भूमिका! (ढिंग टांग!)

Dhing Tang
Dhing Tang

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे. 
वेळ : नाजूक! 
प्रसंग : कन्फ्युजनचा! 
पात्रे : राजाधिराज श्रीमंत उधोजीराजे आणि त्यांचा अत्यंत विश्‍वासू कदीम सेवक मिलिंदोजी फर्जंद. 
...................... 
उधोजीराजे : (अस्वस्थ येरझारा घालत) जगदंब जगदंब! काय करावे? कसे करावे? इकडे आड म्हणावे, तो तिकडे विहीर आ वासोन बसलेली! घुंगरांच्या चाहुलीनं उत्सुक मनाने वाट पहावी, तो शिंगे रोखलेला बैल अंगावर यावा!! तुका केले नि माका झाले? हे काय होवोन बसले? जगदंब जगदंब! 
मिलिंदोजी फर्जंद : (मुजरा घालत) मुजरा म्हाराज! व्हाट कॅन आय डु फार्यू? 

उधोजीराजे : (चिडून) चालता हो इथून! तुला कोणी बोलावले होते? 
मिलिंदोजी : (खांदे उडवत) तुम्ही कन्फ्यूज झाले की मला बलवताच! म्हनलं, आपुनच आधी जाऊन हुबं ऱ्हाऊ!! डेव्हिल इज हिअर सर!! 

उधोजीराजे : (डोळे बारीक करत) हुशार आहेस, पण अती बोलतोस!! 
मिलिंदोजी : (आज्ञाधारकपणे) काय प्रॉब्लेम आहे म्हाराज? 

उधोजीराजे : (येरझारा कंटिन्यू...) गेले छत्तीस तास आम्ही विचार करीत आहो! हल्ली आम्हांस विस्मरण फार होवो लागले! येरझारा घालून मस्तक फुटले!! 
मिलिंदोजी : (गंभीर चेहरा करत) इच्यार करताना मागंफुडं बघावं म्हाराज! भिंत आली की आर्जंट वळावं! डोकं वाचंल!! टेंगूळगिंगूळ आलं का? 

उधोजीराजे : (चवताळून) कुणी केला रे तुला फर्जंद? अरे, विचार कर करून डोके फुटायची पाळी आली, असं म्हंटोय मी!! त्या समृद्धी महामार्गाचं काय करावं, ह्या प्रश्‍नानं रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नाही आमचा!! 
मिलिंदोजी : (सहजपणानं) मला एक सांगा! आपुन समरुद्धीला कधी नाय म्हंतो का? 

उधोजीराजे : (बेसावधपणाने) नाय...(जीभ चावून) नाही...म्हंजे हो! 
मिलिंदोजी : (तळहातावर मूठ हापटत) हितंच तर माशी शिकतीये ना म्हाराज आपली!! 

उधोजीराजे : (बुचकळ्यात पडत) माशी शिकती? शी:!! काय ही भाषा तुझी? अरे, आम्ही कल्याणकारी राज्याचे निरिच्छ राज्यकर्ते! आम्हाला तुमच्या त्या समृद्धीशी काय देणेघेणे? इदं न मम या वृत्तीनं आम्ही सारे काही दो करांनी रयतेतच वाटत असतो ना? मुद्दा आमच्या शेतकरी बांधवांचा आहे! त्यांच्या समृद्धीसाठी आमचे आतडे तीळ तीळ तुटते!! आम्ही समृद्धी महामार्गाबद्दल बोलत आहो!! 
मिलिंदोजी : (मान डोलावत) आता आपले कारभारी फडनवीसनानांचं ते सपानच हाय, म्हटल्यावर समृद्धी महामार्ग होनारच!! राजा बोले, दळ हाले!! 

उधोजीराजे : (उसळून) हो...पण तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही माझ्या शेतकरी बांधवांची स्वप्नं चिरडून त्यावर खडी-डांबर घालणार असाल, तर त्याच डांबराच्या पिंपात आम्ही तुम्हाला...(संतापाने शब्द न फुटल्याने) फफफ...फफ..फ..फ..फुप्प!! छे, काही केल्या आठवत नाही...ह्या महामार्गामुळे माझ्या कित्येक शेतकऱ्यांची सुपीक जमीन जाणार आहे! जिथं पिढ्यानपिढ्या कणसं उगवली, तिथं सिग्नल उगवायचे? तिथं पाटाचं पाणी झुळझुळ वाहिलं, तिथं वाहतुकीचे ट्रक दौडायचे? जिथं पाखरांची किलबिल ऐकली, तिथं हॉर्नचा कर्कश्‍श गोंगाट ऐकायचा? अशक्‍य! इंपॉसिबल!! नाममुमकीन!! 
मिलिंदोजी : (हात आणि मान झटकत) जाव द्या, म्हाराज! आत्ताच फोन करून आपल्या फडनवीसनानांना सांग का बुवा अशानं असं हुतंय, तर आपल्याला बुवा काई हा सम्रिद्धी फिम्रिद्धी महामार्ग नको!! हा कसला सम्रिद्धी मार्ग, हा तर दरिद्री मार्ग!! 

उधोजीराजे : (थोडं समजुतीनं घेत) नाही म्हंजे...थोडं वेगळं वळण काढून सुपीक जमिनी नाही का वाचवता येणार? असा आमचा पोक्‍त विचार!! बरं!! पण हे सगळं त्यांना कसं सांगायचं? हाच खरा प्रश्‍न आहे!! 
मिलिंदोजी : (आश्‍चर्यानं) त्याला काय हुतंय? फोन लावायचा, आनि सांगायचं की!! 

उधोजीराजे : (वैतागून) अरे, ह्या योजनेला आमचा सुरवातीपासून विरोध का आहे, ह्याचं कारणच मुळात विसरलोय आम्ही...त्याचं काय? जगदंब जगदंब!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com