उत्तर हवंय! (ढिंग टांग! )

Dhing Tang Editorial
Dhing Tang Editorial

(एक ऐतिहासिक नाट्यप्रवेश...) 
स्थळ : अर्थात मातोश्री महालाचा सेट, वांद्रे संस्थान. 
वेळ : साधारणत: "खुलता कळी खुलेना' संपल्यावर. 
काळ : भोजनोत्तर. 
प्रसंग : बांका...आणि नाट्यपूर्ण 
पात्रे : सांगायला पाह्यजे? आपले नेहमीचेच यशस्वी कलाकार!! 

(अंक तिसरा, प्रवेश शेवटून तिसरा : राजाधिराज उधोजीराजांचा खलबतखाना. उधोजीराजे अस्वस्थपणे येरझारा घालत आहेती. मधोनच ते जगदंब जगदंब ऐसे पुटपुटतात. मधोनच कपाळावर मूठ हापटतात. मधोनच "खामोश' ऐसे वदतात...भिंतीवरील पलिते उजळत आहेती. अब आगे.) 
उधोजीराजे : (येरझारा घालताना काचकन ब्रेक दाबत) ठरलं! ठरलं!! ठरलं!! 
अनिलाजीपंत देसाई अमात्य : (घशाला कोरड पडलेल्या अवस्थेत) काय...काय ठरलं? 
उधोजीराजे : (निर्णायक सुरात) माझ्या प्रिय मावळ्यांनो, कान देऊन ऐका!! आम्ही अत्यंत महत्त्वाची घोषणा करणार आहोत!! आपल्याला माहीतच आहे की दिवस अत्यंत खडतर आहेत. पण याहूनही अधिक खडतर दिवसांसाठी तयार राहा!! 
सरखेल संजयाजी राऊत : (कमालीच्या निरागसपणाने) नोटाबंदी झाली, तेव्हा आपण हेच बोलला होतात ना, राजे!! करेक्‍ट आठवलं मला!! 
उधोजीराजे : (दुर्लक्ष करत) गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी दौलतीची प्रचंड हेळसांड झाली! मराठी अस्मितेचा चोळामोळा झाला!! परचक्र आल्यावर ही महाराष्ट्रभूमी सुरवातीला काही काळ गोंधळते, हतबल होते, पण नंतर ह्याच भूमीतून क्रांतीचा एल्गार उमटतो, ह्याला इतिहास साक्षी आहे!! पण अशा काळात अनेकांना त्याग करावा लागतो!! त्याची तयारी तुम्ही साऱ्यांनी ठेवली पाहिजे. आज तीच परिस्थिती उद्‌भवल्यानं मी एक मोठा निर्णय घेतला आहे!! 
अनिलाजीपंत अमात्य : (घशाची कोरड आणखी वाढून) कसला राजे? 
उधोजीराजे : (खांदे ताठ करत) फिरवाफिरवीचा!! घोडा का अडला? पान का सडलं? भाकरी का करपली? बाईल का पळाली? ह्या साऱ्या प्राचीन प्रश्‍नांचं उत्तर एकच- न फिरवल्यामुळे!! काही कळलं? 
सुभाषाजी देसाई चिटणवीस : (ओठांवरील रुमाल क्षणभर काढत) जे काही कराल, ते पोक्‍तपणाने करा, म्हंजे झालं! अवघा महाराष्ट्र आपल्या निर्णयाकडे दृष्टी लावून बसला आहे!! (चतुराईने) भाकरी फिरवण्याचा निर्णय घेताना थोडं पाणी लावा म्हंजे झालं!! 
उधोजीराजे : (संतापून) कोण म्हणतं आम्ही भाकरी फिरवणार? आम्ही घोडा फिरवू!! 
सरखेल संजयाजी राऊत : (खाडकन एका गुडघ्यावर वीरासनात बसत) घोडा तर घोडा!! काहीही फिरवा! पण आता फिरवा म्हंजे झालं!! साहेब, आपला बोल, म्हंजे देवावरचे फूल! आपला बोल म्हंजे दीडशे फॉंटसाइजची हेडलाइन!! सोळा पॉइंटातला इंट्रो आणि पान आठवर हवाला जाईल, इतुके जालीम वृत्त!! घोडा फिरवायचा असेल, तर आपल्या सेवेसी हा सेवक तत्पर आहे, साहेब!! 
सरनोबत रामदासभाई कदम : (तडाखेबाज तलवार उपसत) आपण नुसती आज्ञा करावी, महाराज! घोडा अस्सा दौडून आणतो की यंव रे यंव!! 
उधोजीराजे : (वैतागून) खामोश! आम्ही घोडासुद्धा नाही फिरवणार!! आम्ही पानं फिरवू, पानं!! नाहीतरी सडलीच आहेत शिंची!! 
दर्यासारंग दिवाकरजी रावते : (चलाखीने) आमच्या मानपानाचं तेवढं बघा, राजे!! 
उधोजीराजे : (संतापाचा कडेलोट होत) दिवस खडतर आहेत, आणि तुम्हाला तुमच्या मानपानाची चिंता पडली आहे? हद्द झाली!! आम्ही पानं फिरवू, घोडा फिरवू, भाकरी फिरवू नाहीतर... 
सरखेल संजयाजी : (चतुराईनं) नाहीतर? नाही तर काय, राजे? बोला, बोला, हा संजयाजी, तुमचा हरेक शब्द झेलायला इथं रेडी आहे!! 
उधोजीराजे : (तळहातावर मूठ हापटत) ह्या कमळाबाईचं काय करायचं? तिला कशी फिरवावी, ह्याची कळ सापडून नाही राहिली!! तिथंच सारं अडलं आहे!! हिच्यामुळेच आमचा घोडा अडला, भाकरी करपली, आणि चांगली हुकमाची पानं सडली!! हिला फिरवावी की हिची जिरवावी? 
जगदंब जगदंब!! 
(...इथं अष्टप्रधान मंडळ सुटकेचा निःश्‍वास टाकत आपापल्या कामाला रवाना झाले. असो.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com