भेट! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

वाचकहो, सात लोककल्याण मार्ग, नवी दिल्ली येथे गुरुवारी ऐतिहासिक, परंतु अत्यंत गुप्त अशी एक भेट झाली. ही भेट इतिहासाचा डोळा चुकवून झाली असल्याने त्याची कोठल्याही दफ्तरात नोंद नाही की कुठल्याही बखरीत तळटीप नाही. कोठल्याही टीव्ही च्यानलाकडे ह्या थरारक भेटीचा तपशील नाही, की कुठल्याही वृत्तपत्राच्या स्तंभात तीस जागा नाही. तरीही ही भेट ऐतिहासिकच म्हणावी लागेल. कारण ह्या...ह्या...ह्या भेटीतच आपला सह्याद्री हा आरवली पर्वताला भेटला! आपला वडापाव ढोकळ्याला भेटला आणि आपला महाराष्ट्राचा ढाण्या वाघ गीरच्या सिंव्हाला भेटला!! सांगण्यास अत्यंत आनंद होतो की इतिहासास अंमळ डोळा लागताना झालेल्या ह्या भेटीचे आम्ही एकमेव साक्षीदार आहो!!


काळ थांबलेला होता. वेळ टळलेली होती. प्रसंग बाका होता...स्थळ : 7, लोककल्याण मार्ग, नवी दिल्ली. वेळ : अज्ञात. पात्रे : राजे उधोजीराजे आणि बाळराजे विक्रमादित्य.
विक्रमादित्य : (कुतूहलाने) बॅब्स... ह्या बंगल्यासमोर गर्दी कसली आहे?
उधोजीराजे : (चूप करत) गप्प बैस... इथली सिक्‍युरिटी जाम टाइट असते, म्हाइतेय का? रांगेत उभा राहा नीट!
विक्रमादित्य : (बालसुलभ कुतूहल कंटिन्यु...) बॅब्स... इथे पण नवसाला पावणारा लालबागचा राजा आहे?
उधोजीराजे : (दटावत) चूप!
विक्रमादित्य : (सपशेल दुर्लक्ष करत) बॅब्स... इथे एटीएम आहे?
उधोजीराजे : (चिमटा काढत) आता गप्प बसायला काय घेशील?
विक्रमादित्य : (खेळकरपणाने) दोन हजाराची नवी नोट!
उधोजीराजे : (दातओठ खात) बांदऱ्याला घरी चल, मग तुला दाखवतो!
विक्रमादित्य : (सदरा ओढत) सांगा ना बॅब्स... इथे बॅंक आहे का? लोकं रांगेत का उभे आहेत?
उधोजीराजे : (हळू आवाजात) ...इथे किनई आपले नमोजीकाका राहतात!!
विक्रमादित्य : (निरागसपणाने) ते आपल्याला नोटा बदलून देणारेत?
उधोजीराजे : (असहाय्य आवाजात) म्हणून मी तुला कुठं नेत नाही! (संयमानं) हे बघ, आपला नंबर आला की आपण आत जायचं! आत गेल्यावर शहाण्यासारखं वागायचं! खुर्चीवर बसून पाय रपारपा हलवायचे नाहीत! कळलं?
विक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्याने) मग ते मला चॉकलेट देतील?
उधोजीराजे : (स्वत:शीच) ते सगळ्यांनाच चॉकलेट देत आले आहेत! (स्वत:ला आवरून) नाही... पण ढोकळा देतील कदाचित!
विक्रमादित्य : (नाक मुरडत) मला केक हवा!
उधोजीराजे : (समजूत घालत) अरे, ढोकळा हासुदधा एक प्रकारचा केकच असतो!!
विक्रमादित्य : (निग्रहानं) हॅ:!!...ढोकळा हा काय केक आहे? उद्या ठेपल्याला पिझ्झा म्हणाल!
उधोजीराजे : (शरणागती पत्करत) बरं ऱ्हायलं!
विक्रमादित्य : (शंका येऊन) नमोजीकाकांना काय सांगायचंय आपण? म्हंजे का आलात असं विचारलं तर...
उधोजीराजे : (मनातल्या मनात घोकत) त्यांना सांगायचं की नोटबंदीमुळे सगळा लोच्या झाला असून, हे आम्ही सहन करणार नाही!! काय भयानक परिस्थिती आहे, त्याचं वर्णन करायचं!
विक्रमादित्य : (आश्‍चर्यानं) हे तुम्ही त्यांना खरंच सांगणार?
उधोजीराजे : (छाती ताणत) सोडतो की काय!! मराठी बाणाय आमचा... एक घाव दोन तुकडे!!
(...इतक्‍यात नंबर लागला. राजे आणि बाळराजे बंगल्यात शिरले.)
नमोजी : (दिलखुलास हसत) आवो आवो उधोभाय!! केम छो? बद्धा सारू छे ने? अरे आपडो नान्हो प्रिन्स पण आव्या छे!! केम छो प्रिन्सभाई?
उधोजीराजे : (मराठी बाणा विसरून) काही नाही, सहज आलो भेटायला! एका लग्नाला दिल्लीत आलो होतो! म्हटलं, गेल्यासरशी आपल्या माणसांना भेटून घ्यावं!!
नमोजी : (डोळे बारीक करत) नोटबंदीबद्दल तुमच्या ओपिनियन काय हाय?
उधोजीराजे : (गाडी फुल्ल यू टर्न...) फस्क्‍लास!! तुमचं चालू द्या!!
(...बस्स. इतकीच भेट झाली. कारण तेवढ्यात इतिहास नेमका जागा झाला!! असो.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com