किकी डॅन्स च्यालेंज! ढिंग टांग! 

Dhing Tang British Nandy
Dhing Tang British Nandy

डिअरम डिअर होम मिनिष्टर मा. ना. ना. ना. साहेब यांशी शिर्साष्टांग नमस्कार व साल्युट! साहेब मी एक साधासिंपल ट्रॉफिक हवालदार असून डायरेक लेटर लिहिण्याचे धाडस करीत आहे. माफी असावी! आपल्याला म्हाईत असेलच की सध्या किकी डॅन्स नावाचा एक टेन्शनवाला आयटेम रस्तोरस्ती फेमस होत आहे व त्यामुळे ट्रॉफिकचे बारा वाजताना आढळून येत आहेत. किकी च्यालेंज असे त्याला म्हणतात. "किकी डू यु लौ मी' असे विंग्रेजी गाणे म्हणत चालत्या मोटारीतून उतरायचे, दार उघडे ठिवून नाचत नाचत गाणे गात पुन्ना उडी मारून ड्रायव्हिंग शीटवर बसायचे...हे सर्व मोबाइल फोनमध्ये रेकॉर्ड करून सोसल मीडियावर टाकायचे...असा हा च्यालेंज आहे. 
साहेब, हा अत्यंत डेंजर स्टंट आहे! शहराकडली तरुण पोरे व पोरी असा च्यालेंज घेताना दिसून येत असून, बॉम्बेमध्ये माहीमच्या शिग्नलला मी काल सात पोरे पकडली. पण दंडाची पावती फाडताना कलम कोणते लावायचे? हे न कळल्याने त्यांना सोडून देणे भाग पडले. क्रुपया मार्गदर्शण करावे. आपला वा. पो. ह. चिमण गुलदगडे. माहीम शिग्नल डूटी. 
* * * 
श्री. चंदूदादा कोल्हापूरकर यांस, अत्यंत घाईघाईने हे पत्र लिहीत आहे. किकी चॅलेंज नावाच्या प्रकरणाबद्दल तुम्ही ऐकले आहे काय? ही एक गंभीर जागतिक समस्या निर्माण झाली असून, त्याचे लोण मुंबईसह महाराष्ट्रात पसरेल अशी भीती आहे. चालत्या मोटारीतून उत्तरून "किकी आय लव्ह यू' असे गाणे म्हणत फोनमध्ये रेकॉर्ड करायचे आणि नंतर सोशल मीडियावर टाकायचे, असा हा चॅलेंज आहे. ह्या प्रकारामुळे अनेक ठिकाणी चालकविरहित गाड्यांचे अपघात झाल्याच्या व्हिडिओ क्‍लिपा माझ्या पाहण्यात आल्या आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे व जिवाचे नुकसान करणारा हा प्रकार तांतडीने रोखणे गरजेचे आहे. 
...हा कुठल्या आंदोलनाचा प्रकार तर नाही ना? ह्या विचाराने अक्षरश: झोप उडाली आहे. आधीच मराठा आंदोलनांमुळे हैराण झालो आहे. हे नवे नको!! कृपया परिस्थिती हाताळावी, ही विनंतीवजा सूचना. कळावे. आपला. नानासाहेब. 
ता. क. : माझ्या गुप्तहेराने पाठवलेले पत्र सोबत जोडले आहे. 
* * * 
श्री. नानासाहेब, 
चौकशी केली. किकी चॅलेंज हे आंदोलन नाही. तसे असते तर बरेच नेते हे करताना एव्हाना दिसले असते!! इमॅजिन करा, दूधदरासाठी श्रीमान राजू शेट्‌टी किकी चॅलेंज आंदोलन करीत आहेत किंवा नाणारच्या विरोधात साक्षात मा. उधोजीरावांनी गाडीचा दरवाजा उघडला आहे!! किंवा गेला बाजार संजयजी निरुपम तरी निश्‍चितच असे आंदोलन छेडतील!! आपले शिवाजी पार्कवाल्या "मनसे' मित्रांनाही अशी अभिनव आंदोलने करायला आवडते. त्या आघाडीवर कानोसा घेतला असता शांतता आढळून आली. थोडक्‍यात, हे आंदोलन-बिंदोलन नसून इंटरनेटवरचे नसते खूळ आहे. 
किकी चॅलेंजच्या काही क्‍लिपा मीदेखील इंटरनेटवर बघितल्या. प्रकार बरा वाटला!! (मी स्वत: गाडी चालवत नाही, हे बरे आहे!) परंतु, आपल्या गिरीशभाऊ महाजन आणि विनोदवीर तावडे ह्या अतिउत्साही सहकाऱ्यांच्या हाती किकी चॅलेंजच्या क्‍लिपा पडणार नाहीत, ह्याची सर्वांत आधी काळजी घ्यायला हवी आहे. भलताच प्रॉब्लेम होऊन बसेल!! 
ता. क. : किकी चॅलेंजमुळे वाहतूक खोळंब्याची एकही घटना घडू नये, ह्यासाठी महाराष्ट्राच्या रस्त्यांमध्ये जागोजाग खड्डे निर्माण करण्याची दक्षता सा. बा. वि. ने आधीच घेतली आहे, ह्याची नम्र जाणीव करून देतो. कृपया नोंद घ्यावी!! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com