वजनमापे! (ढिंग टांग)

ब्रिटीश नंदी
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

प्रति,
श्रीमंत नानासाहेब फडणवीस,
सध्या मुक्‍काम नागपूर,
(सध्या) महाराष्ट्रच!

प्रति,
श्रीमंत नानासाहेब फडणवीस,
सध्या मुक्‍काम नागपूर,
(सध्या) महाराष्ट्रच!

विषय : आमदारांची वजनमापे काढण्यासंबंधी.
महोदय,
राज्य आरोग्य विभाग आणि जेटी फौंडेशनच्या संयुक्‍त विद्यमाने विधिमंडळ आवारातील आरोग्य केंद्रात वजनदार आमदारांची मापे काढण्याचा एक दिवसाचा कार्यक्रम बुधवारी रोजी सात माहे डिसेंबर वीसशेसोळा या दिवशी संपन्न करणेत आला. सदर कार्यक्रमास सहभागी होणे अनिवार्य होते व आपल्या व्हीपनुसार प्रस्तुत आमदार तेथे हजेरी दाखवून आला. श्रीरामकृपेने व श्रीनमोजीकृपेने व श्रीदेवेंद्रकृपेने सदर आमदारास कुठलीही धाड भरलेली नसल्याचे आरोग्य चाचणीत निदान झाले. तथापि, ह्या आरोग्य चाचणीमुळे आमदार-नामदारांची भयंकर गोची होत असल्याचे आढळून आल्याने हा उपक्रम तांतडीने थांबवावा, अशी विनंती आहे.

नागपूर येथील विधिमंडळाचे आवारात स्थापित असलेल्या आरोग्य केंद्रात महाराष्ट्राच्या आमदार-नामदारांची दिवसाढवळ्या मापे काढण्यात आली. हा प्रकार जनतंत्राच्या मूलतत्त्वांना धरून नाही. किंबहुना "जनतंत्र' महत्त्वाचे की "वजनतंत्र' हे ठरविण्याची वेळ आता आली आहे!! ह्या आरोग्य चाचणीच्या दिव्यातून एक आमदार ह्या नात्याने आम्हालाही जावे लागले.
...आरोग्य केंद्रात गर्दी होती. अनेक आमदारे ब्यांकेसमोर उभी राहावीत, तशी रांग धरून उभी होती. रांगेमुळे गैरसमज झालेल्या एकदोघा वाटसरूंनी आम्हाला "क्‍याश आली का भाऊ?' असेही विचारले!! पण इथे सगळे क्‍याशलेस आहे, हे सांगितल्यावर ते निघून गेले. रांगेत माझ्यासमोर आ. प्रवीणभाऊ दरेकर हैराण चेहऱ्याने उभे होते. मी विचारले की "भाऊ, इतके उदास का?' तर त्यांनी "इंजेक्‍शन देतात का?' असे खोल आवाजात विचारले. असो.

केंद्रात आतमध्ये डॉ. ज्योतीताई तोडकर म्हणून डॉक्‍टर होत्या. समोर येणाऱ्या प्रत्येक आमदाराचे अन्न तोडणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, असा समज ह्या तोडकर म्याडमचा झाला असावा, असा आमचा वहीम आहे. कारण गेल्या गेल्या त्यांनी आम्हाला "सकाळी काय खाल्लंत? असे विचारले. तीन प्लेट चनापोहा, तीन कोप चहा आणि दोन प्लेट सामोसे ह्यापलीकडे पोटात अन्नाचा कण नाही, असे आम्ही सांगितल्यावर त्यांनी आम्हाला चक्‍क बाहेर घालवले!! नमोजीकृपेने आमच्या नखात रोग नाही, नि रक्‍तात साखर!! जीभ आणि राजकारणात साखर असली, की आमचे काम भागते!! असो.
मुख्यमंत्र्यांनी जिद्दीने बावीस किलो वजन उतरवले असून, आणखी दहाबारा किलोनी घटवले तर त्यांचे राजकीय वजन चौपट वाढेल, असे आम्हाला प्रवीणभाऊ ह्यांनी आरोग्य केंद्राच्या रांगेत (कानात) सांगितले. इतकेच नव्हे तर "मुख्यमंत्री जे करतात, ते तुम्हीही केलेत, तर तुम्हीही एक दिवस मुख्यमंत्री व्हाल,' असा सल्लाही त्यांनी दिला. रांगेतील सर्वांनाच त्यांनी हे सांगितल्याचे नंतर ध्यानात आले!

साहेब, राजकारणात येणे आणि तग धरून राहणे, हे सध्या किती जिकिरीचे झाले आहे, हे आपण जाणताच. हल्ली विलेक्‍शनला उभे राहतानाच आपली मिळकत, कुंडली आदी सारे काही पब्लिक करावे लागते. नोटाबंदीनंतर तर खिच्यात किती रोकड आहे, हेही दाखवावे लागत आहे. (खुलासा : माझ्या खिच्यात नकद चौरेचाळीस रुपये सुट्टे इतकी क्‍याश आहे.) आता आपल्या कमरेचे माप किती आहे, हेही पुढाऱ्यांनी जाहीर करावयाचे का? माणसाच्या स्वातंत्र्यावर एखाद्याने किती वजनदार गदा आणावी, ह्याला काही लिमिट आहे की नाही? तेव्हा हा उपक्रम ताबडतोब बंद करावा ही कळकळीची विनंती. आपला. एक अनामिक आमदार.
वि. सू : आरोग्य केंद्रात आलेल्या प्रत्येक आमदाराला मुख्यमंत्री व्हायचे आहे, हे ध्यानी घेऊन तरी हा उपक्रम बंद करावा, ही विनंती. सगळे ठणठणीत आहेत!!
आपला ए. अ. आ.

Web Title: dhing tang by british nandy