प्रश्‍नपंचकाचे रहस्य! (ढिंग टांग! )

ब्रिटिश नंदी 
बुधवार, 11 जानेवारी 2017

गेले काही दिवस आम्ही फडताळात जाऊन बसलो होतो. विश्‍वाची चिंता वाटू लागली की आम्ही असे अधूनमधून करतो. डुलत डुलत चालत जावे. दुधाचे भांडे दूर सारून अंमळ जागा करावी आणि खुशाल फडताळात गुडघ्यावर आडवा पाय टाकून, दोन्ही हात माथ्याखाली घेऊन पडून राहावे. जीवनाची गुह्ये आम्हाला दोनच ठिकाणी अचूक सांपडतात. एक, हे फडताळ (दुसरा खण) आणि दुसरे ठिकाण...जाऊ दे. सारीच गुह्ये कशाला उघडी करून दाखवायची? 

गेले काही दिवस आम्ही फडताळात जाऊन बसलो होतो. विश्‍वाची चिंता वाटू लागली की आम्ही असे अधूनमधून करतो. डुलत डुलत चालत जावे. दुधाचे भांडे दूर सारून अंमळ जागा करावी आणि खुशाल फडताळात गुडघ्यावर आडवा पाय टाकून, दोन्ही हात माथ्याखाली घेऊन पडून राहावे. जीवनाची गुह्ये आम्हाला दोनच ठिकाणी अचूक सांपडतात. एक, हे फडताळ (दुसरा खण) आणि दुसरे ठिकाण...जाऊ दे. सारीच गुह्ये कशाला उघडी करून दाखवायची? 

...असे काय घडले म्हणून नोटाबंदीचा निर्णय घ्यावा लागला? तो नेमका कोणी व कोठे घेतला? नोटाबंदीने काय साधले? नोटाबंदीचा निर्णय यशस्वी ठरला की फसला? ह्यातून आम्हाला काय लाभ होणार?..ह्या प्रश्‍नपंचकाने आम्हाला छळ छळ छळिले होते. ह्याच पांच प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी रिझर्व ब्यांकेच्या गौरनरास दिल्लीत बोलावणे धाडण्यात आले. खुद्द प्रधानसेवकांनाही ही उत्तरे द्यावी लागणार आहेत. त्यांना मदत व्हावी, ह्या सद्‌हेतूने आम्ही अखेर फडताळात जाऊन बसलो. बराच काळ तेथे गुडघ्यावर आडवा पाय घालून मस्तकी दोन्ही हातांची उशी करून बसलो असताना अचानक आमच्या मन:चक्षुंसमोर प्रभा फांकिली. लोडशेडिंग संपल्यानंतर अचानक लाईट येऊन डोळे दिपावेत, तसे झाले. एका क्षणात आम्हाला वरील पांचही प्रश्‍नांची उत्तरे सांपडली. तीच आपणांसमोर ठेवीत आहो. 

प्रश्‍न 1. नोटाबंदीचा निर्णय कां घ्यावा लागला? 
उत्तर : खनपटीला बसल्याशिवाय उसनवारी सुटत नाही, हे एक व्यावसायिक सत्य आहे. गुदस्त महिन्यात शा. शामळजी अेण्ड सन्स ह्यांनी आम्हास साधी साबणवडी देण्यास उर्मट नकार दिला. परिणामी आम्ही आठ दिवस आंघोळ करू शकलो नाही. शा. शामळजी ह्यांची किराणा थकबाकी चुकती केल्यानंतरच आम्हाला टावेलची घडी मोडता आली! तात्पर्य हेच की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही आणि पोटात गुच्ची मारल्याशिवाय उघडे तोंड बंद होत नाही. कळले? 

प्र. 2. तो नेमका कोणी व कधी घेतला? 
उत्तर : आपले लाडके प्रधानसेवक श्रीमान नमोजीहुकूम ह्यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट आमच्या कानात खुद्द राहुलजी गांधी ह्यांनी केला. आमचा त्यांच्यावर विश्‍वास आहे. नमोजी ह्यांनी हा निर्णय कुठे घेतला, हेही ओळखणे सोपे आहे. एकतर फडताळात, नाहीतर...जाऊ दे. सारीच गुह्ये कशाला उघडी करा? 

प्र. 3. नोटाबंदीने काय साधले? 
उत्तर : आमचे शेजारी श्री. रा. रा. बंशीधर बनचुके ऊर्फ बंब हे पीडब्लूडी खात्यात आहेत. ""कुठे ठेवाल इतके पैसे लेको!'' असे त्यांना आम्ही कौतुकादराने विचारीत असू. गेल्या महिनाभरापासून घरातली कणीक संपल्यासारखा चेहरा करून ते हिंडताना दिसतात. कुठे ठेवाल? ह्या प्रश्‍नाचे उत्तर आम्हाला ब्यांकांच्या रांगेत सांपडले. 

प्र. 4. नोटाबंदीचा निर्णय यशस्वी ठरला की फसला? 
उत्तर : नोटाबंदी यशस्वी झाली, म्हणून फसली! किंवा नोटाबंदी फसली, म्हणून तिला यश आले, असेही म्हटले तर वावगे होणार नाही! सर्वश्री रा. रा. चुलतराज ह्यांच्यामते नोटाबंदी सपशेल फसली असून श्रीमान नमोजीहुकूम ह्यांची बॉडी लॅंग्वेज त्यानंतर बदलली आहे! हाच नोटाबंदी फसल्याचा याहून अधिक मोठा पुरावा कोठला हवा? तथापि, लोकांच्या खिश्‍यात पैसे नसले तरी ब्यांकेत आले आहेत. लोक फसले, ब्यांका हसल्या! "हसी, तो फसी' अशी म्हणच आहे. त्याअर्थी नोटाबंदी फसली आहे. क्‍या समझे? 
प्र. 5. त्यातून आम्हाला काय लाभ होणार? 

उत्तर : हा सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न आहे. नोटाबंदीमुळे खिश्‍यात पैसे नसणे हे शिव्या खाण्याचे लक्षण नसून प्रतिष्ठेचे ठरले. जो मनुष्य सर्वात क्‍याशलेस, तो सधन व देशप्रेमी होय! त्याअर्थाने आम्ही स्वत: या मोहिमेचे सर्वात मोठे लाभार्थी ठरलो आहो. कृपया (आम्ही फडताळातून उतरून) बाहेर पडल्यावर आम्हाला आदराने वागवावे. खिश्‍यात नाही फद्या, तोच राजा उद्या!! कळले? इति. 
 

Web Title: Dhing Tang Editorial