इंतजार! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ : नाजूक!    प्रसंग : साजूक!
पात्रे : लाजूक... आय मीन वज्रचुडेमंडित सौभाग्यवती कमळाबाई आणि....राजाधिराज उधोजी महाराज.

(अंत:पुराच्या बंद दरवाज्याशी उधोजीराजे मिशी पिळत उभे आहेत. त्यांना आत जायचे आहे; पण कमळाबाई दार उघडायला तयार नाहीत. सबब उधोजीराजे हैराण! अब आगे...)

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ : नाजूक!    प्रसंग : साजूक!
पात्रे : लाजूक... आय मीन वज्रचुडेमंडित सौभाग्यवती कमळाबाई आणि....राजाधिराज उधोजी महाराज.

(अंत:पुराच्या बंद दरवाज्याशी उधोजीराजे मिशी पिळत उभे आहेत. त्यांना आत जायचे आहे; पण कमळाबाई दार उघडायला तयार नाहीत. सबब उधोजीराजे हैराण! अब आगे...)

उधोजीराजे : (दबक्‍या आवाजात) कडी काढा कडी!...
कमळाबाई : (आतून आवाज...) फुर्रर्र फ्यॅं...फ्रीकफ्रुम...फुस्स...मुस्स...ठुस्सस्स्स...!
उधोजीराजे : (काळजीयुक्‍त स्वरात) हे कसले आवाज? 
कमळाबाई : (हुंदका आवरण्याच्या महत्प्रयासात) हाँऊब्ब....फीस्स!!
उधोजीराजे : (‘कुछ-लेते-क्‍यूं- नहीं’ सुरात) पाहा, ग्यासेसचा त्रास झाला ना? तरी मी सांगत होतो, झेपेल तेवढाच घास उचला!! हल्ली तुमचा आहार फार वाढलाय!! काल चारी ठाव जेवला असाल, हो ना?..हहह!!
कमळाबाई : इश्‍श!!...जळ्ळं लक्षण!! फ्रुकफ्यां... 
उधोजीराजे : (घाबरून) सोडा मागवा, सोडा!!
कमळाबाई : (संतापाने)...सोडा प्या तुम्हीच आणि ग्यासेस होवोत त्या कांग्रेसवाल्यांना!! आम्ही दु:खातिरेकानं मुसमुसतोय इथं!! येवढंसुद्धा कळत नाही!!
उधोजीराजे : (समाधानाने) अस्सं होय! आम्हाला वाटलं, हे कुठल्या भांड्यांचे आवाज? रणांगणातील तोफांच्या भडिमाराला संगीत मानणारा हा झुंजार उधोजी ग्यासच्या गुबाऱ्यांना डरेल काय? रणदुंदुभीच्या आणि तुताऱ्यांच्या निनादाने ज्याचे बाहू फुरफुरू लागतात, तो हा उधोजी नाक शिंकरल्याच्या आवाजाने थरकापेल काय? बात सोडा! (भानावर येत) असो...तेवढी कडी काढायची राहिली!!
कमळाबाई : (चिडून) आम्ही नाही काढणार कडी!!
उधोजीराजे : (डोळे बारीक करून) का? दारं लावून नोटा मोजायचा उद्योग सुरू आहे वाटतं!! 
कमळाबाई : (निक्षून सांगत) मुळीच्च नाही काढणार कडी!! दिवसभर आम्हाला टाकून बोलायचं आणि रात्री दारात येऊन उभं राहायचं!! रात्री रातराणी नि दिवसा केरसुणी!! हुं:!! अशा माणसाला कुणी आजकाल ब्यांकेतदिखील घेणार नाही!! फ्राँऽऽईक फ्रुक...
उधोजीराजे : (दचकून) आता हा कसला आवाज?
कमळाबाई : (संतापून) सांगितलं ना एकदा की आम्ही मुसमुसतो आहोत म्हणून!!
उधोजीराजे : (झालं गेलं विसरून)...ते जाऊ दे. तुम्ही कडी काढा!! सन्मानाने आम्हाला आत घ्या!! तुमची समजूत काढण्याच्या एक हजार एक युक्‍त्या आमच्यापास आहेत!!
कमळाबाई : (नाक मुरडून) तुम्ही आमचा काय सन्मान ठेवता, ते आख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे! जेव्हा तेव्हा आपलं ते घालून पाडून बोलणं!! जणू काही आम्ही तुमच्या पदरीची बटकी किंवा दाशी आहोत!!
उधोजीराजे : (कसनुसं समर्थन करत) अहो, त्याला राजकारण म्हणतात!! त्याच्याकडे कशाला लक्ष द्यायचं!!
कमळाबाई : (पश्‍चात्तापानं) तुमच्या गोड बोलण्याला भुलले म्हणून पंचवीस वर्षं अडकले!! तुम्हाला पंचवीस महिने निघत नाहीत?
उधोजीराजे : (संयमानं) कडी काढा राणीसाहेब! कडी काढा!! आमचा अंत पाहू नका!! (हतबल होत्साते)...अहो, अशा एटीएमसारख्या वागू नका हो!! एवढा वेळ एटीएमसमोर उभे राहिलो असतो, तरी दोन हजार होन निघाले असते!! तुमचं दार अजूनही बंद!! आपल्या माणसाला सन्मानानं आत घ्यावं की दारातच उभं करावं? सांगा बरं? (दुखऱ्या आवाजात) दर वेळी आम्हाला असं दारात उभं करून ठेवता! अशानं आमचा सन्मान कसा राहणार?
कमळाबाई : (किंचित विचार करत) कडी काढायची ऑर्डर देताय की रिक्‍वेस्ट करताय?
उधोजीराजे : (कळवळून) रिक्‍वेस्ट करतोय हो! काढा ती कडी!!
कमळाबाई : (कडी काढत) सन्मान नेहमी विनंती करूनच मिळवता येतो, हे आलं ना लक्षात? काय!!

Web Title: dhing-tang-british-nandy