पंक्‍तिप्रपंच..! (ढिंग टांग)

पंक्‍तिप्रपंच..! (ढिंग टांग)

इतिहासपुरुष साक्षी आहे...
कृष्णकुंज गडावरील खलबतखान्यात पलिते पेटले होते. पेटत्या पलित्यांचा धूर शिवाजी पार्काच्या आसमंतात पसरत होता. पार्कातील झाडांवर वस्ती करोन राहणारी पाखरे खोकू लागली. (शिवाजी पार्कची पाखरे खोकतात...काय म्हणणे आहे, अं? गप्प बसा!!) खलबतखान्यात तणावाचे वातावरण होते, हे बाळाजीपंत अमात्यांनी तीन वेळा मानेवरील घाम उपरण्याने पुसला, तेव्हाच इतिहासाच्या लक्षात आले. येथोन पुढे ऐतिहासिक प्रसंग घडणार, हे वळखून इतिहास कागद-पेणसिल घेवोन जय्यत बसला.

...नेमकी तीथ सांगावयाची तर मार्गशीर्षातील कृष्ण पक्षातील दशमी. काळ वाहात होता. वाहता वाहता तो मिठी नदीच्या प्रवाहासारखा आक्रसला. मग थांबलाच. कारण? कारण अर्थात साक्षात रुद्रस्वरुप महाराष्ट्रधर्म पालक श्रीमान रा. रा. चुलतराजसाहेब ह्यांची गर्जना!!

‘‘कोण म्हणतो आम्हांस निमंत्रण नाही?’’ गर्रर्रकन मान वळवत सर्रर्रकन तलवार उपसून राजे भर्रर्रकन म्हणाले. म्हणाले कसले? कडाडलेच. दरबाऱ्यांचे चेहरे खर्रर्रकन उतरले. इतिहासाने तात्काळ कागदास पेणसिल टेकविली.

आर्बी समुद्रातल्या खडकावर थोरल्या महाराजांचे स्मारक उभे करण्याचा घाट मुंबापुरीचा शिद्दी कमळाखानाने घातला होता. त्याचे आवतण अवघ्या गावास गेले होते. काहींनी तर ते आवतण स्वत:हून मागून घेतले होते. पण राजे पडले स्वाभिमानी! ‘‘खामोश...निमंत्रण लावोन घेण्याची आमची संस्कृती नाही.’’ ऐसे चार दिसापूर्वी बाळाजीपंत अमात्यांना त्यांनी खडसाविले होते. बाळाजीपंत उपरणे कमरेला आवळून परतले होते...असो.

‘‘आम्ही खडकावर जाणार...जरुर जाणार,’’ राजे म्हणाले.

मसलतखान्यातील पलित्यांच्या ज्वाळा त्या उद्‌गारांनी थरारून गेल्या. एका पलित्याची ज्वाळा तर इतकी भडकली, की तिच्या नजीक बसलेल्या सरनोबत नितिनाजी सरदेसायांनी चटकन उठोन आसन बदलले...पुन्हा असो.   

‘‘निमंत्रण खासच आले आहे आम्हास. षष्ठीचे दिशीच दोन प्रहरी खानाचा जासूद येवोन गेला...’’ राजियांनी गौप्यस्फोट केला. खानाचा जासूद? की नानांचा? उपस्थितांना (आणि इतिहासालाही) काही टोटल लागेना.

हे पहा...खुदबखुद कमळाखान शिद्‌द्‌याने सांगावा धाडिला आहे...‘आर्बी समुद्रातील खडकावर थोरल्या महाराजांचे स्मारक उभे करण्याचे घाटत असोन ठिकठिकाणची माती मूठ मूठभर आणोन टाकण्याचा मन्शा आहे. सबब, शिवतीर्थावरील मूठभर माती घेवोन खुदबखुद सहकुटुंब सपरिवारें येणेंचे करावे!’ हातातील कागुद फडफडवत राजियांनी खुलासा केला.

काही दरबाऱ्यांची कळी खुलली. 

‘‘साहेब, आपली उमेद मोठी. झेप मोठी...कर्तृत्व आभाळायेवढे. आपण नसतां, तर हा महाराष्ट्र बुडोन गेला असता. असे असता आपल्याला जासुदाकरवी निमंत्रण मिळावे? पटत नाही...’’ किंचित खाकरोन बाळाजीपंत अमात्य ह्यांनी मसलत पुढे ठेविली.
‘‘खानाने आम्हास फोनदेखील केला होता. व्हाट्‌सॲपवर मेसेज ठेविला होता. एसेमेसही पाठविला होता आणि इमेलही केला होता...आता काय करावे? बोला!‘‘ राजियांनी तिढा टाकला.
‘‘साहेब,  बांदऱ्याच्या सरदारांकडे त्यांणी दोन सांडणीस्वार पाठवोन निमंत्रण पोच केले. इतकेच नव्हे, तर निमंत्रणपत्रिकेत त्यांचे नावदिखील छापिले आहे. मोठ्या हिकमतीने आम्ही पत्रिका हस्तगत केली आहे...ही पहा!’’ बाळाजीपंतांनी एक लालुंगा कागुद पुढे सरकवला. मर्मावर बोट ठेवीत ते मखलाशीने म्हणाले, ‘‘हा सरळ सरळ पंक्‍तिप्रपंच आहे. भला उनकी कमीज हमारी कमीज से सफेद कैसी?’’
क्षणभर विचार करून राजेसाहेबांनी हातातील पत्रिका फेकली. विजयी मुद्रेने दरबाऱ्यांकडे बघत ते म्हणाले-
‘‘जगदंब जगदंब! आम्ही तिकीट काढून खडकावर जाऊ!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com