सुट्‌टे! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ : खुळखुळाटाची.
काळ : पन्नास दिवस थांबलेला!
प्रसंग : कडकीचा!
पात्रे : मऱ्हाटीहृदयसम्राट राजाधिराज उधोजीराजे आणि... वज्रचुडेमंडित सौभाग्यवती कमळाबाई.

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ : खुळखुळाटाची.
काळ : पन्नास दिवस थांबलेला!
प्रसंग : कडकीचा!
पात्रे : मऱ्हाटीहृदयसम्राट राजाधिराज उधोजीराजे आणि... वज्रचुडेमंडित सौभाग्यवती कमळाबाई.

प्रसंग बांका आहे. अंत:पुराची दारे-खिडक्‍या बंद करून कमळाबाई कपाटातला चिल्लरखुर्दा मोजीत आहेत. अधूनमधून चाहूल घेत आहेत. तेवढ्यात दाराची कडी वाजते. अब आगे...
उधोजीराजे : (मिशीवरून बोट फिरवीत) अहम...अहम...कडी!
कमळाबाई : (दचकून) कोण आहे?
उधोजीराजे : (उतावीळपणाने) अहो, कडी काढा कडी! लौकर!!
कमळाबाई : (धसका घेत) मी नाही कडी काढायची!
उधोजीराजे : (दर्पोक्‍तीने) आमचा अंत पाहू नका, राणीसाहेब! कडी काढा! अनर्थ होईल!! तुम्ही कडी काढली नाहीत तर... तर... काढा हो कडी आता!
कमळाबाई : (कोपऱ्यातील कंदिलाकडे नजर टाकत) हे पाहा, माझ्याकडे दिवा आहे... दिव्यात तेलदेखील आहे... वात जळत्ये आहे... काही वाईट विचार असेल तर...
उधोजीराजे : (बांध फुटून) च्यामारी, उघडा ना दरवाज्याऽऽ... असं काय करता? बाहेर डास फोडताहेत आम्हालाऽऽऽ आणि...
कमळाबाई : (दार उघडून पाठ फिरवून गवाक्षाकडे उभ्या राहत) आज बरी आठवण झाली आमची? तीही अश्‍या अपरात्री?
उधोजीराजे : (च्याट पडत) अपरात्री? अहो नऊसुद्धा वाजले नाहीत! अजून "खुलता कळी' चालू आहे घराघरात!! (पलंगावरील चिल्लरखुर्द्याकडे नजर टाकत) ओहो, संपत्तीची मोजदाद चालली होती वाटतं!!
कमळाबाई : (नाक फुगवून) इतकं काही हिणवायला नको! प्रत्येक गृहिणीला बचत करायची सवय असते! ही आमची बचत ब्यांकच आहे!
उधोजीराजे : (संयमाने) अहो बाई, अवघी दौलत तुमच्या पायाशी लोळण घेत आहे! लक्ष्मी तुमच्या घरी मिनरल वाटर भरत आहे! प्रत्यक्ष कुबेर तुमच्या घरी सुवर्णाच्या कढईत कांचनाचे कांदेपोहे फोडणीला टाकत आहे!... अशा ऐश्‍वर्यकाळात तुम्हाला ह्या चिल्लरखुर्द्याची काय पत्रास?
कमळाबाई : (सुस्कारा सोडत) निराधार गरीब माणसाला अखेर अडचणीच्या काळात ही चिल्लरच कामी येत्ये...
उधोजीराजे : (कपाळावर हात मारत) तुम्ही कसल्या निराधार? उलट तुम्हीच ह्या दौलतीच्या आधारस्तंभ आहात! चांगला ह्या...ह्या...ह्या साइजचा स्तंभ!!
कमळाबाई : (फणकाऱ्यानं) इतकं काही टोचून बोलायला नको! काही कुणाच्या तोंडचा घास पळवून हा देह नाही वाढवला! आम्ही काय कुणाचे खातो? श्रीराम आम्हाला देतो... कळलं? इतक्‍या अपरात्री आमच्या महालात येण्याचं कारण?
उधोजीराजे : (हुश्‍श करत पलंगावर बसत) मोहिमेवर गेलो होतो... दिवसभराच्या दौडीनंतर येतो आहे!!
कमळाबाई : (कुतूहलाने) अग्गो बाई! कसली मोहीम? फत्ते झालीच असणार!
उधोजीराजे : (हताशेनं) छे, सपशेल अपेशी ठरलो! एक एटीएम धड चालू असेल तर शप्पथ! एरवी, लाथ मारीन तिथं पाणी काढणारा हा उधोजी ब्यांकेतून दोन हजार रुपयेदेखील काढू शकला नाही!! जगदंब जगदंब!! आई आमची परीक्षा पाहत आहे बहुधा!! (चमकून) पण तुम्ही दार लावून चिल्लर का मोजत बसला होतात?
कमळाबाई : (पदर घट्‌ट खोचत) हल्ली मेलं कुणीही येतं नि सुट्‌टे मागतं! आम्ही म्हंजे काय एटीएम आहोत?
उधोजीराजे : (चपापत) तेही खरंच म्हणा! पण...
कमळाबाई : (अभिमानाने)... हा चिल्लरखुर्दा आमच्या घामाचा पैसा आहे, आणि हल्ली चिल्लरला किती भाव आहे, माहितीये ना? सुट्‌टी नाणी आणि धा-धाच्या नोटा मिळून पुरे बाराशे रुपये निघाले!
उधोजीराजे : (खजील होत) बाप रे! तुम्ही भलत्याच श्रीमंत आहात, राणीसाहेब!
कमळाबाई : (पाय हापटून) आहेच्च मुळी! पण असं अपरात्री आमच्या महालाची कडी वाजवणं शोभलं नाही हं तुम्हाला! सांगून ठेवते!
उधोजीराजे : (चाचरत) जरा काम होतं म्हणून...
कमळाबाई : (चिल्लर गोळा करून डब्यात भरत) काय काम होतं म्हणायचं?
उधोजीराजे : (खिश्‍यातून पाचशेची जुनी नोट काढून) जरा सुट्‌टे देता का?

Web Title: dhing tang by british nandy