सायकल! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 30 जानेवारी 2017

बेटा : (गोंधळून) कमालच झाली!! मी एवढं ट्रिंग ट्रिंग करतोय, तुझं लक्षही नाही!! कोणाचा फोन होता?
मम्मामॅडम : (सारवासारव करत) होता एका कार्यकर्त्याचा!!

बेटा : (ह्या वेळेला थेट सायकलवर बसून एण्ट्री...) ट्रिंग ट्रिंग!!
मम्मामॅडम : (फोनवर कुणाला तरी सूचना देत) ते काही ऐकून घेणार नाही मी! तू येच!! कळलं? ऑर्डर इज ऑर्डर!!
बेटा : (मम्माचं लक्ष वेधून घेत शेवटी) ढॅणटढॅण!! मम्मा, आयॅम बॅक!
मम्मामॅडम : (घाईघाईने फोन ठेवत) हं...हं!
बेटा : (गोंधळून) कमालच झाली!! मी एवढं ट्रिंग ट्रिंग करतोय, तुझं लक्षही नाही!! कोणाचा फोन होता?
मम्मामॅडम : (सारवासारव करत) होता एका कार्यकर्त्याचा!!
बेटा : (उडवून लावत) कार्यकर्ते हल्ली मला फोन करतात! मी सांगतो, तुला आपल्या दीदीचा फोन असणार..! बरोबर ना?
मम्मामॅडम : (आश्‍चर्यचकित होत) कुठून शिकलास रे एवढ्यात हे सगळं?
बेटा : (दुर्लक्ष करत)...बरं! ही सायकल कुठे ठेवू?

मम्मामॅडम : (धक्‍का बसून) ओह गॉड...तू चक्‍क सायकल घेऊन आलायस?
बेटा : (खांदे उडवत) हो. हल्ली मी सायकलवरूनच फिरतो. डोण्ट यू नो? सायकलिंग इज गुड फॉर हेल्थ. त्यामुळे क्‍यालरीज जळतात आणि पेट्रोलही वाचतं. मला तर वाटतं की माणसानं दोनच वाहनांवरून नेहमी फिरावं. एक सायकल आणि दुसरी...खाट!! हाहा!! मी यूपीत खाटेवरूनही फिरलोय मम्मा!! मज्जा येते!!
मम्मामॅडम : (संयमानं) आपल्या खानदानात कुणी खाट...आपलं सॉरी ते हे...सायकल चालवतं का, बेटा? आपण सायकल काय मोटारसुद्धा नसते चालवायची!!
बेटा : (निरागसपणाने) मग आपलं वाहन कुठलं, मम्मा?
मम्मामॅडम : (पुटपुटत) आपल्याला वाहनाची गरजच नाही मुळी! आपण नुसता "हात' दाखवायचा. इतर येणारी-जाणारी वाहनं थांबतात आपोआप!! आपल्या हाताचा दराराच आहे तसा!!

बेटा : (उजळलेल्या चेहऱ्यानं) वेल, मी तेच तर केलं होतं!
मम्मामॅडम : (संभ्रमात) म्हंजे नेमकं काय केलंस?
बेटा : (उत्साहात) मी रस्त्यात उभा होतो! समोरून यादवांचा अखिलेश नव्याकोऱ्या सायकलवरून आला! मला विचारलं, ""भय्या, कहां जाना है...छोड दूं?''
मम्मामॅडम : (कुतूहलानं) ओहो! मग?
बेटा : (फुशारकीने) मी त्याला म्हणालो की ""तुमकू जाना है, वहांही मुझे भी जाना है!''
मम्मामॅडम : (कौतुकानं) कम्मालच झाली हं! खूप हुश्‍शार झालायस तू आजकाल!
बेटा : (फुशारकी चालू...) मी त्याला म्हटलं की डब्बल सीट जायेंगे, लेकिन सायकल मैं चलाऊंगा!! मग तो म्हणाला की ही सायकल त्याच्या वडिलांची असल्याने मला चालवायला येणार नाही!!

मम्मामॅडम : (नाक मुरडत) असं कुठं असतं का? ज्याला सायकल चालवता येत्ये, त्याला कुठलीही सायकल चालवता येत्येच!
बेटा : (हसतमुखानं) मी त्याला एक्‍झॅक्‍टली हेच सांगितलं! पण तो म्हणाला, ह्या सायकलची चेन सारखी पडते! मी घरी जातो, नवीकोरी सायकल घेऊन येतो! मग तू चालव!!
मम्मामॅडम : (च्याटंच्याट पडत) मग तू त्याच्या घरी गेलास की काय?
बेटा : (नाक उडवत) छ्या!! मी कशाला जातोय? मी बसलो तिथंच झाडाखाली एका खाटेवर!! त्याला म्हटलं, जाव नयी सायकल लेके आव!! हम चलायेंगे!! ये हाथ जब सायकल चलाते है, तब तुफान सडकसे गुजरता है!!

मम्मामॅडम : (जावळातून हात फिरवत) हल्ली ही डायलॉगबाजी बरी जमायला लागलीये तुला हं! मग अखिलेश काय म्हणाला?
बेटा : (गोंधळून) तो म्हणाला की सायकल हाथसे नहीं, पैरसे चलाई जाती है!
मम्मामॅडम : (हताशपणे) याचा अर्थ तोही नव्यानं डायलॉगबाजी शिकलाय!! जाऊ दे. मला एक सांग! तुझी सायकल जेण्ट्‌स आहे की लेडीज?
बेटा : (साफ गोंधळून) लेडीज कशी असेल? का गं मम्मा?
मम्मामॅडम : (विचारात पडत) मी विचार करत्येय की ही तुझी सायकल आपल्या प्रियांकादीदीला चालवता येईल का?

Web Title: dhing tang by british nandy

टॅग्स