K-OK dhing tang british nandi sakal editorial marathi news अनाडी पाऊस! (ढिंग टांग!) | eSakal

अनाडी पाऊस! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 8 जून 2017

सदरहू पाऊस हा खरा पाऊस नव्हे,
सबब, तूर्त पडणाऱ्या सरींशी
आम्ही चर्चा करणार नाही...

खरा पाऊस असतो
सायबेरियाहून येणाऱ्या
फ्लेमिंगोसारखा...पाहुणा.
तूर्त पडणाऱ्या पावसाच्या सरी
शतप्रतिशत लोकल असून
त्यांच्यामुळे रानात मोर रडतात,
व त्यांस हकनाक पोरे होतात.
...हे पतन आहे, पर्जन्य नव्हे!

तेव्हा, खऱ्या पावसाचा अभिनिवेश
आणून उगीच गर्जणाऱ्या
ह्या आयत्या ढगांवरल्या
उपऱ्या सरींचा आम्ही ट्रिपल निषेध करतो!

सदरहू पाऊस हा खरा पाऊस नव्हे,
सबब, तूर्त पडणाऱ्या सरींशी
आम्ही चर्चा करणार नाही...

खरा पाऊस असतो
सायबेरियाहून येणाऱ्या
फ्लेमिंगोसारखा...पाहुणा.
तूर्त पडणाऱ्या पावसाच्या सरी
शतप्रतिशत लोकल असून
त्यांच्यामुळे रानात मोर रडतात,
व त्यांस हकनाक पोरे होतात.
...हे पतन आहे, पर्जन्य नव्हे!

तेव्हा, खऱ्या पावसाचा अभिनिवेश
आणून उगीच गर्जणाऱ्या
ह्या आयत्या ढगांवरल्या
उपऱ्या सरींचा आम्ही ट्रिपल निषेध करतो!

सदर पाऊस अडाणी असून
त्याला शेतीतले काहीही
कळत नाही...टणण्ण!!
टमाटे वर येतात, नि
भुईमूग खाली येतो,
हेदेखील त्याला ठाऊक नसते.
दूध पिशवीतून येते, आणि
भाजी मंडईत उगवते,
असे त्याला वाटत असते!

सदरहू समाजकंटक सरींची
नोंद सरकारने घेतली असून
त्यांची कुंडली गृहखात्याच्या
फायलींमध्ये बाटलीबंद असून
योग्य समयी संबंधित नस्ती
संबंधित खात्याकडून
बाअदब उघडण्यात येतील,
ह्याची संबंधित पावसाने नोंद घ्यावी.

सदरहू अवकाळी पावसाने
दगडफेकीसारखी गारपीट केली,
विनाकारण रस्तारोको करून
शेतमालाचे अपरिमित नुकसान केले,
शहराकडे रांगेत निघालेले
दुधाचे टॅंकर खाली केले,
काही तुरळक ठिकाणी
तांबड्या एस्ट्यांची मोडतोड करून
जनतेच्या मालमत्तेची नासधूस
केली, असा आरोप आहे...

खरा पाऊस कधीही कधीही
असले काही करत नाही.
संप, आंदोलने, जाळपोळ,
शिमगा, बोंबाबोंब, राडा
ही खऱ्या पावसाची कामे नाहीत.
खऱ्या पावसाची कामे अशी :
बियाण्याची जुळवाजुळव,
मजुरांच्या नाकदुऱ्या,
सावकाराचे कर्ज,
सबशिडीचे खेटे,
ढगाला शिव्याशाप,
शिवारातली धडपड,
जिवाची तडफड
पंढरीची वारी,
नशिबाला दोष,
कर्जाचा फुगोटा,
उडालेला दाणागोटा,
संसाराच्या विधुळवाटा
नवे कर्ज, नवे ढग,
नवा दुष्काळ, नवे सरकार.
इत्यादी.

आता तुम्हीच सांगा,
खऱ्या पावसाच्या अजेंड्यात
आंदोलन कसे बसवावे?

म्हणूनच आम्ही ठरविले आहे की-

सदरहू पाऊस हा खरा पाऊस नव्हे,
सबब, तूर्त पडणाऱ्या सरींशी
आम्ही चर्चा करणार नाही...

-ब्रिटिश नंदी

Web Title: dhing tang british nandi sakal editorial marathi news