चलो जीतते हैं..! (ढिंग टांग)

Dhing-Tang
Dhing-Tang

‘हवे शुं करवानुं?,’’ थिएटरातून बाहेर पडता पडता आमच्या ‘मित्रां’ने विचारले. आम्ही मूग गिळून गप्प राहिलो. खरोखर त्याच्या ह्या एकमेव सवालास आमच्याकडे काही उत्तर नव्हते. हवे शुं करवानुं? अब क्‍या करें? आता काय करायचे? व्हाट्‌ टुडू?... वास्तविक हा सनातन आणि वैश्‍विक सवाल आहे. ह्या एका प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याच्या धडपडीतच मानवप्राणी गुहेपासून गुगलपर्यंत आला आहे. (कॅय वॅक्‍य जॅमलॅय!!) उदाहरणार्थ, गुहेत चिक्‍कार झोप झाल्यावर आदिमानवाला प्रश्‍न पडला असेल. व्हॉट्‌ टुडू? मग त्याच्या पिढ्या वाढल्या! वाढता वाढता वाढे त्यांची प्रगती झाली. व्हॉट्‌ टुडू विथ माय शेपूट? ह्या प्रश्‍नाला उत्तर नसल्यानेच ते उत्क्रांतीच्या कुठल्यातरी टप्प्यावर गळून पडले, असा आमचा सिद्धांत आहे. आता काय करायचे? हा प्रश्‍न सोडवण्याच्या ध्यासातच डार्विनला उत्क्रांतीचा सिद्धांत गवसला, हे शतप्रतिशत सत्य आहे. ह्याच सवालाचा जबाब शोधताना न्यूटनला गुरुत्त्वाचा शोध लागला, आणि मार्क झुकेरबर्ग ह्यास फेसबुकाची किल्ली गवसली, ह्याबद्दल आमच्या मनात तीळमात्र शंका नाही. 

‘कसा वाटला पिक्‍चर?,’’ मित्राने विचारले. चित्रपट खरोखर अप्रतिम होता. ‘चोक्‍कस,’’ ह्या अर्थी आम्ही तर्जनी आणि आंगठ्याचे वर्तुळ करून हवेत नाचिवले. चित्रपटाच्या ष्टोरीत आम्ही पुन्हा हरवून गेलो. ‘चलो जीते हैं’...किती सुंदर नाव होते चित्रपटाचे!!

...स्वामी विवेकानंदांच्या एका सुभाषितामुळे जीवनाचे सूत्र सापडलेल्या एका नेक विद्यार्थ्याची गोष्ट होती. बिचारा नरू! वडिलांच्या रेल्वे स्टेशनातील चहाच्या टपरीवर मदत करणारा, उरलेल्या वेळेत शाळा शिकणाऱ्या नरूला बालपणीच प्रश्‍न पडला : ‘‘आप किस के लिए जीते हो?’’ किती सखोल आणि अवघड प्रश्‍न!! पण नरूने हट्ट सोडला नाही. त्याने हाच प्रश्‍न आपल्या नातलगांना विचारून विचारून भंडावून सोडले...

‘आप किस के लिए जीते हो?..सांग ने!!,’’ आमचा खांदा घुसळून मित्राने आम्हाला भंडावले.

‘हा प्रश्‍न आहे की संशय?,’’ गोरेमोरे होत आम्ही विचारले. अनवधानाने ‘होय’ असे उत्तर देऊन आम्ही गाळात गेलो असतो. किसके लिए म्हंजे...जाऊ दे.
‘‘सिंपल सवाल छे, भाई...आप किस के लिए जीते हो?,’’ मित्रोंऽऽ...बता दो जरा इसको...

‘का म्हंजे? आता आलोच आहोत ह्या जगात तर दुसरे करायचे तरी काय?,’’ आम्ही.

‘आ जबाब नथी, प्रतिसवाल छे!’’ मित्राने वकिली बाण्याने आमचा डायलॉग उडवून लावला.

‘हॅ:!! ‘आप किस के लिए जीते हो?’ ह्या प्रश्‍नाचे उत्तर ‘असंच!’ असं आणि एवढंच आहे...,’’ आम्हीही आता निकराला आलो होतो.

...चित्रपटातल्या नरूने शाळेतील नाटुकल्यात काम करून मिळालेल्या बक्षिसाच्या पैशात दलित वर्गमित्राला युनिफॉर्म घेऊन दिला. वर्गमित्र पुन्हा शाळेत दाखल झाला, हे पाहून आम्हाला बगलेत फाटलेल्या सदऱ्याची कडकडून आठवण आली. आम्ही (बगल दाबून) विषण्ण मनस्थितीतच थिएटराच्या बाहेर आलो. मनावर विलक्षण परिणाम करणारे चित्रपट हल्ली फार कमी बघायला मिळतात. ‘सैराट’ चित्रपटाने आमच्यावर असेच भयंकर गारुड केले होते. तो चित्रपट पाहून आल्यावर आमचा ‘झिंगाट डान्स’ आळीत इतका लोकप्रिय झाला, की वरातीला आम्हाला हमखास बोलावणे येऊ लागले. पण ते जाऊ दे. रस्त्यातून चालत असतानाच आम्हाला तो दृष्टांत झाला...

‘चलो जीते हैं!’ हे चित्रपटाचे टायटल म्हंजे दुसरे काहीही नसून ‘हवे शुं करवानुं?’ ह्या प्रश्‍नाचे उत्तर आहे तर..!! ओहो!! काखेत कळसा नि गावाला वळसा!! ‘युरेका युरेका’ असे ओरडत आम्ही झिंगाट नाचत सुटलो. क्‍या बात है!

...इलेक्‍शन पुढ्यात आले असून ‘चलो, जीतते हैं’, ह्या आगामी चित्रपटाची आम्ही तूर्त वाट पाहात आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com