माय (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

लोकलगाडीच्या डब्यामध्ये
कोपऱ्यात कुठे उभी असतेस,
घामेजलेला चेहरा सारखा
पदराला त्या पुसत असतेस

कधी दिसतेस तिठ्यावरती
किंवा चौकात, रस्त्यावरती
उन्हातान्हात पिशव्या घेऊन
कुठे तरी जात असतेस

आता असल्या ह्या वयात
कशाला करतेस इतकी तडतड?
कोण सांगतं तुला इतकी कामं,
उगीच बडबड करत असतेस?

लोकलगाडीच्या डब्यामध्ये
कोपऱ्यात कुठे उभी असतेस,
घामेजलेला चेहरा सारखा
पदराला त्या पुसत असतेस

कधी दिसतेस तिठ्यावरती
किंवा चौकात, रस्त्यावरती
उन्हातान्हात पिशव्या घेऊन
कुठे तरी जात असतेस

आता असल्या ह्या वयात
कशाला करतेस इतकी तडतड?
कोण सांगतं तुला इतकी कामं,
उगीच बडबड करत असतेस?

तुला आता फारसं
काहीच काम उरलं नाही
वाती वळणं सोडून देऊन
विनाकारण राबत असतेस?

कबूल आहे एकेकाळी
तुझा मोठा डौल होता,
आता उगीच पडक्‍या वाड्यात
भुतासारखी हिंडत असतेस

कबूल आहे एकेकाळी
तुझे हिरवे शिवार होते,
आता सुपात घेऊन काही
तेवढी पाखडत असतेस

कबूल आहे एकेकाळी
तुझा मोठा बारदाना होता
आता मात्र गपगुमान
कोपऱ्यात चूल फुंकत असतेस

आजच्या जगात माये तुला
कवडीइतकी किंमत नाही
तरीही त्वेषात पदर खोचून
उगीच कशाला भांडत असतेस?

हाडाडलेली तुझी काया
सांगत असते वेगळीच कहाणी
तरीही ओठातल्या ओठात तेव्हा
वेगळेच काही गुणगुणत असतेस

आठवत असेल तुला कधी
गाण्यामधला प्रवास माये,----------
हळूच पडद्याआडून काही
उघडेवाघडे बघत असतेस

काय आठवत असते तुला?
जुनेपाने काहीतरी?
हसता हसता मध्येच का मग
हळूच डोळे पुसत असतेस?

सुरकुतलेल्या हातांवरती
थकल्या भागल्या रेषा आहेत
तरीही मनगटात अहेवपणाचा
हिरवा चुडा मिरवत असतेस

कुणीही नसतं तुझ्यासोबत
तरीही कधी एकटी नसतेस
भाळावरचं ठसठशीत कुंकू
म्हणूनच का गं दाखवत असतेस?

अस्तित्वाला तुझ्या तरीही
मायेचं घर नाही,
तरीही तुझ्या असलेपणात
नसलेपण सोसत असतेस

खूप वाटते माये तुझ्या
लेकराले खूप काही...
सांगितलं तर हसूनशेनी
भाळावर बोट ठेवत असतेस

Web Title: dhing tang by british nandy