मूर्च्छितभाई की अजीब दास्तान! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

प्रति,

प्रति,
श्रीमान नमोजीभाई, आ खत सीक्रेट छे, एटले मराठी कोड लेंग्वेज मां लख्यूं छुं. आपडे तो मराठी आवडे छे, आ मने खबर छे. पण दिल्ली मां मराठीमाटे काई भाव नथी. एटले मराठी...साहेबजी, नोटाबंदीचा एक बळी ह्या नात्याने सदर पत्र लिहीत आहे. कृपया सहानुभूतीपूर्वक वाचावे. गेल्या आठ नव्हेंबर रोजी आपण टीव्हीवरून नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर सर्वाधिक काम, सर्वाधिक शिव्या आणि सर्वाधिक वेदना माझ्या वाट्याला आल्या आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे का? आठ नव्हेंबरनंतर मी रोज जाग्रणे करीत असून, आम्लपित्ताने जीव विटला असून, गेल्या दोन-अडीच महिन्यात माझा रुपये ३६४ पै.३५ इतका खर्च निव्वळ कोकम सरबतावर झाला आहे. रुपये ६६० इतका खर्च सोड्यावर झाला आहे. पाचक चूर्णांच्या खरेदीवर तर माझ्या हजारो रुपयांचे चूर्ण झाले. दैवदुर्विलास म्हणजे ह्या सर्व जिनसा उधारीवर विकत घ्याव्या लागल्या.

‘‘पडले मोठे गवर्नर!,’ हा उद्धार तर जवळपास रोज घरात ऐकतो आहे. गवर्नर म्हणायचे, आणि कान पाडून फिरायचे, ह्याला दुर्दैव ह्यापलीकडे काय म्हणायचे असते? ह्यापेक्षा ब्यांकेपुढील रांगेत उभा राहून मूर्च्छित पडलो असतो तरी पर्वडले असते. असो.

नोटाबंदीमुळे जनतेचे हाल झाल्याच्या बातम्या गेले कित्येक दिवस वाचतो आहे. रांगेत उभ्या असलेल्या लोकांना काही ठिकाणी मारी बिस्कुटे वाटण्यात आली. मला तेही मिळाले नाही. दोन हजारांची नोट सुट्‌टी करताना लोकांची फेफे उडाली. ही नोट बाजारात आणणारा मी पहिला होतो. दुर्दैव म्हणजे ही नोट मुळात दिसतेच कलर झेरॉक्‍ससारखी. ती खपवताना माझ्या नाकी नऊ आले. पण हे लक्षात कोण घेतो?

एखाद्या माणसाला नोटा मोजायला बसवावे. त्यातील एकही नोट चिमटीने उचलायची नाही, अशी अट घालावी. काय होईल? तेच माझे झाले आहे. एखाद्याला भविष्यवाल्याने ‘तुझ्या हाताखाली शेकडो वाहाने असतील!’ असे सांगावे,  प्रत्यक्षात तो पुढे ट्राफिक हवालदार व्हावा, तसे माझे झाले आहे. भर चौकात शिट्या वाजवत वाहाने हाकणाऱ्या ट्राफिकवाल्याला जितके वाहनसौख्य भेटते, तितकेच अर्थसौख्य मला मिळते हे सत्य आहे. ट्राफिकवाल्याला वाहनांचा धूर तेवढा खावा लागतो, इथे मी शिव्या खातो आहे. ‘असुनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला’ असा परवशतापाश माझ्या गळा लागला आहे साहेब!! नोटेवर माझी सही असल्याने मला त्या वाट्‌टेल तितक्‍या फुकट मिळतात, असा ह्या लोकांचा समज आहे का? पत्र लिहिण्यास कारण की परवा बुधवारी मला काही खवळलेल्या खासदारांच्या समितीपुढे मान द्यावी लागली. नोटाबंदीची उत्तरे देण्यासाठी मला बोलावण्यात आले होते. साधारणपणे संभाषण असे झाले :

प्रश्‍न : काय हो, नोटाबंदीचा निर्णय कुणाचा? सांगा, सांगा...
उत्तर : त्याचं झालं असं साहेब...मी आठ नव्हेंबरला ऑफिसातून घरी येऊन थेपला आणि चहा घेत होतो. थोड्या वेळाने ‘खुलता कळी खुलेना’ मालिका सुरू होणार होती. तेवढ्यात...

प्रश्‍न : वाट्‌टेल ते चऱ्हाट लावू नका. नोटाबंदीचा निर्णय कुणी घेतला ते सांगा! सांगा, सांगा ना...
उत्तर : मला तेवढ्यात डुलकी लागली...

प्रश्‍न : केंद्राने तुमच्यावर दबाव आणला का?
उत्तर : कोणी?

प्रश्‍न : मोदीजींनी!
उत्तर : कोण मोदीजी?

प्रश्‍न : तुम्ही गवर्नर आहात ना?
उत्तर : होय!

प्रश्‍न : मग तुम्हाला मोदीजी माहीत नाहीत? नोटाबंदी का फसली ते सांगा!
उत्तर : ...आता केस पिकले म्हणून केशकर्तनकाराला जाब विचारणे योग्य आहे का, साहेब? केस पिकतात वय वाढल्याने!! त्याचा ‘गुलाब हेअर कटिंग सलून’शी अर्थाअर्थी संबंध काय?
...समितीचे सदस्य भराभरा पांगले! आणखी काय लिहू. शब्दच संपले.

 आपला. 
मूर्च्छित पटेल.

Web Title: dhing-tang-british-nandy