अढळ स्थान! (ढिंग टांग! )

Dhing Tang British Nandy
Dhing Tang British Nandy

सदू : (फोन फिरवत) जय महाराष्ट्र! 
दादू : (फोन उचलत) जय महाराष्ट्र...बोला! 
सदू : (चौकशी करत) कुठे आहेस? 
दादू : (थिजून जात) ही काय विचारण्याची पद्धत? कुठेही असेन!! 
सदू : (खुलासा करत) च..च...अरे मी बोलतोय...सदू! 
दादू : (सुटकेचा निश्‍वास...) तू होय! मला वाटलं की त्या मुनगंटीवारजींचा घसा बसल्यामुळे... 
सदू : (वैतागून) म्हंजे माझा आवाज मुनगंटीवारांच्या बसलेल्या घश्‍यासारखा आहे? 
दादू : (घाईघाईने) तसं नाही रे...काल त्यांचा बर्थ डे होता ना! मागल्या खेपेला त्यांनी मला फायबरचा वाघ गिफ्ट दिला होता... मी यंदा त्यांना रबराचं झाड पाठवलं! 
सदू : (संशयानं) रबराचं झाड केरळात येतं ना? इथं कशाला दिलंस? 
दादू : (ज्ञानामृत पाजत) रबराचं म्हंजे रबराने बनवलेलं खोटं खोटं झाड! ते तेरा कोटी झाडं लावत सुटलेत...म्हणून! 
सदू : (तुच्छतेने) ते जाऊ दे! तू कुठे आहेस? 
दादू : (गंभीरपणे) हा अतिशय गहन प्रश्‍न आहे! मी कुठे आहे? कुठे आहे बरं मी? आहे मी कुठं?... 
सदू : (थेट विचारत) बगल देऊ नकोस! आरक्षणाच्या प्रश्‍नावर तू सरकारच्या बाजूने आहेस की विरुद्ध बाजूनी? 
दादू : (सावध पवित्रा घेत) मी बुवा आरक्षणाच्या बाजूचा आहे!! 
सदू : (खवळून) ह्याचा अर्थ तू सरकारच्या बाजूने आहेस! 
दादू : (फेटाळून लावत) छे... मी आंदोलकांच्या बाजूचा आहे!! 
सदू : (बुचकळ्यात पडत) अरेच्चा... ही काय भानगड आहे? आंदोलकांना आरक्षण हवंय! विरोधकांना आरक्षण हवंय! सरकारलाही आरक्षण हवंय! अरे मग दुसऱ्या बाजूला आहे तरी कोण? आणि आरक्षण का रखडतंऽऽय? 
दादू : (डोकं खाजवत) हाच तर कळीचा मुद्‌दा आहे! 
सदू : (तावातावाने) ते कोकणातले नारोबादादासुद्धा आरक्षणाच्या बाजूने बोलतायत!! मला तर काही कळतच नाहीए सध्या!! 
दादू : (नेमस्तपणाने सल्ला देत) व्हेन इन डाऊट, गेट आऊट!! 
सदू : (कपाळाला आठ्या घालत) म्हंजे? 
दादू : (शांतपणे सल्ला देत) सदूराया... मी तुझा मोठा भाऊ आहे नं? माझं ऐक!! 
सदू : (थंडपणे) मी फक्‍त महाराष्ट्राचं ऐकतो... मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा!! 
दादू : (कुरकुरत)... माझं सोडून सगळ्यांचं ऐकतोस तू! 
सदू : (आणखी थंड आवाजात) तेच तर माझं धोरण आहे!! तू कुठल्या बाजूचा आहेस हे एकदा कळलं की मला सोपं जातं निर्णय घ्यायला!! 
दादू : (कोड्यात टाकत) असं समज की मी आरक्षणाच्या बाजूने आहे!! 
सदू : (विचारात पडत) ह्याचा अर्थ मला विरोधी स्टॅंड घेणं भाग आहे!! 
दादू : (युक्‍तिवाद करत) पण मी विरोधातसुद्धा आहे ना!! 
सदू : (संतापून) मग मी काय आता आरक्षणाला पाठिंबा देऊ? 
दादू : (खांदे उडवत) तुझी मर्जी!! 
सदू : (संतापून) अरे, हे काय लावलंय तुम्ही? एक काय ती बाजू घ्या ना... दरवेळी आपलं इथेही आणि तिथेही!! ह्याला काय अर्थय? सरकारच्या विरोधात ओरडताय, आणि त्याच वेळेला सरकारात जाऊन खुर्च्या उबवताय! विरोधक म्हणताय, आणि वाढदिवसाच्या भेटवस्तू देताय!! 
दादू : (पोक्‍तपणाने) तुला नाही कळणार! सोयीचं असतं ते!! 
सदू : (चिडून) शेवटचं विचारतो! तू नेमका कुठे आहेस? 
दादू : (अभिमानाने) अढळ आहे मी ध्रुवताऱ्यासारखा! हम किसीके आगेपीछे नहीं! जमाना हमारे आगेपीछे होता हय !!! 
सदू : (निर्वाणीच्या सुरात) तुझं राजकारण मला कळत नाही, दादूराया!! 
दादू : (कुजबुजत्या आवाजात गौप्यस्फोट केल्याप्रमाणे)... सदूराया, अरे ते मला तरी कुठं कळतंय? हाहा!! जय महाराष्ट्र. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com