पुन्हा कटप्पा! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 23 मे 2017

"कटप्पाने बाहुबली कू क्‍यूं मारा?'' हा सवाल नाथाभाऊंनी केला आणि आम्ही अवाक झालो.

"कटप्पाने बाहुबली कू क्‍यूं मारा?'' हा सवाल नाथाभाऊंनी केला आणि आम्ही अवाक झालो.
"जाऊद्या हो! आसंल काही जाती दुश्‍मनी!,'' आम्ही गुळमुळीत बोलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला; पण तो साफ अयशस्वी ठरला. कोण कुठला कटप्पा, त्याने दक्षिणेतल्या कुठल्यातरी दुर्गम भागात राहणाऱ्या बाहुबलीस मारले, आपल्याला त्याचे काय येवढे? पण नाथाभाऊंनी हा सवाल भलताच मनावर घेतलेला दिसला.
"सांगा नं भाऊ, का गेम केला बाहुबलीचा?'' नाथाभाऊंनी पंजा नाचवत आम्हाला पुन्हा एकवार छेडले. आता कोणीही कोणाला चापटीसुद्धा मारू नये, ह्याच मताचे आम्ही आहोत. गेम करणे वगैरे दूरचीच बात. का गेम केला बाहुबलीचा? ह्याला काय उत्तर देणार?
" कुणी?,'' आम्ही बेसावध होतो.
" अबे, कटप्पानं वडापाव दिला नं त्याले? बाहुबलीले? का कोणी दुसऱ्याच माणसानं दिला? पिच्चर नै बघितला का?,'' नाथाभाऊ वैतागले.
"बघितला की...तीनदा!,'' आम्ही तीन बोटे नाचवत म्हणालो.
"मग? तरी नाही कळलं? एवढं रामायण घडलं तरी तुमचं आपलं रामाची शीता कोण? सांगा पटाकदिशी...कटप्पानं बाहुबलीच्या पाठकांडात तरवार का बरं खुपसून दिली?,'' नाथाभाऊ हट्टाला पेटले होते.
"काहीतरी भावबंदकीची भानगड होती म्हंटात...,'' आम्ही चाचरत म्हणालो. वास्तविक तीनदा पिच्चर बघून आम्हाला नेमके तेवढेच कळले नव्हते!!
" येडे आहात, येडे! त्याचं असं झालं की बाहुबली टेचात होता; पण बिज्जलदेवाले त्याच्या पोरासाठी माहिष्मतीचं राज्य हवं होतं. काय त्याचं नाव?,'' नाथाभाऊंनी डोके खाजवत विचारले.
"भल्लालदेवेंद्र!,'' नाही म्हटले तरी आम्ही तीनदा बाहुबली पाहिला होता.
"देवेंद्र कुठून काढला भौ? नुस्ता भल्लालदेव!'' नाथाभाऊंनी चुकीची दुरुस्ती केली. तसे तर तसे!! ते पुढे म्हणाले, "बिज्जलदेव व्हिलन असतो बरं का!!''
"हाओ!'' आम्ही रुकार दिला.
"बिज्जलदेवाने बाहुबलीच्या आईले बाहुबलीचा एंकाउंटर करावा लागते, नाही तं राज्ये गेल्लंच म्हणून समजा, असं सांगून देलं. बाहुबलीची आई कोण? तर शिवगामीबाई!! कळलं का?,'' नाथाभाऊ म्हणाले.
"लई बाराचा-,'' आमच्या मुखातून नकळत गाळी जायची, पण जीभ वेळीच आवरली.
"कटप्पा होता एक नंबरचा गुलाम! पडत्या फळाची आज्ञावाला!!'' नाथाभाऊ दातोठ खात म्हणाले.
"गुलामी नष्ट करण्याचीच आज खरी गरज आहे! हे गुलाम लेकाचे नको त्यावेळी, नको त्याला हॅंडरमी देऊन जातात!!,'' आम्ही अनवधानाने म्हणालो; पण नाथाभाऊंचे लक्ष नव्हते. त्यांचे मन बॅकष्टोरीतच गुंतले होते.
"...मग शिवगामीबाईनं कटप्पाले घातली शपथ, का भौ, असशीन जातीचा तर काढशीन कोथळा! जाय, आणि बाहुबलीचा गेम करून ये!!'' नाथाभाऊ डोळे बारीक करुन ष्टोरी सांगत होते. आम्ही मन लावून ऐकत होतो. ते म्हणाले, "मग काय! कटप्पानं उचलली तरवार आणि खुपसली बाहुबलीच्या पाठकांडात!! बाहुबलीचा जागच्याजागी कांग्रेस!! ''
"अर्रर्र!! फारच बेकार झालं! पुढं काय झालं?,'' आम्ही.
"पुढं काय होणाराय? मोठा समारंभ झाला. आख्खी माहिष्मती नगरी लोटली. ढोल-नगारे वाजले आणि...,'' इथं नाथाभाऊंचा आवाज कापला. पुढील अनर्थ ओळखून आम्ही खिशातला रुमाल काढून त्यांच्या समोर धरला. रुमालात भावपूर्ण शिंकरत त्यांनी हुंदका आवरला.
"पुढे काय झालं नाथाभाऊ?'' आम्ही हळूवार आवाचात विचारले.
"काय होणार लेका? भल्लालदेव उंचच्या उंच पाठीच्या शिंव्हासनावर बसला. आख्ख्या होल स्टेडियममध्ये त्यानंच शपथ घेतली!! आणि बाहुबली बसला...,'' पालथी मूठ मुखाकडे नेत दुखऱ्या आवाजात नाथाभाऊ म्हणाले.
...हे बाकी हे खरे होते. बाहुबलीच्या जागी भल्लालदेवानं भर ष्टेडियममध्ये शपथ घेतलेली आम्ही ह्या डोळ्यांनी तीनदा पाहिली आहे. असो.
Web Title: dhing tang by british nandy