धिस वे, दॅट वे... ऑर दान वे! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

"नेमकं काय होणाराय?'' आम्ही असहाय नजरेने बशीकडे पाहात विचारले.
"तुमचं पुणं हे एक भयंकर भ्रष्ट शहर आहे...,'' दोन शेंगदाणे तोंडात टाकत रावसाहेबांनी थेट आरोप केला. त्यांनी अचानक अंग शहारल्यासारखे केले. चेहरा वेडावाकडा केला.

"अशानं असं झालं की म्हंजे मग असंच होणार...,'' रावसाहेबांनी डोळे वटारून आम्हाला बजावले, तेव्हा नेमका आम्ही शेंगदाण्याच्या बशीकडे हात नेला होता. निमूटपणाने मागे घेतला. शेंगदाणा ही वस्तू कितीही दातांत अडकली तरी वारंवार खावीशी वाटते, हे शतप्रतिशत सत्य आहे. बेसावधपणाने उचललेला बशी किंवा पुडीतील शेंगदाणा खवट निघण्याची रिस्क असते. तीही आम्ही पुरेशी घेतलेली होती. रिस्कशिवाय काहीही होत नाही. असो.
"नेमकं काय होणाराय?'' आम्ही असहाय नजरेने बशीकडे पाहात विचारले.
"तुमचं पुणं हे एक भयंकर भ्रष्ट शहर आहे...,'' दोन शेंगदाणे तोंडात टाकत रावसाहेबांनी थेट आरोप केला. त्यांनी अचानक अंग शहारल्यासारखे केले. चेहरा वेडावाकडा केला.

"शेंगदाणा खौट लागला ना?'' आमचा शाप तत्काळ लागू पडल्याचा आनंद कसाबसा लपवत आम्ही विचारणा केली.
"नाही. पुणं भ्रष्ट झालं म्हणून वाईट वाटतंय! भयंकर म्हंजे भयंकर भ्रष्ट!!'' रावसाहेबांनी खुलाशादाखल आणखी एक शेंगदाणा खाऊन दाखवला.
"कशावरुन?'' आम्ही.
"वास्तविक स्मार्ट सिटी योजनेत खरं तर पहिल्या क्रमांकाने पुण्याचा समावेश व्हायला हवा होता. पण नाही झाला. का विचारा?'' रावसाहेब.
"का?'' आम्ही...दुसरे कोण?
"भ्रष्टाचार! भ्रष्ट कारभारामुळे पुणं कायम मागे राहिलं आहे!'' रावसाहेबांनी गोळीबंद युक्‍तिवाद करत आपला मुद्दा असा काही रेटला, की आम्ही गारच पडलो. पुणे कशात तरी मागे आहे, यावरच आमचा मुदलात विश्‍वास नव्हता (आणि नाही!!! कळले? हं!!) पण आम्ही पुणेकर (कधी कधी) समोरच्या पार्टीला बरेच बोलू देतो. त्यानुसार आम्ही फारशी काही टिप्पणी केली नाही.

"पण असं का झालं असेल?'' बशीत ज्यंत्यं साताठ शेंगदाणे उरले होते. त्या दिशेने हात सरकवत आम्ही विचारले.
"त्या "घड्याळ'वाल्यांना निवडून दिलंत... मग काय होणार? त्यांच्या नेत्यांवरच डोंगराएवढे आरोप आहेत. मग त्यांचे कारभारी कसे मागं मागं राहणार? भ्रष्टाचारात लेकाचे सगळ्यात पुढे!!'' रावसाहेबांनी इथे शेंगदाण्यांची आख्खी बशीच हातात घेऊन कमळासारखी बोटांच्या पाचुंद्यावर धरली. कमळपुष्पाच्या बिसतंतूंमध्ये अडकलेल्या भुंग्यांप्रमाणे ते शेंगदाणे दिसत होते, "पुणं खल्लास झालं ना इथेच! आमच्या पार्टीकडे पॉवर असती, तर आज पुणे-बॅंगलोर बुलेट ट्रेन सर्वांत आधी धावली असती... काय समजलेत?''
पुणे-बंगळूर बुलेट ट्रेन? पण का? पुण्याहून बंगळूरास कोण इतके वारंवार जाते? त्यापेक्षा बावधन साइडच्या बस वाढवा, असा पोक्‍त विचार आमच्या मनात डोकावू लागला. तो आम्ही तत्काळ झटकला.

"म्हंजे भ्रष्टाचारात पुणे आघाडीवर आहे, असं तुम्हाला म्हणायचंय का?'' टीव्ही च्यानलवरच्या मुलाखती बघून बघून आम्ही तय्यार झालो आहो, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येथे आले असेल! एकच सवाल उलटा-तिलटा करून करून विचारत राहायचे. बरोब्बर टायमात मुलाखत संपवता येते.
"जागतिक शहर होण्याची क्षमता असलेल्या ह्या शहराचं काय झालंय, तुम्हीच बघा! पण काळजीचं कारण नाही. औंदा धिस वे ऑर दॅट वे... आम्ही पुणे काबीज करणार म्हंजे करणार!!'' रावसाहेबांनी ग्वाही दिली. त्यासरशी इथे बशीरूपी कमळातला आणखी एक भुंगा नष्ट झाला. रावसाहेबांनी बशी खाली ठेवली. त्यात एकच भुंगा शिल्लक होता. तो आम्ही चपळाईने पटकावला...

" पण तुमची कमळ पार्टी गुंडापुंडांची झाली आहे, असा आरोप होतो आहे, त्याचं काय?'' शेंगदाणा तोंडात टाकत आम्ही पुणेकर असल्याने कमालीचे परखड आहोत. उगीच वाट्टेल ते ऐकून घेत नाही. "काय करणार? सरळ बोटानं भांड्यातलं लोणी निघत नसंल, तर बोट वाकवावं लागतंय! पुढचं दार बंद असंल तर मागल्या दाराशी जावं लागतंय! आता तरी तुम्ही पुणेकर आम्हाला मत देशाल, की नाही?'' रावसाहेबांनी त्यांचा मार्ग सांगितला.
...इथे आम्ही चेहरा वेडावाकडा केला. शेवटचा शेंगदाणा खवट निघावा? कसे होणार पुण्याचे? असो.

Web Title: dhing tang by british nandy on raosaheb danve