काळा, पांढरा आणि...भगवा! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी 
सोमवार, 9 जानेवारी 2017

स्थळ : मातोश्री, वांद्रे. 
वेळ : नीजानीज. 
काळ : जांभईकाळ! 
पात्रे : महाराष्ट्र कुलमुखत्यार श्रीमान उधोजीसाहेब आणि...प्रिन्स विक्रमादित्य.
 

स्थळ : मातोश्री, वांद्रे. 
वेळ : नीजानीज. 
काळ : जांभईकाळ! 
पात्रे : महाराष्ट्र कुलमुखत्यार श्रीमान उधोजीसाहेब आणि...प्रिन्स विक्रमादित्य.
 

विक्रमादित्य : (दार ढकलत) हाय देअर बॅब्स...मी आत येऊ? 
उधोजीसाहेब : (पायाने पांघरुण घेण्याच्या अपयशी प्रयत्नात) नको! 
विक्रमादित्य : (गंभीर सुरात) मला काही बोलायचंय...इंपॉर्टंट!! माझ्या डोक्‍यात एक सॉल्लिड आयडिया आली आहे!! 
उधोजीसाहेब : (डोक्‍यावरून मस्त पांघरुण घेत) बाप रे!! कुठेही नवी ओपन जिम उभी करायची नाहीए आपल्याला! कळलं? जा आता!! मी दमलोय!! 
विक्रमादित्य : (खुलासा करत) जिमबद्दल नाही विचारायला आलो! इट्‌स अबौट कल्याण!! 
उधोजीसाहेब : (कंटाळून) कुणाचं कल्याण? 
विक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्यानं) डोंबिवलीचं कल्याण! 
उधोजीसाहेब : (दुप्पट कंटाळलेल्या आवाजात) हे बघ...मी खरंच दमलोय! कल्याणला जाऊन बांदऱ्यात परत येणं तितकं सोपं नसतं! मुळात कल्याणला जाणंच दुर्गम झालं आहे हल्ली!! हाडं खिळखिळी झालीत!! त्या काळी महाराजांनी कल्याणात कसा काय इतिहास घडवला कोण जाणे!! 
विक्रमादित्य : (एकदम आठवून) बॅब्स...कल्याणला दुर्गाडी किल्ला आहे ना? 
उधोजीसाहेब : (संयमानं) हो आहे!! 
विक्रमादित्य : (बोट नाचवत) आणि खाडी? 
उधोजीसाहेब : (कंटाळून) हो रे बाबा! 
विक्रमादित्य : (टाळी पिटत) बास! तीच माझी आयडिया आहे!! मला तिथं आरमार उभं करायचं आहे! 
उधोजीसाहेब : (च्याटंच्याट पडत) काय? 
विक्रमादित्य : (ठामपणाने) आ-र-मा-र!! 
उधोजीसाहेब : (दातोठ खात) आरमार कशाला म्हंटात ठाऊक आहे का तुला? 
विक्रमादित्य : (निरागसपणाने) काही तरी आपल्या मावळ्यांच्या युद्धासारखंच असणार!! ना? तुम्हीच भगव्या तलावावर बोलताना मी ऐकलं! 
उधोजीसाहेब : (आवंढा गिळत) काय बोललो मी? 
विक्रमादित्य : (स्फुरण चढल्यागत) हेच की...""माझ्या मर्द मावळ्यांनो, ह्या इथं, ह्याच कल्याणच्या भूमीत थोरल्या महाराजांनी मराठी आरमाराची मुहूर्तमेढ रचली. 
उधोजीसाहेब : (खोल आवाजात) असं बोललो मी? 
विक्रमादित्य : (ठामपणाने) अफकोर्स!! इथं आरमाराचं स्मारक उभारा अशी आज्ञा केलीत तुम्ही!! 
उधोजीसाहेब : (हळहळत) ते जरा चुकलंच! 
विक्रमादित्य : (हट्‌टानं) ते स्मारक मी करणार!! 
उधोजीसाहेब : (समजावून सांगत) अरे आरमार म्हंजे बोटी असतात! शिप्स!! तेव्हा त्याला जहाजं म्हणायचे!!..अशी शेकडो जहाजं उभी करायची समुद्रात! त्या जहाजांवर तोफा...तोफांत गोळे!! गोळ्यात दारूगोळा!! दारूगोळ्यात आपलं ते हे...(पुढचं आठवेनासं होतं.) सोपं नाही, आरमार उभं करणं! तो काय पुतळा उभारायचाय? काही तरीच तुझं!! जा, झोपायला जा बरं!! 
विक्रमादित्य : (निर्धाराने) मी भगवं आरमार उभारणार!! 
उधोजीसाहेब : (संवाद गुंडाळण्याच्या प्रयत्नात) भगवा तलाव पुष्कळ झाला आपल्याला! कालपर्यंत लोक त्याला कल्याणचा "काळा तलाव' म्हणून ओळखत होते; पण सध्या काळ्याचे पांढरे करण्याचे दिवस आलेत!! 
विक्रमादित्य : (निरागसते...तुझं नाव विक्रमादित्य!) मग तुम्ही का नाही काळ्याचा पांढरा केलात...तलाव? 
उधोजीसाहेब : (धोरणीपणाने) आपला भगवा तलावच बरा!! 
विक्रमादित्य : (वैतागानं) हॅ:!! लोक समुद्रात पुतळे करतात!! कुणी फुलपाखरांच्या बागा बनवतं!! कुणी हायटेक गार्डन्स बनवतं!! लोक काय काय करतात, तुम्ही आपले तळ्याच्या काठावर पाय सोडून बसलेले!! ह्याला काय अर्थय? 
उधोजीसाहेब : (समजूत घालत) सध्याच्या दिवसात आपल्याला तेवढंच पर्वडण्यासारखं आहे!! तुला नाही समजणार भगव्या तलावाचं महत्त्व!! तू झोपायला जातोस की आता मी उठू? 
विक्रमादित्य : (चुटकी वाजवत) आय गॉट इट!! "तळे राखी तो पाणी चाखी'!! असंच ना? 

Web Title: Dhing Tang Editorial