मारुतीची बेंबी! (ढिंग टांग)

dhing-tang
dhing-tang

सदू : (खोल आवाजात) दादूऽऽ...
दादू : (तितक्‍याच खोल आवाजात) बोल सदू!
सदू : (आवंढा गिळत) आता कसं वाटतंय?
दादू : (थंडपणाने) गार वाटतंय!
सदू : (चौकसपणे) ब्यांकेत गेला होतास?
दादू : (आणखी थंडपणाने) रोजच जातोय!
सदू : (कोरडेपणाने) रोज कशाला जायचं?
दादू : (हाताचा पंजा उडवत) घरी बसून काय करायचं?
सदू :(आणखी चौकशी करत) नोटा बदलून घेतल्यास?
दादू : (चलाखीने) तू?
सदू : (हताशपणे) माझ्याकडे पाश्‍शेच्या नोटाच नव्हत्या!
दादू : (मखलाशी करत) माझ्याकडे तरी कुठे होत्या?
सदू : (कबुली देत) मी तीन वेळा एटीएममध्ये गेलो होतो...
दादू : (च्याट पडत) फक्‍त? मी एकोणचाळीस वेळा गेलो...
सदू : (थंडपणाने) मी तिन्ही वेळा पैसे काढले नाहीत.
दादू : (तितक्‍याच थंडपणाने) मी एकोणचाळीस वेळा पैसे काढले नाहीत...
सदू : (संकोचाने) ब्यांकेत जाऊन आलं की चोरट्यासारखं वाटतं... नै?
दादू : (मान हलवत) मला दरोडेखोरासारखं वाटतं!
सदू : (अस्वस्थपणाने) पूर्वी काळी पिशवी घेऊन रस्त्यात दिसलो की लोकांना कळायचं, की हा मटण किंवा मासे घेऊन आला!
दादू : (खचलेल्या सुरात) आता ब्यांकेतून येतोय असं वाटतं! मी परवा काळी पिशवी घेऊनच ब्यांकेत जाऊन आलो!
सदू : (विषण्णपणाने) अख्खा देश रांगेत उभाय; पण एकही पुढारी एटीएमच्या रांगेत दिसला नाही! ह्याचा अर्थ काय?
दादू : (चातुर्याने) याचा अर्थ इतकाच, की आपले पुढारी गरीब आहेत! त्यांचं जनधन खातंसुद्धा नाही!!
सदू : (कपाळाला आठ्या घालत) तुझा नोटाबंदीला पाठिंबा आहे की विरोध?
दादू : (ओठ काढत) हे मला तरी कुठं माहितीये? तुझा?
सदू : (दोन्ही हात उडवत) कुणास ठाऊक!
दादू : (चिंताग्रस्त आवाजात) काहीतरी करायला हवं!
सदू : (सुस्कारा सोडत) नोटाबंदीची मुदत संपतेय!
दादू : (संशयी आवाजात) ही धमकी आहे की इशारा?
सदू : (आशावादी सुरात) पुढे सगळं चांगलं होणाराय म्हणे! भ्रष्टाचार, काळा पैसा नष्ट होऊन अखिल भारतात शांतता नांदू लागणार आहे!!
दादू : (खुलेपणाने) तसं झालं तर चांगलंच आहे!! दुष्टांचं निर्दाळण आणि सुष्टांचं परित्राण झालं तर कुणाला नकोय?
सदू : (खोल आवाजात) पण हे बघायला आपण असू का?
दादू : (हात झटकत) तुझं मला माहीत नाही! पण मी सज्जन आहे!! मी टिकणार!!
सदू : (मुद्द्याला हात घालत) यंदा मी थर्टीफर्स्ट साजरा करणार नाही!
दादू : (कुतुहलाने) नोटाबंदीचा निषेध म्हणून?
सदू : (मॅटर ऑफ फॅक्‍टली) पैसे नाहीएत म्हणून!
दादू : (मॅटर ऑफ फॅक्‍टलीच) मी यंदा जिल्हा ब्यांकांच्या समर्थनासाठी ३१ डिसेंबर साजरा करणार नाहीए! 
सदू : (पॉज घेत) तुला मारुतीची बेंबी माहितीये? मारुतीच्या बेंबीत विंचू असतो. तिथं बोट घालणाऱ्याला तो चावतो. पण, आपण मारुतीच्या बेंबीत बोट का घातलं, हे कसं सांगणार? मग लोक सांगतात, की तिथं गार गार लागतंय! कळलं?
दादू : (उलटा सवाल करत) तू घातलंस? तुला कसं वाटतंय?
सदू : (कळवळून) गार गार वाटतंय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com