खून की दलाली! (ढिंग टांग!)

Dhing Tang
Dhing Tang

बेटा : (नेहमीप्रमाणे उत्साहात एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण! मम्मा आयॅम बॅक...फायनली!! 

मम्मामॅडम : (मायेने) बरं झालं...खूप हिंडलास त्या यूपीत! 

बेटा : (कॉन्फिडण्टली...) तिथे विरोधकांची खाट टाकून आलो! हाहाहा!! ‘एक खाट, एक व्होट‘ अशी स्लोगनच होती आमची!! आज यूपी के घर घर में मेरे नाम की खाट होगी!! 

मम्मामॅडम : (चौकशी करत) तुझ्या खाटसभेनंतर काही खाटा लोकांनी उचलून नेल्या म्हणे!! 

बेटा : (एक पॉज घेत) मीसुद्धा आणली एक उचलून!! 

मम्मामॅडम : (चौकशी करत) आपल्या लोकांनी तुझी चांगली काळजी घेतली नं? 

बेटा : (उजळलेल्या चेहऱ्यानं) हो तर!! ते राज बब्बर अंकल होते ना!! मी म्हटलं असेल माझा बब्बर, तर देईल खाटेवर!! हाहा !! मग मीही जाहीर भाषणात त्यांचं कौतुक केलं!! 

मम्मामॅडम : (कौतुकभरल्या आवाजात) ते खुश झाले असतील! काय केलंस त्यांचं कौतुक? 

बेटा : (किंचित विचारात पडत) त्यांच्या ‘इन्साफ का तराजू‘ मूव्हीतल्या रोलबद्दल त्यांना शाबासकी दिली; पण का कुणास ठाऊक ‘इन्साफ का तराजू‘चं नाव घेतल्यावर त्यांनी टावेलात तोंड लपवलं!! 

मम्मामॅडम : (सुटकेचा निःश्‍वास टाकत) संपल्या तुझ्या खाटसभा एकदाच्या, हे बरं झालं! 

बेटा : (उत्साहाच्या भरात) आता पुढच्या वेळेला गादी सभा घेणार आहे!! 

मम्मामॅडम : (गोंधळात पडत) म्हंजे? 

बेटा : (काल्पनिक बाटली हातात पकडत) प्रत्येकाला एकेक गादी देणार! गादीवर बसूनच बोलणाऱ्यानं बोलायचं आणि ऐकणाऱ्यानंही गादीवर बसूनच ऐकायचं. जाताना गादीची वळकटी करून घरी न्यायची!! कशी आहे आयडिया? 

मम्मामॅडम : (संयमानं) कोणी सुचवली ही आयडिया? 

बेटा : (निरागसपणाने) तिथल्याच एका श्रोत्यानं! खांद्यावर खाट घेऊन जाताना म्हणाला, ‘‘सरजी, अगले टाइम गद्दे बिछाओ, सिर्फ खटियापर कितने दिन सो पायेंगे? गद्दा भी तो चाहिए ना!‘‘ मला पटलं!! 

मम्मामॅडम : (वैतागून) आणखीन उश्‍या-पांघरुणंही दे नेऊन!! 

बेटा : (हाताने खूण करत) ती नेक्‍स्ट स्टेप आहे!! 

मम्मामॅडम : (दुप्पट वैतागून) हे बघ, काहीही गाद्या-गिरद्या वाटायच्या नाहीत! सांगून ठेवतेय!! आणि हो, त्या कमळवाल्यांना ‘खून के दलाल‘ का म्हणालास? 

बेटा : (चिडक्‍या चेहऱ्यानं) अलबत म्हणालो!! आपल्या आर्मीनं केलेला पराक्रम हे आपल्या पोस्टरवर कसा मिरवू शकतात? मी हे कधीच सहन करणार नाही!! मैं बोलूँगा, बोलूँगा, बोलूँगा! क्‍या गलत कहा मैंने मम्माऽऽऽ..? 

मम्मामॅडम : (खचलेल्या आवाजात) तूझी चूक नाही रे! पण 2007 सालच्या डिसेंबरात मी त्यांना ‘मौत का सौदागर‘ म्हटलं होतं. तिथून सगळं सुरू झालं! ते आठवलं, इतकंच! 

बेटा : (टोटल न लागल्यानं) तू त्यांना ‘मौत का सौदागर‘ म्हटलंस म्हणून काय झालं? 

मम्मामॅडम : (कमालीच्या खचलेल्या सुरात) ‘मौत का सौदागर‘ म्हटलं तेव्हा गुजरात हातातून गेलं! ‘जहर की खेती‘ म्हटलं तेव्हाही... आता तुझ्या ‘खून की दलाली‘मुळे काय होणार आहे, कसं सांगू? (काहीतरी आठवून) तू आणलेली खाट कुठाय? 

बेटा : (खोलीकडे बोट दाखवत) ठेवलीये तिथेच... का? 

मम्मामॅडम : (कपाळ चोळत) काही नाही... पडते जरा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com