व्याघ्र आणि केसरी! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 14 डिसेंबर 2016

स्थळ : मातोश्री, वांद्रे.
वेळ : व्यायामाची.
प्रसंग : घाम गाळण्याचा.
पात्रे : वजनदार!

स्थळ : मातोश्री, वांद्रे.
वेळ : व्यायामाची.
प्रसंग : घाम गाळण्याचा.
पात्रे : वजनदार!

विक्रमादित्य : (धाडकन दार उघडून) हाय देअर...मे आय कम इन बॅब्स?
उधोजीसाहेब : (निक्षून) नोप!
विक्रमादित्य : (दारातच उभे राहून) तुम्हाला भेटायला महाराष्ट्र केसरी आलाय!
उधोजीसाहेब : (कपाळाला आठ्या...) कोण?
विक्रमादित्य : (दाराच्या चौकटीला लोंबकळत) म-हा-रा-ष्ट्र के-स-री!! म्हंजे लायन ऑफ महाराष्ट्रा!!
उधोजीसाहेब : (हात उडवत) महाराष्ट्रात सिंव्हबिंव्ह नसतात! वाघ असतात!!
विक्रमादित्य : (कमरेवर हात ठेवून) बोरिवली नॅशनल पार्कात मी स्वत: पाहिलेत! विथ माय ओन आइज!!
उधोजीसाहेब : (नाक मुरडत) नोटाबंदीमुळे दारोदार फिरणाऱ्या कंगाल श्रीमंतासारखे दिसणारे ते कसले सिंव्ह? दात पडलेले, नखे तुटलेली, आयाळ झडलेली!! ह्या:!! महाराष्ट्र म्हंजे ढाण्या वाघाचं घर आहे, मिस्टर!!
विक्रमादित्य : (मॅटर ऑफ फॅक्‍टली...) खरंच महाराष्ट्र केसरी तुम्हाला भेटायला आलाय!! कुस्ती चॅम्पियन!! काय बॉडी आहे माहिताय!! सॉल्लिड!! रोज बाराशे जोर मारतात म्हणे!! वॉव!!
उधोजीसाहेब : (खचून जात) बाराशे? बाप रे!! (कळवळून) नका रे कुस्त्या खेळू!! उगीच स्वत:ची हाडं खिळखिळी करून घेण्याची लक्षणं!! एकमेकांच्या लंगोटात बोटं खुपसून एकमेकांना उलथंपालथं करण्यात काय हशील आहे? माणसानं कसं छान व्यवस्थित सभ्य खेळ खेळावेत!
विक्रमादित्य : (ओठ पुढे काढून) उदाहरणार्थ?
उधोजीसाहेब : (घाईघाईने सुचवत) उदाहरणार्थ क्‍यारम!! बुद्धिबळ!! मांडींडाव!! झब्बू!!...झब्बूकेसरी किंवा क्‍यारम केसरी आणा, लगेच भेटीन!! ह्या कुस्तीवाल्याला म्हणावं, उद्या या!! जा!!
विक्रमादित्य : (निरागसपणाने) त्यांना "उद्या या' असं कोणी सांगायला तयारच नाही बॅब्स!! मघाशी मिलिंदकाका दरवाजावर होता ना त्यानं "काय काम आहे?' असं त्यांना विचारलं तर-
उधोजीसाहेब : (आवंढा गिळत) तर काय?
विक्रमादित्य : (इनोसंटली) तर त्या महाराष्ट्र केसरीनं दंडातली बेटकुळी उडवून दाखवली! मिलिंदकाका कानाला फोन लावून जो गायब झाला, तो झालाच! तुम्ही शूर आहात! तुम्हीच सांगा ना!!
उधोजीसाहेब : (दचकून) मी? नको, तूच सांग!!
विक्रमादित्य : (समजूत घालत) बॅब्स...महाराष्ट्र केसरी असला तरी माणूस कमालीचा सभ्य आहे! काखेत लिंबं घेऊन फिरल्यासारखे हिंडणारे हे कुस्तीगीर मनानं फार रोम्यांटिक आणि हळवे असतात!!
उधोजीसाहेब : (हवेत बोट नाचवत) ती "तुझ्यात जीव रंगला' मालिका बघून बघून हे शिकलास ना?
विक्रमादित्य : (ठामपणाने) बॅब्स...ऐका माझं तुम्ही त्या लायन ऑफ महाराष्ट्राला भेटाच! आफ्टरऑल यू आर टायगर ऑफ महाराष्ट्रा!!
उधोजीसाहेब : (गोरेमोरे होत) काहीत्तरीच बोल्तोस बाबा!! मी स्ट्राइप्सचा शर्ट घातलाय म्हणून वाघ म्हणतोयस ना!!
विक्रमादित्य : (निरागसपणाने) नोप...जोवर तुझे बाबा आहेत, तोवर महाराष्ट्रातून वाघ नामशेष होणार नाही, असं मला मुनगुंटीवारकाकांनी मागेच सांगितलं होतं...त्याअर्थी तुम्ही महाराष्ट्र व्याघ्र आहात! हो ना?
उधोजीसाहेब : (दंड थोपटत) आहेच मुळी! आम्हाला नडणाऱ्यांची आम्ही मराठी माणसं इथंच थडगी बांधतो, हा इतिहास आहे! वाघाची डरकाळी ऐकलीये का कधी? बरं...कुठे आहे तुमचा तो महाराष्ट्र केसरी? चला भेटूया!! त्याला सांगतो, की शाब्बास माझ्या सिंव्हा!! आता हिंद केसरीची कुस्ती मार, मी हिकडे महापालिकेची कुस्ती मारतो!!
विक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्यानं) चला!! बाहेर हॉलमध्ये वाट पाहताहेत! वाघ आणि सिंहाची गळाभेट!! धम्माल येईल!!
उधोजीसाहेब : (सावधपणाने) हो पण...पण...त्याच्या खांद्यांवर गदा आहे का? ते बघून ये बरं पटकन..प्लीज!!

Web Title: dhing tang by british nandy