पुनःश्‍च हरि ॐ! (ढिंग टांग)

dhing-tang
dhing-tang

नेमके सांगावयाचे तर ती वैशाखातील एक टळटळीत सकाळ होती. (खुलासा : मुंबैत स. अकरानंतर सारे काही टळटळीतच असत्ये...) आता ह्या माहितीतही नेमकेपणा नाही असे कुणी म्हणेल. वैशाख म्हंजे कुठला वैशाख? तिथी कुठली? संवत्सर कुठले? प्रहर कुठला? ऐसे सवाल उमटतील; परंतु बखरकाराचे भान हरपल्यामुळे ह्या नोंदी झालेल्या नाहीत. ऐनवेळी त्यास क्‍यालिंडर सांपडले नाही; परंतु तो एक मंगलमय दिवस होता, येवढे मात्र खरे आणि तेवढे पुरेसे आहे... 

....राजगडाला नुकतीच जाग आली होती. सकाळी उठोन राजियांनी तांतडीने बाळाजीपंत अमात्यांना बलाऊ धाडिले. म्हणाले, ""आम्ही महाराष्ट्र दौऱ्यावर निघत आहोत! तात्काळ!! घोडी जोडावीत, कटकांस सांगावा धाडावा! मावळे जमवा, पहिला मुक्‍काम वसईऽऽऽ....'' 
झाले! उभ्या दादर भागात खळबळ उडाली. राजे निघाले! राजे निघाले!! बाळाजीपंतांनी धावाधाव करोन मावळे जमविले. घोडियांवर खोगीरे चढविली. राजगडाच्या बालेकिल्ल्यात राजेदेखील तयार होत होते. युद्धाचा जामानिमा चढवताना घामाच्या धारा लागल्या होत्या. सारी आयुधे कुठे कुठे धारण केल्यावर बिचवा, वाघनखे कुठे दडवावीत, हे क्षणभर राजियांना कळेना! 
""या वाघनखांचे काय करावे?'' राजे स्वत:शीच पुटपुटले. 
""सोबत एक छोटी ब्याग घ्यावी, राजे!'' बाळाजीपंतांनी सूचना केली. 
""हॅ:!! वाघनखं म्हंजे काय दाढीचं सामान आहे?'' राजे खेकसले. त्यांच्या खेकसण्याने बाळाजीपंतांनी सुटकेचा निःश्‍वास सोडिला. राजे जेव्हा खेकसतात, तेव्हा ते चांगल्या मूडमध्ये असतात, हे ते जाणोन होते. 
""राजे, सील करा अंगाला!,'' बाळाजीपंत म्हणाले. मोहीम जोखमीची होती. थेट वसईपर्यंत दौड मारणे म्हंजे नुसते भुजिंग (खुलासा : हा एक वसईचा भन्नाट पदार्थ आहे.) खायचे काम नाही. गनिमाचा मुलुख वलांडून वसईकडे कूच करावे लागते. मध्येच वसलेल्या बांदऱ्याच्या शिद्‌दीस बगल देवोन वसईची वाट धरावी लागते. कुणी फंदफितुरी केलियास येक म्हणता येक व्हावयाचे! परंतु, राजियांचे मनसैनिक जीवाला जीव देणारे! 

"माध्यान्ही नंतर चार घटकांनी अश्‍वांस टांच मारावी. वसईकडे कूंच करावे. येश निश्‍चित आहे,' असे भविष्य राजज्योतिषाने मांडून दाखवले. माध्यान्हीनंतर चार घटकांनी! बाप रे!! कटोकटीचा मुहूर्त आहे!! भोजनोत्तर डोळा लागला म्हंजे संपलेच सारे!! पण राजियांचे मावळे जिद्दीला पेटले होते... 

""राजे, सील करा अंगाला!'' बाळाजीपंत पुन्हा काळजीच्या सुरात म्हणाले. बाळाजीपंतांच्या सुरातच काळजी आहे. ऐकावे तेव्हा ते काळजीपोटीच बोलत असतात. असो. 

""अहो, कसलं सील? मरणाचं उकडतंय इथं!!,'' राजे पुन्हा खेकसले. दुपारच्या उन्हात दौड मारायला लावतात लेकाचे! घामाच्या धारा टिपत राजे विचार करत होते : महाराष्ट्र दौरा पोष्टपोन केला तर? पावसाळा संपता संपता केला तरी असे काय बिघडणार आहे? लढत होणार ती पुढील वर्षात! त्यासाठी इतक्‍यात कशाला दौरा काढावा? 
""...राजे वसईचे भुजिंग हे एक अलौकिक प्रकर्ण आहे. पोहे आणि मुर्गी ह्यांचा हा चटकदार संगम जातिवंत खवय्यास बेमालूम जिंकतो!'' बाळाजीपंतांनी राजियांच्या मनातील विचार वळखून भुजिंगाचे आमिष पुढे केले. 

""अलबत! चला रे...निघू या!'' असे म्हणत राजे ताडताड पावले टाकीत निघाले. पाठोपाठ त्यांचे मनसैन्य. काळ थांबला. वळचणीच्या पाली चुकचुकणार होत्या; परंतु नियतीने त्यांस चिडीचूप केले. नियती रागेजली...""अपशकुन नका करू हडळींनो!'' शिवाजी पार्कच्या मैदानाभवतालच्या वाड्या-वस्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. 
वसईच्या दिशेने तलवारीचे टोंक करोन राजे म्हणाले : ""हर हर हर हर महादेऽऽव! पुनःश्‍च हरि ॐ!!'' 
...ऐसे म्हणोन अचानक त्यांनी घोड्याचे मुख दक्षिण मुंबईकडे वळवले. मनाशी म्हणाले, ""आधी हुतात्मा चौकात जाऊन यावे, हे बरे...नंतर जाण्यात काय हशील?'' 
इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com