पुन्हा अंघोळ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

बेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक!
मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणाने) हं!
बेटा : (उजळलेल्या चेहऱ्यानं) मम्मा मी अंघोळीला जाऊ?
मम्मामॅडम : (च्याटंच्याट पडत) आँ?
बेटा : (उतावीळपणाने) आय मीन मे आय गो अँण्ड टेक बाथ?

बेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक!
मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणाने) हं!
बेटा : (उजळलेल्या चेहऱ्यानं) मम्मा मी अंघोळीला जाऊ?
मम्मामॅडम : (च्याटंच्याट पडत) आँ?
बेटा : (उतावीळपणाने) आय मीन मे आय गो अँण्ड टेक बाथ?
मम्मामॅडम : (हादरून जात) हे मी काय ऐकतेय? माझा कानांवर विश्‍वास बसत नाहीए...आत्ता काय म्हणालास ते पुन्हा म्हण बरं?
बेटा : (शांतपणे एकेक शब्दाची फोड करत) मी एवढंच म्हटलं की मम्मा, मी-अंघोळीला-जाऊ-का?
मम्मामॅडम : (डोळ्यात पाणी आणत) गए न जाने कितने साल इन्ही लब्जों को सुनने के लिए मेरे कान तरस रहे थे! जा बेटा, अंघोळीला जा! स्वच्छ अंघोळ करून घे, तोपर्यंत मी तुझा आवडता पास्ता करून ठेवते. ओके? थांब, तुला टॉवेल काढून देते...

बेटा : (हाताची घडी घालत शांतपणे) मम्मा, मला टॉवेल नकोय!
मम्मामॅडम : (काहीही ऐकून न घेता) इश्‍श! टॉवेल नको कसा? अंघोळीला जाताना दोरीवरून टावेल ओढायची पद्धत आहे, आपल्या देशात! यूपीत त्या अखिलेशबरोबर हिंडतोयस ना उन्हातान्हात! स्वत:चा टॉवेल, टूथब्रश, साबण सगळं वेगळं ठेवत जा!
बेटा : (दिलदारपणाने) माहीत आहे मला... पण मी माझा टॉवेल परवा अखिलेशला लखनौमध्ये देऊन टाकला! म्हटलं, मित्रा अखिल्या, घे तुला हा टॉवेल. पूस तुझी पाठ खराखरा!
मम्मामॅडम : (समजावणीच्या सुरात) आपला टावेल दुसऱ्याला देऊ नये, बेटा! कुठेही गेलास तरी आपला टावेल, टूथब्रश आणि साबण ह्या तिन्ही गोष्टी प्राणापलीकडे जपाव्यात!
बेटा : (डोळे मिटून) माहीत आहे मला... पण तरीसुद्धा मला टॉवेल नकोय!
म्मामॅडम : (कपाटातून काढत) हा घे, नवाकोरा राजापुरी पंचा!! खास तुझ्यासाठी मागवला होता अडीच वर्षांपूर्वी! घडीसुद्धा उलगडलेली नाहीस! हे बघ, "शहाडे-आठवल्यां'चं लेबलही तसंच आहे अजून!
बेटा : (दीर्घ श्‍वास घेत) तो टॉवेलसुद्धा देऊन टाक कुणाला तरी! मला यापुढे तो कधीच लागणार नाही!
मम्मामॅडम : (नाद सोडत) जाऊ दे... बिनाटावेलची तर बिनाटावेलची अंघोळ कर!! तू स्वत:हून अंघोळीला जातोयस, ह्याहून अधिक मला काय हवं? आता मी खरी मुक्‍त झाल्ये!!

बेटा : (समाधानाने) मी हल्ली रोजच्या रोज अंघोळीला जातो, हे पाहून आपले पार्टीवाले आनंदात न्हाऊन निघताहेत, ह्याची कल्पना आहे मला, मम्मा!! पण मला आता टावेलची गरज लागत नाही! मी रेनकोट घेऊन अंघोळीला जातो!!
मम्मामॅडम : (आश्‍चर्याचा धक्‍का बसून) क्‍काय?
बेटा : (राजेश खन्ना स्टाइल जोराजोराने मान हलवत) हां हां, रेनकोट पहनकर जाता हूं... पुष्पाऽऽ आय हेट वॉटर!
मम्मामॅडम : (कानावर हात दाबत) आता ही पुष्पा कोण?
बेटा : (समजूत घालत) तुम नहीं समझोगी मम्मा! यह राजेश खन्ना का फेमस डायलॉग है!! पण पुष्पा कोण, हे मलाही माहीत नाही!!
मम्मामॅडम : (निक्षून सांगत) रेनकोट-बिनकोट कुछ नहीं!! मुकाट्याने टावेल घेऊन अंघोळीला जा!!

बेटा : (करारी मुद्रेने) मनमोहन अंकल म्हणतात, की रेनकोट पहनकर स्नान करना अच्छा होता है! शीशे के बाथरूममे लोग अक्‍सर रेनकोट पहनकरही स्नान करते है!!
मम्मामॅडम : (संताप आवरत) हे कोणी सांगितलं तुला?
बेटा : (खुलासा करत) अखिलेश म्हणाला! त्यानं सांगितलं, की सरजी, आपके मनमोहन अंकल रेनकोट पहनकर स्नान करते है, ऐसी नमोजीसाहब की इन्फर्मेसन है... आप भी वैसाही करो जी!! ना तौलिये की जरुरत, ना साबुन की!! क्‍यों?'' मी त्याचं ऐकलं!!
मम्मामॅडम : (ट्यूब पेटून) तरीच अचानक तुला अंघोळीची आवड कशी उत्पन्न झाली, ते कळलं!!
बेटा : (विचारात पडत) पण मम्मा, मला एक सांग... मनमोहन अंकल बाथरूमला कडी का लावत नाहीत आतून?

Web Title: dhing tang by british nandy