रॉबिन हुड! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

अमिरांची उडेल झोप
काळा पैसा पावेल लोप
इडा टळो, पीडा टळो
व्हिलनलोक सळो की पळो
भलाईच्या उच्छावामधी
रंगलं रातभर भारुड
रॉबिन हुड, रॉबिन हुड!

रॉबिन हुड, रॉबिन हुड
भल्ताच खुल्लाय त्याचा मूड
तीरकमठा सटासट
बाण सुटले फटाफट
गरिबांचा वाली आला
आपका अपना रॉबिन हुड
रॉबिन हुड, रॉबिन हुड!

अमिरांची उडेल झोप
काळा पैसा पावेल लोप
इडा टळो, पीडा टळो
व्हिलनलोक सळो की पळो
भलाईच्या उच्छावामधी
रंगलं रातभर भारुड
रॉबिन हुड, रॉबिन हुड!

रॉबिन हुडची ऐका गोष्ट
करा कष्ट, व्हा नष्ट
गरिबाचा तारणहार
खांद्यावरती दु:खभार
उमरावांच्या खजिन्याला
लावतो पठ्ठ्या पेटती चूड
रॉबिन हुड, रॉबिन हुड!

लीनवाणे दीनवाणे
दारिद्य्राचे बेसूर गाणे
गरिबाच्या घरावरती
क्रूर जुल्मी नांगर फिरती
अन्यायाच्या पाठीवरती
फुटला एक आसूड
रॉबिन हुड, रॉबिन हुड!

शिराळशेटचं भरलंय पोट
वरच्या खिश्‍यात हजाराची नोट
बारा खिसे, शेकडो नोटा
काळा पैसा खोटा खोटा
शिराळशेटच्या पोटामध्ये
भरलंय खच्चून जंक फूड
रॉबिन हुड, रॉबिन हुड!

किर्रर्र रात्री, भर्रर्र रानी
चेटकिणीची घुमती गाणी
पडका वाडा, भिंती गार
दीर्घायुषी भुते चार
वाड्यामध्ये घोरत पडलंय
खादाडाचे आडवे धूड
रॉबिन हुड, रॉबिन हुड!

जुलूम झाला, प्रजा पिचली
रस्तोरस्ती भुते नाचली
भिंत खचली, चूल विझली
काळ सोकला, म्हातारी चचली
काळ्याकुट्‌ट अंधारातच
तोफ उडाली धुडुमधुड
रॉबिन हुड, रॉबिन हुड!

कोण आला? कोण आला?
गोरा है या काला काला?
तीखी नजर, दणकट बूट
अमिराला म्हणतो "हूट'
शेर पळाला शेपूट दाबून
सव्वाशेर हा रॉबिन हुड
रॉबिन हुड, रॉबिन हुड!

रॉबिन म्हणतो, "सुन लो प्यारे!
उचलू नको नसते भारे
उद्या सकाळी येईल जाग
काळा पैसा पडेल महाग
मध्यरात्रीच्या ठोक्‍याला अन
तुझी माया होईल आखुड
रॉबिन हुड रॉबिन हुड!

अभी चलेगा मेरा सिक्‍का
आहे हुकमी एक्‍का
तुझ्या नोटेला विचारतो कोण?
हजार-पाश्‍शेला पैसे दोन
सत्तर वर्षाच्या उपासमारीचा
आता घेणार उल्टा सूड
रॉबिन हुड, रॉबिन हुड!

शिराळशेटने घेतला फास
दामाजीच्या घोड्याला ग्यास
तीर चढवून कमठ्यावर
रॉबिन बसतो घोड्यावर
म्हणतो, ""लेका गुमान चल,
साथ डोण्ट बी रुड''
रॉबिन हुड, रॉबिन हुड!

रॉबिन हुड हा तारणहार
रयतेचा एकच आधार
तोच डॉक्‍टर, तोच सीए
तोच मालक, तोच पीए
"हौ आर यू?'ला उत्तर असते,
फक्‍त एकच- "व्हेरी गुड!'
रॉबिन हुड, रॉबिन हुड!

रॉबिन हुड, रॉबिन हुड
भल्ताच खुल्लाय त्याचा मूड
तीरकमठा सटासट
बाण सुटले फटाफट
गरिबांचा वाली आला
आपका अपना रॉबिन हुड
रॉबिन हुड, रॉबिन हुड!

Web Title: dhing tang by british nandy