टमाटे पुराण! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 31 जुलै 2017

चालू काळात टमाट्याचे भाव गगनाला भिडले असून हरियाना राज्यातील टमाटे संपल्याने असे घडल्याचे सांगण्यात येत आहे. ह्याच्याखेरीज देशभरात अनेक ठिकाणी पूर आल्याने टमाटे वाहून गेल्याचेही आम्हाला खात्रीलायक गोटातून कळले आहे.

टमाटे हे फळ आहे की भाजी (की फळभाजी?) हा एक संशोधनाचा विषय आहे. आम्हांस विचाराल तर टमाटे हे टमाटे आहेत. टमाट्यास भाजी म्हटले तर फळवादींचे (नशीब) फळफळते, आणि त्यास फळ असे संबोधले तर "भाजीझम'वाले करपतात. टमाटे ही लालुंग्या रंगाची रसरशीत फळसदृश भाजी किंवा भाजीसदृश फळ आहे, तो एक खाण्यायोग्य सामान्य, परंतु अत्यंत महागडा पदार्थ आहे असे तूर्त म्हणून पुढे गेलेले बरे. असो.

सांप्रतकाळी टमाट्यास सफरचंदाचा भाव आला असल्याने अनेकांचा सॉस अडकल्याचे दिसते. "खाईन तर टमाट्याशी, नाहीतर उपाशी' हा हट्‌ट बरा नव्हे!! वास्तविक सदर फळ (किंवा भाजी किंवा जे काही असेल ते) गेल्या शतकापर्यंत हिंदुस्थानात उगवतच नव्हती व ही शुद्ध परकीय वनस्पती भारतीय आहार-संस्कृतीचा भाग होऊ शकत नाही, असा विचारप्रवाह हल्ली वाहूं लागला आहे. तथापि, हा शुद्ध गैरसमज आहे. टमाट्याचे मूळ हे मेक्‍सिको किंवा तत्सम कुठल्यातरी देशातले असावे, ही थिअरी आम्हांस मान्य नाही. कां की ही थिअरी मान्य करणे म्हंजे टमाट्याचे सॉस म्हणून रंग घातलेला भोपळ्याचा लगदा खाण्यापैकी आहे. टमाटे हे तद्दन देशी वाणाचे उत्पादन असून, प्राचीनकाळी हे फळ (किंवा भाजी...किंवा जे काही असेल ते!) सफरचंदापेक्षाही अधिक लोकप्रिय होते, हे आम्ही सप्रमाण सिद्ध करून दाखवू.

महाभारतकालीन इतिहासात टमाट्याचे उल्लेख सांपडतात. सखोल संशोधनांती, द्रौपदीने आपल्या सुप्रसिद्ध थाळीत भगवान श्रीकृष्णाला टमाट्याचे सूप वाढल्याचा दाट संशय आम्हास आला आहे. गीर्वाण (पक्षी : संस्कृत) भाषेत "तमःतेजाचा अर्क तुजला प्रसाद म्हणून चढवत आहो' अशा अर्थाच्या ऋचा आहेत. ह्यातील "तमःतेजाचा अर्क' म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून टमाट्याचे सूप आहे, हे कोणालाही मान्य होईल. तमःतेज ह्या शब्दाचा पुढे अपभ्रंश होऊन तमःतेह- तमातेय-टमाटेय असा प्रवास झाला. हल्ली ह्या भाजीस (किंवा फळास... किंवा जे काही असेल ते) टॉमेटो असे उगीचच म्हटले जाते. हे शुद्ध पाश्‍चिमात्यांचे अंधानुकरण आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. जसे : जगरनॉट हा इंग्रजी शब्द "जगन्नाथाचा रथ' ह्यावरून पडला. पडू दे. त्या विषयात आम्ही तूर्त जाऊ इच्छित नाही.

मधल्या काळात टमाटे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने त्यातील निवडक सडका माल काही कमनशिबी पुढाऱ्यांस फेकून मारण्याकडे पब्लिकचा कल असे. हल्ली ही चैन पर्वडणारी राहिलेली नाही. म्हंजे दात आहेत तर चणे नाहीत, अशी स्थिती आली!! इतके पुढारी मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना टमाटे मात्र महागामोलाचे झाले हा सरासर अन्याय आहे. अच्छे दिन, अच्छे दिन म्हंटात ते हेच का? काही पुढाऱ्यांस टमाटे झाडाला फांदीला येतात की मुळाशी हेच कळत नाही. काही पुढाऱ्यांचे भुईमुगाच्या बाबतीत असेच गैरसमज आहेत, तर काही नेत्यांस ऊस मुळासकट खातात, येवढेच कळते. चालू काळात टमाट्याचे भाव गगनाला भिडले असून हरियाना राज्यातील टमाटे संपल्याने असे घडल्याचे सांगण्यात येत आहे. ह्याच्याखेरीज देशभरात अनेक ठिकाणी पूर आल्याने टमाटे वाहून गेल्याचेही आम्हाला खात्रीलायक गोटातून कळले आहे. हे खात्रीलायक गोट आमच्या आळीच्या मुखाशी वसलेल्या गुप्ता भाजीवाल्याच्या टपरीत राहाते. चोरून गांजा विकणाऱ्याच्या चेहऱ्यावरची कळा तूर्त गुप्ता भाजीवाल्यांस आली असून, त्याचे ताजे प्रत्यंतर आम्हांस परवाच आले.
त्याचे असे झाले की-
"कुछ है क्‍या?'' भिवई उडवून आम्ही विचारले. त्याने गंभीर चेहऱ्याने दुर्लक्ष केले. आमचा पानवालाही गुटखा विकताना असाच आविर्भाव करतो.
"कितना?'' त्याने पुटपुटत विचारले. आम्ही एक बोट दाखवले.
एका काळ्या पलाष्टिकच्या पुडीत एकुलता एक टमाटो बांधून त्याने गपचूप आमच्याकडे माल सर्कवला.
"सिर्फ एक टमाटा?'' आम्ही ओरडलो.
त्यावर खर्जातला खास आवाज लावत गुप्ताजी खेकसले, "मरवाओगे क्‍या?''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing tang by british nandy