, हे मी गेल्या तीनेक वर्षांपासून सांगत आलो आहे. (माझ्याऐवजी) तुम्ही ते करता आहात, हे मित्रप्रेम मानू का? मानतोच! 

दादाजीसाहेबांनी तुम्हाला दुतोंडी गांडुळ म्हटले, हे फार मनाला लावून घेऊ नका. तो टोमणा नसून कॉम्प्लिमेंटच आहे हे लक्षात घ्या. मुळात दादाजीसाहेबांना शेतीतले काहीही कळत नाही, हे ह्यातून स्पष्ट होते. भुईमूग जमिनीच्या खाली लागतात की वर, हे शेतकऱ्याला ठाऊक असते, तसेच गांडुळखताचे महत्त्वही माहीत असते.

दादासाहेबांना हे माहीत असते, तर त्यांनी तुम्हाला गवा, टोळ, हत्ती, उंदीर-घुशी, पाखरे आदी सजीवांची उपमा दिली असती. (खुलासा : तसे मी त्यांना दुसरे पत्र पाठवून कळवले आहे. डोण्ट वरी!) पण दुतोंडी गांडुळ नक्‍की म्हटले नसते. गांडुळ दुतोंडी असते, हाच मोठा गैरसमज आहे. गांडुळाला एकच तोंड असते व दुसरीकडे दुसरेच काही असते. गांडुळ दोन्ही बाजूंनी वळवळते म्हणून हा गैरसमज पसरला. नुकताच मी 'गांडुळ खत : एक अभ्यास' हा अहवाल वाचला. गांडुळाला हिंदीमध्ये केंचुआ असे म्हणतात. केंचुआ...किती बंडल नाव आहे. त्यापेक्षा गांडुळ मस्त वाटते. गांडुळ कधीही चावत नाही. असो. 

गांडुळ शेतकऱ्याचा खरा मित्र असतो. तो मातीची मशागत व्यवस्थित करतो व मातीची प्रत सुधारतो. जमीन उपजाऊ करतो. हल्ली पिशव्यांमधून गांडुळखते मिळू लागली आहेत. चार गांडुळे घरातल्या कुंडीत आणून टाकली तरी काम भागते. पुन्हा असो. 

गेल्या हंगामात मी जलयुक्‍त शिवार ह्या योजनेअंतर्गत रान उठवले होते, हे तुम्हाला आठवतच असेल. त्याचप्रमाणे यंदा गांडुळयुक्‍त शिवार योजना आणण्याचा गंभीरपणाने विचार करीत आहे. दादासाहेबांना मूंहतोड जबाब मिळेल, ह्याची ग्यारंटी देतो. कळावे. सदैव आपला. नाना. 

दोन प्रेमळ सूचना : 1. गांडुळे ही शेतकऱ्याचे मित्र असली तरी मुंबईतल्या घरी शक्‍यतो आणू नयेत. आणलीच, तर चिनी हाक्‍का नूडल्स जरा जपून खावीत. 

2. आमच्या सुधीर्जी मुनगंटीवार्जींना तूर्त घरात घेऊ नका. मागल्या खेपेला त्यांनी तुम्हाला वाघ गिफ्ट दिला होता...न जाणो, ह्यावेळेला गांडुळे घेऊन येतील!हा गृहस्थ आमच्या कंट्रोलच्या बाहेर आहे!! असोच. 
नाना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com