...ओरपले श्रेय! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 27 जून 2017

फडणवीसनाना- 

फडणवीसनाना- 

जय महाराष्ट्र. (माझ्या) महाराष्ट्रातील तब्बल नव्वद लाख शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली आहे, ह्या कर्जमाफीचे (आम्ही) स्वागत करतो, आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धारही करतो... किंवा असेही म्हणता येईल की कर्जमाफीबद्दल (आम्ही) सरसकट असमाधानी असून, ह्या निर्णयाबद्दल सरकारचे अभिनंदन करतो. बहुतांश शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असला, तरी सरकारी तिजोरीवर बोजा पडणार असल्याने त्याचीही (आम्हाला) चिंता लागून राहिली आहे. किंवा असेही म्हणता येईल, की सरकारी तिजोरीचा बोऱ्या वाजणार असल्याने (आम्ही) कमालीचे दु:खी असून, त्याचवेळी शेतकऱ्यांना कर्ज माफ झाल्याचा आनंदही आहे. काही कळले? जाऊ दे. 

शेतकरी आणि आम्ही एकत्र आल्यानंतर काय होते, ह्याची चुणूक तुम्हाला मिळाली असेल. आम्ही नसतो तर तुम्ही लोकांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली असती. काल पुणतांब्याला गेलो होतो. तिथल्या शेतकऱ्यांनी आम्हाला म्हटले, ''साहेब, तुम्ही नसता तर आमचे काही खरे नव्हते. तुम्ही होता, म्हणून हे सारे घडले..!'' 
मी नम्रपणे हे श्रेय स्वीकारतो आहे. ह्या श्रेयाचा उपयोग आम्ही समाजाच्या भल्यासाठीच करू, ह्याची हमी देतो. शेवटी रयतेच्या भल्यातच आपले भले शोधणाराच खरा जाणता राजा असतो. कर्जमाफीतून उरलेल्या असमाधानाचे काहीतरी मार्गी लावा, त्यासाठी एखादा अभ्यासगट नेमावा, अशी शिफारस आम्ही करीत आहो. कळावे. आपला उधोजी. 
 

* * *
 

प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब- 
शतप्रतिशत नमस्कार. कर्जमाफीचे सारे श्रेय तुमचेच आहे. ते कोण अव्हेरू शकेल? पण श्रेय म्हणजे काहीतरी पुरस्कार असावा, अशी काहीतरी तुमची भलती समजूत झालेली दिसते. श्रेयात शाल व श्रीफळ समाविष्ट नाही, ह्याची कृपया नोंद घ्यावी. बाकी श्रेय तुम्हाला द्यायचे नाहीतर कोणाला? आंदोलकांनाही आपलाच आधार होता आणि इथे मंत्रालयातही आम्हाला तुमचाच आधार होता. तुम्ही जवळपास पंढरीराय आहा!! इथे आणि तिथेही!! तेव्हा वसुंधरेवर जे काही घडते, त्याचे श्रेय आपल्यालाच! असो. 

कर्जमाफीचे आंदोलन आणि बैठका जोरात सुरू झाल्या तेव्हा आपण लंडनमध्ये होता. तुमचे पक्षसहकारी मंत्री तुम्हाला फोन लावून लावून जेरीला आले होते. परदेशाहून आलात ते थेट श्रेय घ्यायलाच!! 'घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिल्लापाशी' ह्या उक्‍तीनुसार आपण परदेशाहून साऱ्या घटनांवर जबर्दस्त अंकुश ठेवला होता, हेच ह्यातून सिद्ध होते. मी तुमच्या शब्दाबाहेर कधीच नसतो. 'कर्जमुक्‍ती करा' असा आदेश तुम्ही दिल्यानंतर लगेचच मी अभ्यासाला लागलो. पण सिलॅबस मोठे असल्याने अभ्यास पुरा व्हायला थोडा वेळ गेला. त्यात उन्हाळ्याच्या सुट्टीत (मुंबईत भयानक उकडते म्हणून) तुम्ही परदेशात थंड हवेच्या ठिकाणी गेलेला... मार्गदर्शन करणारा गुरूच देशाटनाला गेल्याने तुमचा हा विद्यार्थी (म्हंजे आम्ही!!) निराधार झालो होतो. पण झाले ते ठीकच झाले!! 

आणखी एका अभ्यासगटाची तुमची सूचना मान्य आहे. अभ्यासगट नेमणे मला खूप आवडते. मला अभ्यास आवडतो आणि गटही!! तेव्हा तुमची सूचना सर आंखो पर!! लग्गेच आदेश काढत आहे... 

विशेष सूचना : 'लंडन ते पुणतांबा : नाही मुक्‍काम, नाही थांबा' ह्या टायटलचे एक प्रवासवर्णन तुम्ही का लिहीत नाही? आपण केलेल्या कामाचे पुस्तक काढले की त्याचे श्रेय कागदोपत्री नोंदले जाते, असा सल्ला आमचे नागपूरचे गुरुवर्य मा. श्री. गडकरी मास्तर ह्यांनी दिला होता. त्यांनी मागे एकदा 'एक्‍स्प्रेस वे' वर एक पुस्तक काढले होते. बघा, विचार करा!! तुमचे फोटोही त्यात खपून जातील!!

कळावे. आपला. नाना.

Web Title: Dhing Tang by British Nandi on Devendra Fadnavis Uddhav Thackray