कानगोष्ट! (ढिंग टांग)

कानगोष्ट! (ढिंग टांग)

एखादे माणूस दुसऱ्याच्या कानास लागले, की तिसऱ्याचे कान लागलीच टवकार्तात, हे मानवी स्वभावाचे वैशिष्ट्यच आहे. त्यात नवीन असे काही नाही. दोघांचे खासगी संभाषण टिपण्याच्या खोडीतूनच वाचकहो, शोधपत्रकारितेचा जन्म झाला आहे, याकडे आम्ही प्रारंभी आपले लक्ष वेधू. सांप्रत काळी एका यक्षप्रश्‍नाने उभ्या भारतभूमीला छळले असून, तो यक्षप्रश्‍न असा : मुलायमसिंहजी नमोजी ह्यांच्या कानात काय कुजबुजले?

‘कटप्पाने बाहुबली को क्‍यूं मारा?’ ह्या सवालास जितके वजन आहे, तितकेच, किंबहुना त्याहूनही ज्यास्त वजन नव्या यक्षप्रश्‍नाला आहे. मुलायमसिंहने नमोजी कू कान में क्‍या बोला? बोला, तो बोला, कान में काय को बोला? कान में बोला तो बोला, चारचौघे में काय को बोला? चारचौघे में बोला तो बोला, इतना काय को बोला?...

नमोजींच्या कानात कुजबुजले? कु-ज-बु-ज-ले? हे काय झाले? हे म्हंजे साक्षात अरविंदस्वामी केजरीवालांनी विद्वान वकीलसाहेब अरुण जेटलीजींच्या कानात ‘तब्बेत बरी आहे ना?’ असे विचारण्यापैकी झाले. किंवा आमच्या देवेंद्रजींच्या कानात उधोजींनी कोळंबीच्या तिखल्याची रेसिपी सांगण्यापैकी झाले. किंवा...जाऊ दे.

वाचकहो, ह्या प्रश्‍नमालिकेचा आम्ही येथे धी एंड करीत आहो!!

उत्तम प्रदेशाचे उत्तम मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी ह्यांच्या शपथविधी ग्रहण समारोहाच्या प्रसंगी थोर समाजवादी नेते श्रीमान मुलायमसिंह यादव हे (संधी साधून) प्रधानसेवक नमोजीहुकूम ह्यांच्या कानाशी लागले. मोजून सत्तेचाळीस सेकंद त्यांनी क़ाही खुसुरपुसुर केली. ही खुसुरपुसुर अनेक टीव्ही च्यानलांच्या क्‍यामेऱ्यांनी विचूक टिपली; परंतु क्‍यामेऱ्याने दृश्‍य टिपले असले तरी कुजबुजीचे ध्वनिक्षेपण करणे काही त्यांस शक्‍य झाले नाही. तंत्रज्ञान येथे अपुरे पडले!! परंतु, काळजीचे कारण नाही!! वाचकहो, आम्ही त्याक्षणी तेथे हजर होतो. माशाल्ला, आम्ही हा कुजबुज संवाद अचूक आमच्या (लांब) कानांनी टिपला आहे. 

कटप्पाने करून ठेवलेला नस्ता उद्योग व त्याचे गुपित येत्या महिनाअखेर उलगडणार असले, तरी मुलायमजींनी केलेली कानाफुसी मात्र भारतीय राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी ठरेल, ह्यात आमच्या मनीं तरी तीळमात्र शंका नाही. त्याचे झाले असे...

योगीजींचे शपथग्रहण झाल्यावर मुलायमसिंहजी उठून लगबगीने नमोजी ह्यांच्यानजीक गेले. नमोजींनी चलाखीने हस्तांदोलनाचे धोरण अंगिकारले; पण मुलायमसिंहजींनी दुप्पट चलाखीने त्यांचा हात ओढलान आणि घट्ट धरून ठेवलान. चित्रफीत बघितलीत, तर आपल्या हे लक्षात येईल, की नमोजी त्यांचा हात हातात धरून गदागदा हलवित आहेत; पण ॲक्‍चुअली, मुलायमजीच जोराजोराने हस्तांदोलन करत होते, हे सत्य आहे.

‘‘हवे बास ना...सेकहेंड थई गयु!’’ कसेबसे हसत नमोजी.

‘‘ऐसे थोडी छोडूंगा!!’’ हसत हसत मुलायमजी, ‘‘आपको कहीं का नहीं छोडूंगा! बच्चों का करिअर बरबाद किया आपने!! इतनी उमर होने के बाद भी बच्चोंसे लडते हो!! लानत है!! बच्चे नादान होते है...’’

‘‘अरे मी नाय त्येंच्यामागे लागला, तेच माझ्या मागे लागला!! सायकल उप्परथी येऊनशी मने पत्थर मारता हता!! हुं शुं करुं?’’ हसत हसत नमोजी म्हणाले,‘‘पण तमे चिंता ना करो! हुं एने समझाविश!! पण तमे एने कहो के राहुलनी साथे ना रहे!! सांभळ्यो?’’

‘‘वो मेरा कहां सुनता है, भाईसाहब! मुझको तो उसने समझो रिटायरही कर दिया!’’ खुदुखुदू हसत मुलायमजी!! 

...आणि वाचकहो, इथे ते घडले. मुलायमजींनी नमोजींचा हात ओढून त्यांच्या डाव्या कानावर नेम धरून आपले ओठ नेले आणि मनाचा हिय्या करुन ते मोठ्यांदा पुटपुटले...

‘‘बेटी बचाव जैसा ‘बाप बचाव अभियान’ कब छेड रहे हो?’’

धी एण्ड!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com