चित्र विचित्रे! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

गढूळ पाण्याची लटलट 
हल्लक नजरेनं बघत बसलेल्या 
बनासकांठ्याच्या ड्याह्याभाईला दिसली 
लष्करी जवानांची रबरी होडी, 
आणि त्याचा जीव चडफडला... 

गढूळ पाण्याची लटलट 
हल्लक नजरेनं बघत बसलेल्या 
बनासकांठ्याच्या ड्याह्याभाईला दिसली 
लष्करी जवानांची रबरी होडी, 
आणि त्याचा जीव चडफडला... 

होते, ते गेलेच आहे, 
आणि नव्हते तेही सोडायचे. 
पुरात बुडालेल्या घरादाराचे 
न उरलेले उंबरठेही ओलांडायचे. 
...आता जावे लागणार! 
* * * 
सायलेंट फोनच्या थरथरीने 
थरकापलेल्या एमएलए परेसभाईंनी 
शेवटी फोन उचललाच- 
पंधरा मिनिटांत तयार व्हा, 
दाराशी एक वातानुकूलित बस 
उभी राहील, तिच्यात बसा... 
('मुकाट्याने' हा शब्द राहिला...) 
काही न बोलता परेसभाईंनी 
फोन ठेवला; पण 
त्यांचाही जीव तडफडला... 

होते, ते गेलेच आहे, 
नव्हते तेही सोडायचे. 
पुरात बुडालेल्या घरादाराचे 
न उरलेले उंबरठेही ओलांडायचे. 
* * * 
रबरी बोटीत ड्याह्याभाई 
बसला शेवटी मन मारून 
गढूळ पाण्यातून सरपटत गेलेल्या 
सर्पाप्रमाणे जाऊ लागला, 
आपल्या अर्धबुडल्या घरापासून दूर... 
दूरवर पोट फुगून पडलेल्या 
ढवळ्या बैलाकडे बघून 
ड्याह्याभाईचे शेतकरी मन 
हिंदकळून आले आणि 
तो धाय मोकलून 
अडाण्यासारखा रडू लागला... 

होते, ते गेलेच आहे, 
नव्हते तेही सोडायचे. 
पुरात बुडालेल्या घरादाराचे 
न उरलेले उंबरठेही ओलांडायचे. 
* * * 
बंगळूरच्या विमानतळावर 
उतरल्यावर पुन्हा आलिशान बसमध्ये, 
तिथून म्हैसूरच्या सडकेवर भरधाव, 
मग पंचतारांकित गोल्फ कोर्सच्या 
कुशीत वसलेल्या एका रिसॉर्टमध्ये 
आले घातलेला चहा पिताना, 
एमएलए परेसभाईंचे रक्‍त साकळले... 
बसमध्ये बसण्यापूर्वीच काढून घेतलेल्या 
प्रमाणे परेसभाई होते स्विच ऑफ. 
''चिंता ना करजो, परेसभाई, 
अंतर्वस्त्रापासून अंगवस्त्रापर्यंत 
सर्व काही भरपूर मिळेल, 
पण तमे चालो हवे!!'' 
धनानीसेठने भरघोस आश्‍वासन दिले होते... 
आल्याचा चहा घशाखाली उतरेना, 
एमएलए परेसभाईंचे मन झाले 
गढूळ पुराच्या पाण्यासारखे. 

होते, ते गेलेच आहे, 
नव्हते तेही सोडायचे. 
पुरात बुडालेल्या घरादाराचे 
न उरलेले उंबरठेही ओलांडायचे. 
* * * 
पूरग्रस्तांच्या तंबूत ड्याह्याभाई 
शोधत राहिला, आपला गणगोत 
सेवाभावी संस्थेच्या तरुण कार्यकर्त्याने 
आणून दिलेला बशीभर उपमा 
काही केल्या उतरेनाच घशाखाली. 
हाती आलेले छोटेसे शिवार, 
छोट्या चिमणभाईसकट 
वाहून गेलेला कुटुंब-कबिला 
कुठे कुठे फुगून झाडझाडोऱ्याला 
अडललेली लाडकी जनावरे. 
दोन उंबरठ्याचे आटोपशीर घर, 
हे सारे शेवटी बशीभर तर उरले.... 

होते, ते गेलेच आहे, 
नव्हते तेही सोडायचे. 
पुरात बुडालेल्या घरादाराचे 
न उरलेले उंबरठेही ओलांडायचे. 
* * * 
पुढ्यातील गरमागरम इडली 
तशीच टाकून एमएलए परेसभाईंनी 
टाकली नजर रेस्तरांच्या बाहेरील 
विस्तीर्ण हिरव्यागार निरोगी 
गोल्फ कोर्सकडे... 
धडका देत राहिला त्यांना, 
बनासकांठाचा हाहाकार... 
तेव्हा शेजारी बसलेल्या 
जगदीशभाईने रुबाबात मागवला होता, 
एक उष्ण पाण्याचा लिंबुयुक्‍त फिंगरबोल 
आपली राजकीय बोटे बुडवण्यासाठी... 

एमएलए परेसभाई आणि 
बनासकांठ्यातला ड्याह्याभाई 
दोघेही स्वत:शी घोकत राहिले... 

होते, ते गेलेच आहे, 
नव्हते तेही सोडायचे. 
पुरात बुडालेल्या घरादाराचे 
न उरलेले उंबरठेही ओलांडायचे. 
...आता जावेच लागणार!

Web Title: Dhing Tang by British Nandi