प्रजाजनांस हवे तरी काय? (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

कोणे एके काळी यमुनेच्या तीरावर कौडिण्यपूर नावाचे साम्राज्य होते. तेथे सम्राट नमोदत्त नावाचा राजा सुखनैव राज्य करीत होता. राजा नमोदत्त कनवाळू, प्रजाप्रेमी आणि न्यायी होता. त्यास सदोदित प्रजाकल्याणाची आस असे. आपले प्रजाजन सुखी व्हावेत, त्यांच्या घराघरातून सोन्याचा धूर निघावा, समाजकंटकांचे समूळ उच्चाटन व्हावे, ह्यासाठी तो अहर्निश दक्ष असे. "राजा हा नावापुरताच राजा असतो, वस्तुत: तो एक सामान्य सेवक असतो,' असे तो वारंवार म्हणत असे. प्रजाजनांची अवस्था बघून त्याच्या डोळ्यांत वारंवार पाणी येई. भावनावश होऊन त्याला रडू येई. "माहेरची साडी' नामक चित्रपट त्याने एकूण बहात्तर वेळा पाहिला व तो सत्त्याहत्तर वेळा रडला, अशी एक रूदंतकथा होती.


राज्यारोहणानंतर त्याने लगोलग कौडिण्यपुराभोवती खंदक खणावयास घेतला. जागोजाग पहारे बसवून शत्रूराष्ट्राच्या सैन्याची नाकेबंदी केली. आपल्या सजग सैन्यास अहोरात्र पहारा करण्यासाठी भरपूर तेल पुरविले. जेणेकरून सैन्याने डोळ्यांत तेल घालून पहारा करावा. वेषांतर करून तो स्वत: रात्री अपरात्री कौडिण्यपुराच्या रस्त्यांवरून हिंडू लागला. गरीब प्रजाजन उपाशी झोपतात व श्रीमंत लोक अजीर्णाने हैराण होतात, हे पाहून त्याने संपत्ती एकमेकांत वाटून घेण्याचा आदेश फर्माविला. एक वडापाव खाऊन राहतो तो गरीब व एकावेळी दोन वडापाव खातो तो श्रीमंत अशी साधीसोपी व्याख्या त्याने केली. काळा पैसा शोधून काढून तो गरिबांमध्ये वाटावा, ह्या ईर्ष्येपोटी त्याने जागोजाग खणत्या लावल्या व श्रीमंतांच्या हवेल्या, चाळी, झोपड्यांवर कुदळ चालविली. त्यात त्यास अगणित संपत्ती गवसली. ती सारी त्याने लोककल्याणासाठी खर्च करण्याचे ठरविले. कालांतराने त्यास लक्षात आले, की सर्व तमोगुणांचे मूळ नाण्यात सामाविलेले आहे. राजकीय टांकसाळीत पाडलेली नाणी जनताजनार्दनास मतिभ्रष्ट करीत असून, ही नाणीच बाद केली पाहिजेत. राजा नमोदत्ताने फतवा काढून नाणीच बाद करून टाकली. सुरवातीला जनलोक कुरकुरले, पण लौकरच नाण्याविना जगण्यास शिकले. नमोदत्ताने प्रधानजीस फर्माविले. "नाण्याविनाही माझी प्रजा सुखात आहे की नाही? ह्याचा एक गुप्त रिपोर्ट काढून मजकडे पाठवावा!' यथावकाश प्रधानाने नाण्याविना प्रजा असुखी असल्याचा निष्कर्ष राजा नमोदत्तास कळविला. नमोदत्त चिंताक्रांत जाहला. असे का बरे व्हावे? नमोदत्ताच्या राज्यात सर्वात बुद्धिमान असा जो की विदूषक ह्यास त्याने जनलोकांच्या असुखीपणाचे कारण विचारले.


"विदूषका, मी प्रजाजनांसाठी इतके काही करितो, तरी प्रजा असुखी का? समाजातील भ्रष्टता, अस्वच्छता दूर करण्यासाठीच त्यांनी मजला सिंहासनी बसविले ना? मी तेच करितो आहे, तर आता न्यून कोठे राहिले?'' खिन्नपणाने राजा नमोदत्ताने विचारिले.
"हे राजा, भ्रष्टता आणि अस्वच्छता हटविण्यासाठी आपणांस प्रजेने येथे प्रतिष्ठापित केले हे खरे. आपण ते करता आहा, हेही खरे, पण...'' किंचित खाकरून बुद्धिमान विदूषक म्हणाला, ""आपण त्यांची नियती बनू पाहत आहा! सामान्य माणूस हा अधिकार प्रत्यक्ष परमेश्वरालाही कधी देत नाही. मग तुमचा काय पाड?''
"मग आमचे चुकले तरी काय?'' कपाळ चोळत नमोदत्ताने विचारिले.
"उंटाचा मुका घेणाऱ्या अरबाची गोष्ट आपणांस ठाऊक आहे काय? लाडक्‍या उंटाच्या विद्रूप मुखाचा वास येतो म्हणून एका अरबाने उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका...'' विदूषकाचा सल्ला पूर्ण झाला नाही.
...त्याच्या शिरच्छेदाची तारीख मुक्रर झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com