तिळगूळ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 14 जानेवारी 2017

प्रिय मित्र उधोजीसाहेब, 
शतप्रतिशत नमस्कार.

प्रिय मित्र उधोजीसाहेब, 
शतप्रतिशत नमस्कार.

प्रत्यक्ष येऊन तिळगूळ तुमच्या हातावर ठेवायचा होता. पण जमले नाही. शेलारमामा म्हणून आमचे एक विश्‍वासू सहकारी आहेत, त्यांच्यामार्फत धाडतो आहे. एकूण पाच तिळगूळ आहेत. (तुम्ही, वैनी, आदू प्रत्येकी एक आणि मिलिंदाला दोन!!) कृपया स्वीकार करावा, आणि एक गोड गोड फोन करावा!! शेलारमामांना पार्सल मिळाल्याची सही करून द्यावी. ते आमचे विश्‍वासू असले तरी तुमचे नाहीत, हे ध्यानी घ्यावे. आपली मैत्री गेल्या पंचवीस वर्षांची आहे. आपल्या गोड बोलण्याचा आपला रौप्यमहोत्सव कध्धीच पार पडला. मैत्रीबरोबरच एकमेकांवर गाढ विश्‍वासदेखील आहे. हसू नका...खरेच आहे!! अशी मैत्री जगात कुठे नसेल. तिळगूळ खाल्लात तर आपले ऋणानुबंध आणखी पंचवीस वर्षे टिकतील, असे माझे मन मला सांगते. पण आमच्या पक्षाने केलेला सर्व्हे मात्र ‘तिळगूळ वाटू नका’ असे सांगतो आहे. कार्यकर्तेही ‘युतीच्या कुबड्या नकोत’ असे कानात सांगत आहेत. त्यांना युती होऊ नये, असे वाटते. मला मात्र सारखे वाटते की व्हावी!! काय करावे? समजत नाही...

आपली युती होणे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही साथीला आहात, म्हणून तर पारदर्शक कारभाराची स्वप्ने पाहतो आहे. विकासाच्या घोषणा करतो आहे. काल (तुमच्या) ठाण्यात होतो. तिथे आमच्या पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. ह्या बैठकीत मी ‘युतीसाठी वाट्टेल ते करा’ असे स्पष्ट सांगणार होतो. पण घोटाळा झाला... बैठकीआधी कोणीतरी ठाण्यात मामलेदार मिसळ उत्तम मिळते असे सांगितले. मी नेमस्तपणे दोन प्लेटी उडवल्या. ती झणझणीत मिसळ खाल्याने सगळेच आपोआप तावातावात बोलायला लागले. मीही (आपोआप) जरा तिखट बोललो. परिणामी, ‘युती होणे अशक्‍य आहे’ असा चुकीचा मेसेज गेला. तुम्ही मात्र मिसळ वगैरे न खाता तिळगुळाने तोंड गोड करून मग निर्णय घ्यावा, असे सांगावेसे वाटते. अधिक काय लिहू? बाकी भेटीअंती बोलूच. तोवर तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला!! 

फक्‍त तुमचा.
 नाना फडणवीस.

* * *

नाना- 
हा काय चावटपणा आहे? तिळगूळ पाठवलाय असं सांगून रिकामी प्लाष्टिकची पुडी काय पाठवता? तुमच्या शेलारमामांनी मधल्यामध्ये खाल्ले असतील, असे वाटून त्यांना जाब विचारला असता, त्यांनी ‘‘आपल्याला काही माहीत नाही’’ असे सांगितले. (आमच्या) मिलिंदाने मधल्यामध्ये पाचही लाडू खाल्ले की काय, ह्याचीही मी (गुप्त) चौकशी केली. पण नेमकी त्यानेही मिसळ खाल्ल्याचे उघडकीस आले!! 
थोडक्‍यात, तिळगूळ न पाठवता, मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्याची तुमची पंचवीस वर्षांची प्रथा तुम्ही यंदाही कायम ठेवली, एवढाच याचा अर्थ. चालायचेच. फार गोड बोलण्याची नाहीतरी आम्हाला सवय नाहीच. एक घाव आणि बारा तुकडे असा आमचा खाक्‍या असतो, हे तुम्ही पाहिले आहे. त्यामुळे सुंठीवाचून खोकला गेला असेच आम्ही म्हणू. आपल्यात युती होणार की नाही, ह्याचा विचार मी कधीच सोडला आहे. तुमचा सर्व्हे ‘तिळगूळ वाटू नका’ असे सांगतो, तर आमची पाहणी ‘तिळगूळ खाऊ नका’ असे सांगतो!!
असो. तरीही संक्रांतीच्या शुभेच्छा.
 आपला. 
उठा.

वि.सू. : आमच्या ठाण्यातली मिसळ तुमच्या तिळगुळापेक्षा अधिक प्रभावी आहे, हे कळले का?

Web Title: dhing-tang-british-nandy