दस का दम! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

आमचे एकमेव दिशादर्शक, मार्गदर्शक आणि नुसतेच दर्शक जे की रा. नमोजीहुकूम ह्यांनी नोटाबंदीनंतर आम्हाला तांतडीची दहा प्रश्‍नांची प्रश्‍नावली पाठवून आमची बहुमूल्य मते जाणून घेण्याचे औचित्य साधले, ह्याबद्दल आम्ही त्यांचे शतप्रतिशत आभारी आहोत. वास्तविक जनतेची मते जाणून घेण्यासाठी रा. नमोजी ह्यांनी देशातील कुठल्याही एटीएमसमोरील रांकेत नंबर धरला असता, तरी त्यांना सवासो करोड देशवासीयांची मते उभ्याउभ्या कळली असती. पण ते जाऊ दे. प्रश्‍नपत्रिका सोडविण्यासाठी आम्ही लहानपणापासूनच फारसे सुप्रसिद्ध आणि उत्सुक नव्हतो. तरीदेखील देशासाठी एवढे करणे भाग आहे. सदर प्रश्‍न आणि आमची उत्तरे येणेप्रमाणे :

1. देशामध्ये काळा पैसा आहे, असे वाटते का?
उत्तर : कधी कधी वाटते, कधी कधी नाही! पण आमच्याकडे काळा पैसाच काय, पांढरी फुटकी कवडीदेखील नाही, ह्याचे भारी वैषम्य वाटते.

2. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या राक्षसाला आपण हरवू, अशी खात्री वाटते का?
उत्तर : काळ्या पैशाचा राक्षस? परवा परवापर्यंत तर तो देवदूत म्हणून मिरवत होता. राक्षस पार्टीत गेला?

3. काळ्या पैश्‍याविरुद्ध सरकारने केलेल्या कारवाईबद्दल काय वाटते?
उत्तर : ह्या प्रश्‍नाचे उत्तर आमच्याच एका किश्‍शात दडले आहे. तो किस्सा असा : दाढ ठणकत असल्याने आम्ही डाव्या गालावर हात ठेवून सुविद्य पत्नीस बोबड्या स्वरात दंतवैद्याचा पत्ता विचारला. ऐकण्यात गफलत होऊन पत्नीने मूळव्याधीच्या डॉक्‍टराकडे पाठवले... डाव्या गालावरचा हात आम्ही आता काढला असून, तो अन्य ठिकाणी ठेविला आहे. काही कळले? नसेल तर जाऊ द्या.

4. भ्रष्टाचाराविरुद्ध सरकारने केलेल्या कारवाईबद्दल काय वाटते?
उत्तर : अजूनही आम्ही सुरण, पालक, ताक... हेच खातो आहोत! बद्धकोष्ठ झाले असल्यास "मेरे प्यारे देशवासीयों...' असे स्वत:शीच ओरडतो. ह्या उपायामुळे (जगण्याचा) मार्ग सुकर झाला असून, बराच उतार पडला आहे. थॅंक्‍यू!

5. पाश्‍शे व हजारच्या नोटा बाद करण्याबद्दल काय वाटते?
उत्तर : ह्या नोटांसाठी आम्हाला व्यवस्थेने आधीच बाद केले होते. किंबहुना त्या क्‍यान्सल झाल्यानंतरच आम्ही पहिल्यांदा पाहिल्या! आमचे सुविद्य पत्नीस आम्ही पाच दिवसांपूर्वी हजार रुपये उसने मागितले होते. सुविद्य पत्नी "नाही' म्हणाली! तू विधवा होशील असा शाप ओठांवर आला होता, पण भ्रष्टाचाराच्या आरोपापेक्षा आत्महत्येचे पातक अधिक भयंकर, असे वाटून शाप दिला नाही. आठ नव्हेंबरच्या मध्यरात्री सुविद्य पत्नीने तीजकडील तूरडाळीच्या डब्यातील रक्‍कम रोख रुपये पाच हजार फक्‍त आमचे हाती ठेविली. ते बदलून गेले पंधरा दिवस ब्यांक टू ब्यांक हिंडतो आहे. असो.

6. नोटाबंदीने दहशतवादी, काळा बाजारवाले, भ्रष्टाचारवाले ठिकाणावर येतील असे वाटते का?
उत्तर : सांगता येत नाही. पण सुसंस्कृत समाज, धुतले तांदूळ आणि सचोटीवाले शेफारतील, ही खात्री आहे. अशा लोकांचा येळकोट जाता जात नाही! असो.

7. नोटाबंदीने घराच्या किमती, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था सुधारेल असे वाटते का?
उत्तर : आमचे आरोग्य ठणठणीतच आहे. देवकृपेने चार-पाच अपत्ये झाली. तीही ठणठणीत आहेत. शिक्षणावर फार वेळ व पैसा खर्च करू नये, हे आमचे लहानपणापासूनचेच मत नव्हे, व्रत आहे! घराच्या किमतींचे म्हणाल तर कमी होऊन होऊन होणार किती?

8. नोटाबंदीमुळे होणारा त्रास सहन करणार ना?
उत्तर : कसला त्रास? छे, अजिबात्त नाही! छान... छान चाल्लंय...! अप्रतिम!! आईग्ग!!

9. काही भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्तेच दहशतवाद, भ्रष्टाचार आणि काळ्या पैश्‍याचे समर्थन करीत आहेत का?
उत्तर : स्वकीयांवर असा आरोप करणे अनुचित वाटते. निषेध!

10. पंतप्रधानांना कुठल्या सूचना कराव्याश्‍या वाटतात?
उत्तर : तुम्ही परदेश दौऱ्यावर असलात की फार बरे वाटते! असो.

Web Title: dhing tang by british nandy