हा योग खरा हठयोग! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 21 जानेवारी 2017

जन्माने पुणेकर असल्याने आम्हाला खूप प्रश्‍न पडत असतात. पण इन्शाला जन्माने पुणेकर असल्यानेच त्याची घटकाभरात उकलदेखील साधत्ये! उदाहरणार्थ, बराक ओबामा ह्यांनी व्हाइट हाउस सोडताना बल्ब काढून नेले असतील का? ह्या प्रश्‍नाचे उत्तर आम्ही इथे सदाशिव पेठेत बसून शोधले. त्याचप्रमाणे, नोटाबंदी फसली की हसली? सोनम गुप्ता बेवफा है या नहीं? राहुल गांधी सुट्टी मनविण्यासाठी नेमके कुठे जातात? महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची युती होणार की नाही? सूर्याचे तापमान आणखी किती वर्षांनी कमी होईल? वातावरणातील ओझोन वायूच्या थराला पडलेले भोक साध्या डांबराने बुजवता येईल किंवा कसे?

जन्माने पुणेकर असल्याने आम्हाला खूप प्रश्‍न पडत असतात. पण इन्शाला जन्माने पुणेकर असल्यानेच त्याची घटकाभरात उकलदेखील साधत्ये! उदाहरणार्थ, बराक ओबामा ह्यांनी व्हाइट हाउस सोडताना बल्ब काढून नेले असतील का? ह्या प्रश्‍नाचे उत्तर आम्ही इथे सदाशिव पेठेत बसून शोधले. त्याचप्रमाणे, नोटाबंदी फसली की हसली? सोनम गुप्ता बेवफा है या नहीं? राहुल गांधी सुट्टी मनविण्यासाठी नेमके कुठे जातात? महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची युती होणार की नाही? सूर्याचे तापमान आणखी किती वर्षांनी कमी होईल? वातावरणातील ओझोन वायूच्या थराला पडलेले भोक साध्या डांबराने बुजवता येईल किंवा कसे? आदी जटिल प्रश्‍नांची उकल आम्ही बसल्या बैठकीला केली आहे.

आता तुम्ही विचाराल की बोआ, ह्या प्रश्‍नांची उत्तरे काय? तर आम्ही म्हणू की इतकी जबरदस्त माहिती फुकट थोडीच देता येते. ज्ञान हे एक मूल्य आहे. ज्ञानाचेसुद्धा मूल्य असतेच. किमान एक ‘रूपाली’तील चहा तरी!! असो.

भारतातील गरिबी कशी हटणार? ह्या ज्वलंत समस्येने सध्या आम्ही कावलो आहो. गरिबी हा भारताला मिळालेला शाप आहे, शाप! त्यास उ:शाप कसा मिळेल, ह्याचा आम्ही अहर्निश विचार करीत असतो. तथापि, हा प्रश्‍न सोडविण्याचे योग आपल्या कुंडलीत आहेत का? हे आधी तपासणे आवश्‍यक होते. कोणाला बरे दाखवावी पत्रिका? असा विचार करत असतानाच परमपूज्य योगगुरू बाबाजी पुण्यात पधारले आहेत, अशी वार्ता कानी आली. अहाहा!! ही सुवर्णसंधी कोण बरे वाया दवडील?

बाबाजींसमोर चटई टाकून बसले की विश्‍वाचे ज्ञान बसल्या बैठकीला प्राप्त होते, असा आमचा अनुभव आहे. बाबाजींच्या योगशिबिराला जाऊन आल्यावर आम्ही भेटेल त्यास, बिझनेस कसा करावा? इथपासून ते मयूरासनाच्या फायद्यांपर्यंत काहीही अधिकारवाणीने सांगू शकतो. अर्थात, पुणेकर असल्याने तो नैतिक अधिकार आम्हाला आहेच. असो. 

‘‘अरे मूरख बालक, भविष्य तो थोतांड है...,’’ श्रीबाबाजींचे हे जळजळीत शब्द आमच्या कानात जाळाप्रमाणे ओतले गेले, तेव्हा आमचे डोळे मिटलेले होते. 

कुणी आम्हाला जबरदस्तीने पद्‌मासनात बसवले की आमचे हे असे होते!! श्‍वास अडकून मेंदूचा प्राणवायू पुरवठा कमी होतो. असीम गुंगी येत्ये. प्राणवायू मेंदूकडे जाण्याऐवजी उलट्या दिशेने प्रवास करून काहीच्या बाही होते. परिणामी, दचकून आम्ही डोळे उघडले...

‘‘शी:!! पद्‌मासन छोड दो!’’ प्रदीर्घ काळाने रोखलेला श्‍वास सोडत बाबाजींनी फर्मावले. 
आम्ही पद्‌मासन हळूवारपणे सोडविले. मागल्या खेपेला स्प्रिंग सुटल्यागत पाय सटकन सरळ होऊन समोर बसलेल्या...जाऊ दे.

भारतापुढील जटिल प्रश्‍न कसे सुटतील हो बाबाजी?’’ पाय मोकळे करत आम्ही मनमोकळा सवाल केला.

‘‘कठीन है...,’’ बाबाजी मान हलवत म्हणाले. आम्ही दोन्ही पंजे नाचवत विचारले, ‘‘का?’’

‘‘मेरी और राहुल गांधी की राशी एक है!’’ बाबाजींनी गौप्यस्फोट केला, ‘‘कैसे होगा इस देश का भला?’’

‘‘भारताची गरिबी दूर कशी होईल?’’ आम्ही.

‘‘ते सोपं आहे... मी पाकिस्तानात जाऊन टूथपेस्टपासून जीन्सपर्यंत सगळं विकीन! तिथली गरिबी हटली की भारताचीही गरिबी आपोआपच हटेल! काय?’’ बाबाजी म्हणाले. 

...आम्ही घाईघाईने पाकी वजीरेआजम जनाब नवाझ शरीफ ह्यांना चटई टाकून तयार राहण्यासाठी पत्र लिहावयास घेतले आहे. 
इति. lll

Web Title: dhing tang british nandy