'साठ'गाठ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 23 जानेवारी 2017

श्रीमान नानासाहेब,

श्रीमान नानासाहेब,
अत्यंत गंभीर तक्रार करण्यासाठी हे पत्र धाडत आहे. तुम्हाला याआधी बरेच फोन केले, तुम्ही उचलले नाहीत. पण ती आमची तक्रार नाही. कालपासून तुम्ही चिक्‍कार फोन करत आहात, पण तो आम्ही उचलत नाही. वेळच्या वेळी फोन न उचलण्यालाच युतीचे राजकारण म्हंटात!! असो. मुद्दा असा की मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आमची माणसे तुमच्या माणसांना तीनदा भेटली. आमच्या बांदऱ्याच्या "रंगशारदा' हॉटेलात ह्या बैठकी झाल्या. बटाटेवडे आणि चहापोटी थकलेले बिल घेऊन "रंगशारदा'चा म्यानेजर दारात आला होता. त्याच्याच हाती (बिलासकट) हे पत्र पाठवत आहे. ते भागवावे!! तीन बैठकात मिळून ह्या लोकांनी संयुक्‍तरीत्या तीस प्लेट वडे फस्त केले. हे भयंकर आहे. अशाने युतीचे पोट बिघडणार नाही तर काय? बिल तुम्ही भागविण्याचे कारण म्हंजे, नाहीतरी बरेचसे बटाटेवडे तुमच्या शेलारमामांनीच उडवले, असे कळते. जाऊ दे.

ह्या बैठकीत तुमच्या माणसांनी 114 जागा हव्यात असा कागद समोर ठेवला. आमच्या माणसांनी त्या कागदाची पुंगळी केली. आमच्या माणसांनी 60 जागा सोडण्याची दिलदारी दाखवली, पण तुमच्या माणसांनी मुळा खाऊन ढेकर दिल्यासारखा चेहरा केलान!! वास्तविक आमच्या माणसांपैकी कोणीही त्यादिवशी मुळा खाल्ला नव्हता. हे आमच्या माणसांनी मला लेखी कळविले आहे!!
गेली काही वर्षे आम्ही मुंबई महापालिकेत इतके प्रचंड काम "करून दाखवले' आहे की प्रत्येक मुंबईकर मनातल्या मनात आपण मुंबईत राहात असल्याबद्दल देवाचे आभार मानत असेल. माझे तर मानतातच!! मुंबईइतक्‍या सोयीसुविधा जगात कुठल्याही शहरात नाहीत, ह्याची नोंद तुम्ही नाही, तर इतिहास घेतोच आहे. परवा डोनाल्ड ट्रम्प ह्यांचा फोन आला होता. ते म्हणाले की ""मला वॉशिंग्टनचे मुंबई करायचे आहे!! आपला सल्ला हवा!!'' मी (जमेल तितक्‍या) नम्रपणे नकार दिला. ह्या गोष्टी स्वत:च्या कर्तृत्वावर आणि मेहनतीच्या जोरावर करायच्या असतात. हो की नाही? ईश्‍वर करील ते योग्य!! जगदंब जगदंब. आपला. उधोजी.

ता. क. : युतीबाबत पुढला निर्णय आपण घेणार आहात, असे मला सांगण्यात आले. हे खरे आहे का? की उगीच एक नेहमीची शतप्रतिशत लोणकढी? उधोजी.
* * *

प्रिय मित्र उधोजीसाहेब,
"रंगशारदा'च्या म्यानेजरकडून पत्र काढून घेतले. वाचले. उत्तर त्याच्यासोबतच परत पाठवतो आहे. सोबत रंगशारदाचे बटाटेवड्यांचे बिलदेखील धाडतो आहे. तुम्हीच भागवावे!! किंवा मांडून ठेवावे. घरात क्‍याश नव्हती. म्यानेजरकडे पेटीएम नव्हते!! शिवाय शेलारमामांना विचारले असता, त्यांनी "मी एकही बटाटावडा खाल्ला नाही, बिल भरण्याचे कारण नाही' असे निक्षून सांगितले. आमच्या विनोदवीर तावडेजींनाही मी "किती बटाटेवडे खाल्लेत?' हे विचारून घेतले. त्यांनी एक बोट वर करून दाखवलेन. सिंगल वड्याचे होऊन होऊन किती होणार? उलट तुमच्या माणसांनीच भरमसाट ऑर्डरी केल्या. अशी माझी गोपनीय माहिती आहे. (गृह खाते माझ्याकडेच आहे. असो!!)

बैठकीच्या वेळी नेमके काय घडले, ह्याचीही माहिती मी घेतली आहे. ती अशी : 114 जागांचा प्रस्ताव देऊन आमच्या माणसांनी शांतपणे कानात काडी घातली. त्यावर तो प्रस्तावाचा कागद उचलून तुमच्या अनिलजी देसायांनी त्याची पुंगळी केली आणि तीही काडीसारखी स्वत:च्या कानात घातली. थोडा वेळ (आणि बटाटेवडे) खाल्ल्यानंतर तुमच्या माणसांनी साठ जागांचा प्रस्ताव ठेवला. ओन्ली सिक्‍स्टी मिस्टर!! जस्ट अबाउट पाच डझन!!
शतप्रतिशत भाजपचा जप करणाऱ्या आमच्या माणसांना "साठप्रतिशत'चे हे गणित कसे पटावे? तेव्हा,
ही साठगाठ जमणे अशक्‍य आहे, असेच दिसते दिसते. काहीही झाले, तरीही आपलाच. नाना.
ता. क. : यापुढील निर्णय मी घेणार आहे, ही शुद्ध अफवा आहे!!. नाना.

Web Title: dhing tang by british nandy