अक्ष! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 16 जानेवारी 2017

देवा नारायेणा। करावे बा कैसे।
काम इवलेसे। होईना की।।

ब्यांकेमधल्या रांगेत युगानुयुगें
उभे असतानाच अचानक
प्रिथिमीचा अक्ष बदलला,
आणि होते झाले नव्हते,
नव्हते झाले होते...

देवा नारायेणा। करावे बा कैसे।
काम इवलेसे। होईना की।।

ब्यांकेमधल्या रांगेत युगानुयुगें
उभे असतानाच अचानक
प्रिथिमीचा अक्ष बदलला,
आणि होते झाले नव्हते,
नव्हते झाले होते...

उभ्या उभ्या रांगेत घेतलेल्या
घोडनिद्रेतून जाबडत घाबरत 
खिडकीतून पुढे केलेला 
बारका कागद भर्रकन
दूर सारत ब्यांकेतल्या 
इवल्याश्‍या खिडकीत उगवलेली 
मिशी म्हणाली : ‘‘इथे सीसीटीव्ही
क्‍यामेरे बसवलेत, मिस्टर! पैसे
विड्रा करताना बूड खाजवू नये!’’
...तर जीव आणि कागद गोळा 
करून निघालो तिकडून,
वापस आलो रस्त्यावर.
काय करावे? का क्रावे? क्राय क्रावे?

सरकारी कचेरीत आवक क्रमांकाने 
जावक क्रमांकाला निर्देशित केले की, 
ज्याअर्थी तुमचा अर्ज नियमबाह्य असून 
व तो फेटाळणेत येत असून
व सदर अर्जदाराचे डोके ठिकाणावर नसल्याचे,
निष्पण्ण झाले आहे, त्याअर्थी
उपरिर्निर्दिष्ट परिशिष्टातील
शिष्ट नियमावलीतील विशिष्ट
कलमान्वये आपलेवर कारवाई 
का करण्यात येऊ नये? ह्याचा 
चोवीस तासात खुलासा करावा...’’

कुणी म्हणाले : भाऊ, आता
‘सीकेटीपीपीएल’कडे अर्ज करा.
कुणी म्हणाले : क्‍यूआरटीपीकडे
खुलासा करावा लागेल.
कुणी म्हणाले : इडीचे बोलावणे
आले तर विडीचे बंडल घेऊंजा!
कुणी म्हणाले : इतके दिवस काय 
झोपला होता...इतके दिवस?
कुणी म्हणाले : लोहोच्या झाला ना,
आता आफिडेविट द्याव लागतेय...
कुणी म्हणाले : आयटी रिटर्न्स
करून नाइल नदीत टाका,
व्हाईल, व्हाईल, शेमुद्रात जाईल!!

-सीओसाहेबांच्या एपीएसाहेबांना भेटलो.
-ओसडीसाहेबांकडून ओरडा खाल्ला.
-डीडीएमसाहेबाच्या एसएससाहेबांनी
दोन दिवसांनी या, सांगितले.
-अखेर बारा नंबरच्या खिडकीत
पाच नंबरचा फॉर्म भरा, असे
फर्मान मिळाल्याने
चौदा नंबरच्या खिडकीशी उभा राहून
वळत वळत बारा नंबरी खिडकीशी
पोचून तोंड उघडून सांगणार,
इतक्‍यात खिडकीतल्या चष्मायुक्‍त
साडीने पुरुषी आवाजात सांगितले :
उद्या या, उद्या!

अगा भगवंता। कैसे यावे उद्या।
केला जरी बुध्द्या। लेट आज?।।
पाताळाच्या मेनगेटवरील
यमदूताने लॅपटॉप उघडून
बघितले, म्हणाला :
रौरव किंवा कुंभिपाकात
व्हेकन्सी आहे...विचार करा!
स्वर्गाच्या दारावरील चित्रगुप्ताच्या
तत्पर स्टाफने आणून दिले,
गुलाबी वेलकम ड्रिंक, आणि
‘होडं हांबा हं’ अशा लिपस्टिकी
आर्जवानिशी मागितले प्यानकार्ड!

कोलमडून पडलो पुन्हा
दाणकन ब्यांकेच्याच दारात,
शतकांची कणकण अंगात घेऊन
हुडहुडी भरल्यागत शेजारल्या
पानटपरीवाल्याकडे मागितले
तीस छापाची ज्वलंत संजीवनी.
दमदार स्वर्गीय झुरका मारत
घेतला शेवटचा श्‍वास
ह्याच ब्यांकेच्या 
पायरीवर, पंढरीनाथा.
येथेच पुरले अखेरचे 
अडखळते श्‍वास...

अखेरच्या दोन श्‍वासांमध्ये
कानावर पडिले ते ऐसे :
‘‘दो हजार की नोट छुट्‌टी
करते करते सांस ढीले 
हो गए बेचारे के...’’

उसवले श्‍वास। 
घाशिल्या गा टांचा ।
बसली गा वाचा। त्रिखंडात।।
प्रिथिमीचा अक्ष। बदलिला काई।
सारे लवलाही। संपले गा।।

Web Title: dhing-tang-british-nandy