मऱ्हाटी जल्लिकट्टू! (ढिंग टांग)

मऱ्हाटी जल्लिकट्टू! (ढिंग टांग)

जल्लिकट्टू खेळण्यासाठी भयंकर म्हंजे भयंकर शौर्य अंगी असावे लागते. उधळलेल्या बैलाला वेसण घालणे हे काही तितकेसे सोपे नाही. छप्पन इंची छातीदेखील त्यास पुरत नाही. प्रथमत: आपण जल्लिकट्टू म्हंजे काय हे समजून घेऊ. पण हे समजून घेताना कधीही बैलाच्या पुढे उभे राहू नये. त्याला टोकदार शिंगे असतात. हो की नाही? तो आपल्या मागे धावून आला की आपणही पाठ वळवून धावू लागतो. हो की नाही? मग? कोण घेईल अशी रिस्क? उधळलेल्या बैलाच्या मागेदेखील उभे राहू नये. त्याच्या मागील पायाचे खूर भयंकर टणक असतात. बैलाला मागल्या बाजूला डोळे नसतात, तेथे दुसरेच काही असते, हे मात्र त्या चांपियन विद्यार्थ्यास तब्बल पंचवीस वर्षे कळले नव्हते!! वेळप्रसंगी शेपटी पिरगाळून किंवा पऱ्हाणी (अर्थ : एक अणुकुचीदार शस्त्र. हे इथे तिथे टोंचून चालत नाही. विशिष्ट ठिकाणीच टोंचले तर परिणाम साधता येतो. असो. ) टोंचून बैलास वठणीवर आणता येईल, असे त्याचे मत होते. शिवाय, त्याला असेही वाटले की तो मागल्या बाजूला असल्याने बैलाला दिसणार नाही. पण नाही! बैल बैल असला तरी तितकासा बैल नसतो, हे त्याला कळले नाही. जाऊ दे.


मुलांनो, बैल हा शेतकऱ्याचा मित्र असतो, हे तुम्ही पाठ्यपुस्तकात वाचले असेलच. पाठ्यपुस्तकात नसेल, तर तुम्हाला जो 'टॅब' दिला आहे ना, त्याच्यात पाहा... नक्‍की सापडेल!! सदरील विद्यार्थी आणि सदरील बैल ह्यांची एरव्ही उत्तम मैत्री होती. वास्तविक सदरील विद्यार्थी हा काही शेतकरी नव्हता. त्याला भुईमूग झाडाच्या वर येतात, आणि टमाटे जमिनीच्या खाली येतात, असेच अनेक वर्षे वाटत असे. इतकेच काय, अंडी कोंबडी देते, हेदेखील त्याला खूप उशिरा कळले. त्याला वाटे, अंडी अंडीवाला देतो!! हाहा!! कित्ती हा निरागसपणा नै? असो. सदरील जल्लिकट्टू विद्यार्थी शहरात, (तेही वांदऱ्यात!) वाढलेला होता. त्याची आणि बैलाची मैत्री होणे तसे कठीणच होते. पण बैल धोरणी निघाला!! बैल बैल होता, तो काही गाढव नव्हता!! बैलाने स्वत:हून पुढाकार घेऊन त्याच्याशी दोस्ती केलीनं. बैल म्हणाला, तू सांगशील त्या दिशेने जाईन. ज्याच्या हाती पऱ्हाणी, तो माझा मालक. ओके? जल्लिकट्टू विद्यार्थी म्हणाला, की "...पण तू बैल कशावरून?'' बैल म्हणाला की ""मी पृष्ठभागी शेण लावले आहे ते काय उगाच? "पाठीला शेण लावून मला बैल म्हणा' अशी मराठीत म्हणच आहे.'' थोडासा (म्हंजे अगदीच थोडासा) विचार करून जल्लिकट्टू विद्यार्थी म्हणाला, ""ओक्‍के. पण माझे ऐकले नाहीस तर ही पऱ्हाणी टोचीन!!''


...एक दिवस विद्यार्थी बैलाला म्हणाला, ""चल, आपण "जल्लिकट्टू, जल्लिकट्टू' खेळूया! तू बैलासारखा उधळ. मी मावळ्यासारखा तुला रोखतो.'' हो ना करता करता बैल तयार झाला. खेळ सुरू होण्यापूर्वी बैलाने एक भलेमोठे कातडे अंगावर ओढून घेतले. त्याखाली तो दडून बसला. जल्लिकट्टू विद्यार्थी म्हणाला, ""टाइम प्लीज... हे चीटिंग आहे! तुम्ही ही अशी पारदर्शकता घालवली तर पऱ्हाणी कुठल्या साइडला टोचायची हे आम्हाला कसं कळणार?''
... जल्लिकट्टू विद्यार्थी अजूनही बैलावरील पऱ्हाणी टोंचायची जागा शोधून ऱ्हायला आहे. असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com