गौप्यस्फोट! (ढिंग टांग)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

‘‘एरवी आपण कुणाच्या अध्यात मध्यात नसतो. पण कुणी नडिंग केली तर मग सोडणार नाही...काय?,’’ त्याने आमची बाही ओढत त्याचे स्वभाववैशिष्ट्य सांगितले. आम्ही च्याटंच्याट पडलो.

‘‘नडिंग नाय पायजे!,’’ बाही सोडवत आम्ही ‘काय?’ला उत्तर दिले.

‘‘एरवी आपण कुणाच्या अध्यात मध्यात नसतो. पण कुणी नडिंग केली तर मग सोडणार नाही...काय?,’’ त्याने आमची बाही ओढत त्याचे स्वभाववैशिष्ट्य सांगितले. आम्ही च्याटंच्याट पडलो.

‘‘नडिंग नाय पायजे!,’’ बाही सोडवत आम्ही ‘काय?’ला उत्तर दिले.

‘‘मी फार वेगळा माणूस आहे...काय?,’’ पुन्हा सदऱ्याची बाही ओढत तो राजबिंडा तरुण म्हणाला. त्याच्या नजरेत वेगळीच झांक दिसत होती. माणूस दिसतोय खरा वेगळा! वेगळे व्यक्‍तिमत्त्व दिसले की आम्ही आपोआप तेथे ओढले जातो. देखणे हसत त्यानं सहजच गुणगुणायला सुरवात केली.-रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा...आम्ही मंत्रमुग्ध झालो होतो. इतके वेगळे व्यक्‍तिमत्त्व आपल्या इतक्‍या नजीक आहे, ह्या कल्पनेने अंगावर काटे -आय मीन- रोमांच आले!!

 ‘‘काय म्हणत होतो मी?’’ तो म्हणाला.

‘‘हेच...की तुम्ही जाम वेगळे आहात!,’’ आम्ही.

‘‘ हां...वळलं तर सूत नाय तर भूत असा आपला खाक्‍या आहे...काय?’’ आमची बाही त्याच्या बोटाच्या चिमटीत अडकली होती. ‘फाहाटलाहा गं कोहोना माहाझ्या चोहोळीहीचा...’ही लावणी गुणगुणावी काय? नकोच. आम्ही विचार झटकला. 

‘‘खाक्‍या आहे, खाक्‍या...,’’ पुन्हा आम्ही.

‘‘मी तोंड उघडलं, तर भूकंप होईल, भूकंप...काय?,’’ तोंड उघडून तो म्हणाला. आम्ही हादरलो. मघापासून आमचे पाय लटपटत होते. ते पायाचे लटपटणे नसून जमिनीचे होते, हे आत्ता कळले! खुर्चीचे हात घट्ट पकडून आम्ही बैठक जमवली. त्याच्या उघड्या तोंडात डोकावून आम्ही भूकंपाचा केंद्रबिंदू दिसतो आहे का, तेही पाहिले.-नव्हता! घशात टान्सिलच्या जागी असेल कुठेतरी, अशी समजूत करून आम्ही गप्प राहिलो.

‘‘काय होईल?,’’ भिवया उडवत त्याने दरडावले.

‘‘भू...भू...भूकंप!,’’ आम्ही.

‘‘करेक्‍ट...भूकंपच! म्हणून मला सगळे जाम घाबरतात...काय?,’’ विजयी मुद्रेने तो हसत हसत म्हणाला. त्याच्या गालावर खळी पडली. ती खळी नसून ज्वालामुखीचे तोंड आहे, अशी आम्हाला कल्पना सुचली, पण आम्ही काही बोललो नाही. फुजियामा ज्वालामुखीचे चित्र आम्ही लहानपणी क्‍यालिंडरात पाहिले होते. पृथ्वीमातेच्या गालावरील ती खळीच आहे, अशी उपमा शिक्षकांनी सुचविली होती. ती (नको तेव्हा) आठवली...जाऊ दे.

‘‘ छे...काहीतरीच. लोक तुमच्यावर भारी प्रेम करतात...,’’ विनयशीलपणे आम्ही काहीबाही बोललो. बाहीसाठी काहीही!!

‘‘माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका. मी गरिबांचा तारणहार आणि दुष्टांचा कर्दनकाळ आहे!,’’ उग्र चेहऱ्याने तो म्हणाला. त्याच्या नजरेत संताप होता, आणि बोटांच्या चिमटीत आमची बाही होती. 

‘‘ जाऊ द्या हो...आपण कशाला ह्यात पडा? तुम्ही आहात तस्सेच ‘छॉन’ आहात!,’’ सावधगिरीने आम्ही उद्‌गारलो. माणसाने कुणाच्या अध्यात मध्यात नसावे. गोड बोलावे, गोड हसावे, ह्या मताचे आम्ही आहो. शिवाय आमची बाही...जाऊ दे.

‘‘ मी बोलीन म्हणून हे लोक मला तोंड उघडू देत नाहीत!,’’ त्याने तक्रार केली.

‘‘ साहजिकच आहे. उगीच कोण देईल भूकंपाला आमंत्रण?,’’ बाही शिताफीने हुकवत आम्ही म्हणालो. ‘‘अरे वा रे वा! काय मोगलाई आहे काय? बोलू देत नाहीत म्हंजे काय? मी बोलणार!!टर्रर्रक...,’’ तो आता ज्वालामुखीसारखा भडकला होता. त्या ज्वालामुखीत आमची बाही गेली! त्याच्या गालावरल्या खळीतून धुराचे लोट येताहेत असा भास झाला. पण नाही. शेजारच्या टेबलावरील इसम विड्या ओढत होता, हे आम्ही बघून ठेवले होते.

‘‘ पण तुम्हाला बोलायचंय तरी काय?,’’ क्षीण आवाजात आम्ही विचारले. 

‘‘जरा कान इकडे करा. एक गौप्यस्फोट करायचाय!,’’ त्याने जवळ बोलावले. आम्ही निमूटपणाने आमची दुसरी बाही त्याच्या हातात दिली. ओढ बाबा!! बाही ओढून त्याने त्याचे ओठ आमच्या कानाशी आणले. म्हणाला-

‘‘ त्याचं काय आहे की आपले नमोजी आहेत ना...ते रोज चोरून क्‍याडबरी खातात!’’

Web Title: dhing-tang-british-nandy

टॅग्स