नोटबंदीचे अर्थशास्त्र! (ढिंग टांग)

नोटबंदीचे अर्थशास्त्र! (ढिंग टांग)

पहिल्याछूट आम्ही सरकारी नोटबंदीचे स्वागत करतो. जे लोक ह्या नोटबंदीस विरोध करतात ते काळाबाजारवाले आहेत, हे उघड आहे. जे लोक ह्या निर्णयाचे स्वागत करतात, त्यांच्या खिश्‍यात फुटकी कवडी नाही, हे त्याहीपेक्षा उघडे(वाघडे) आहे! ज्याअर्थी आम्ही ह्या निर्णयाचे स्वागत करीत आहो, त्याअर्थी आमच्याही खिश्‍यात फद्या नाही, हे वेगळे सांगावयाची गरज नाही. प्रस्तुत लेखक हा कमालीचा नाणावलेला (पक्षी : नाणी गोळा करीत फिरणारा) अर्थतज्ज्ञ आहे, हे वाचकांना माहीत आहेच. नोटबंदीचा निर्णय योग्य आणि उचित आणि बरोबर कसा आहे, ह्याची मीमांसा येथे केली तर बरे पडेल, असे वाटते. सर्वसामान्य अल्पबुद्धीला व अल्पतर्काला व एकंदरित अल्पडोक्‍याला झेपेल, अशा सर्वसामान्य अल्पबुद्धीने व अल्पतर्काने व एकंदरीत अल्पडोक्‍याने आम्ही ही अल्पमीमांसा करीत आहो.

मायामुक्‍ती मीमांसा : नोटबंदी हे एक आर्थिक पाऊल आहे, हा एक मोठा गैरसमज समाजात पसरला आहे. वास्तविक हे एक आध्यात्मिक पाऊल आहे. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला खिसा नसतो. माणूस मरतो, तेव्हा मुखात फारतर एखादा तांबडा पैसा घेऊन जातो. मधल्या काळाला आयुष्य असे म्हणतात. ह्याच काळात माणूस माया म्हंजेच पैसा जमवितो. ह्या पैशाच्या मोहमायेतून जिवंतपणी सुटका करणारा हा निर्णय आर्थिक कसा म्हणावा? ती मायामुक्‍तीच आहे. असो.

बाटाहटतट मीमांसा : सरकारने उचललेले हे आर्थिक पाऊल बाटाच्या दहा नंबरच्या बुटाच्या साइजचे आहे, हे कोणीही मान्य करील. बूट हा पायात घालण्याचा प्रकार आहे व पाय हा देहाचाच एक भाग आहे. बूटपाद-पार्श्‍वलत्ता न्यायाने नोटबंदीस देहिक मानावे लागेल. बाटाचा दहा नंबरचा बूट हे एक जोरकस प्रकरण आहे, हे प्रस्तुत लेखक अनुभवाने सांगू शकतो. नोटबंदीच्या सदर लत्ताप्रहारामुळे काळ्या पैशांच्या राशीवर बसलेल्यांची बैठक मोडली. नुसतीच मोडली नाही तर (दोन हजाराच्या नोटेप्रमाणे) लालंलाल झाली, असेही प्रस्तुत लेखकाचे निरीक्षण आहे. असो.

अतिसार-शंख मीमांसा : सदर नोटबंदी हे काहीसे इसबगुल ह्या सुप्रसिद्ध आयुर्वेदिक औषधासारखे आहे. त्यामुळे कोठा साफ होतोच, पण कोलेस्टेराल (पक्षी : चरबी) घटण्यास मदत होते, असे म्हणतात. प्रस्तुत लेखक काही असह्य कारणांमुळे गेली कैक वर्षे रात्री झोपण्यापूर्वी इसबगुल सेवन करीत आला आहे. अंगावर बोटभरदेखील चरबी चढली नाही, हे सत्य आहे!! अजीर्ण, अतिसाराने बेजार झालेल्या एका देवळातील पुजाऱ्यास पथ्य म्हणून काही दिवस शंख न फुंकण्याचा आरोग्य सल्ला एका आयुर्वेदाचार्याने दिला होता. तो आठवावा! नोटबंदी हे असेच एक पथ्य आहे. शंख अनेशापोटी फुंकणे बरे पडते. "बरे पडते' ह्याचा अर्थ बरे "असते'!! ह्याच अतिसारशंख न्यायानुसार नोटबंदीला अतितीव्र स्वरात विरोध करणाऱ्या विरोधकांच्या वेदना समजून घेण्यासारख्या आहेत. असो.

परगोचीसुख मीमांसा : घरबसल्या आपली कामे झाली तर आपल्याला फार्फार बरे वाटते. त्याचवेळी दुसऱ्याच्या कामात लोच्या झाला की अधिक बरे वाटते, हा मानवी स्वभाव आहे. उदाहरणार्थ, आपल्या घरात दहा-दहाच्या नोटांचे बंडल निघावे, आणि खिश्‍यात हजार-पाश्‍शेच्या नोटी नाचवणाऱ्या नतद्रष्ट, उद्‌दाम, उधळ्या वृत्तीच्या शेजाऱ्याच्या तोंडास फेस यावा, ह्या मानसचित्राने भलतेच छॉन वाटते. ह्याला परगोचीसुख न्याय असे म्हणतात. प्रस्तुत लेखक प्रस्तुत मीमांसा (रिकाम्या खिश्‍यांनिशी) लिहीत असतानाच अनेकजणे ब्यांकेसमोर रांकेत उभे आहेत. नोटा बदलून आल्यावर आम्ही त्यांच्याकडून उसनवारी करूच. रांगेचा फायदा सर्वात ज्यास्त आम्हांस आहे! तेव्हा नोटबंदी ही सुखकारक गोष्ट आहे, हे कोणालाही पटावे! ज्याला पटणार नाही, त्यास "बुरी नजरवाले तेरा पैसा काला' असेच आम्ही म्हणतो व ही मीमांसा संपवितो. नमोनम:.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com