जीएसटी - एक लागवड! (ढिंग टांग)

जीएसटी - एक लागवड! (ढिंग टांग)

रामकृष्णहरि...माझ्या भावांनो, मानवाचे आयुष्य क्षणभंगुर असते. सुख आणि दु:खसापेक्ष असते. वेदनादेखील अल्पायुषी असतात. माणूस जसा येतो, तसाच वापस जातो. येताना ‘तसाच’ येतो, जाताना फारतर वारभर (सफेद) कापड घेऊन जातो. आठवा, या जगात येताना तुम्ही पहिला ट्याहां केलेत, तेव्हा तुमच्या अंगावर कोणत्या ब्रॅंडचा सदरा होता? नव्हताच!! असली काही भानगड नव्हतीच. तो तुमने क्‍या पाया, जो तुमने खोया? तुम क्‍या लाये थे, की वो तुमने खो दिया? वह क्‍या है, जो तुम्हारा है? कुछ नही, मित्रोंऽऽऽ...कुछ नहीं! एक म्याटर्निटी होमचे बिल सोडले तर तुमच्या डिलिव्हरीसोबत कुठलाही ट्याक्‍स नव्हता, नाही व नसेल! तुम्ही जस्से आलात, तस्से जाणार!! 

एका नदीत दुसऱ्यांदा पाऊल बुडविता येत नाही, असे म्हंटात. किती खरे आहे? दुसऱ्यांदा पाऊल बुडवेपर्यंत जुना प्रवाह पुढे गेलेला असतो. नदी नवीकोरी झालेली असते. हां, आता दुष्काळात ती कोरडी पडते, तेव्हा गोष्ट वेगळी. तेव्हा नदीत पाय बुडवून नव्हे, तुडवून जावे लागते. असो. 

काल जो गाढव होता, तो आज वटवाघुळ आणि उद्या मुंगूस होईल. चौऱ्यांशीच्या फेऱ्यात मनुष्यजन्माचा चान्स एकच! उदाहरणार्थ, समजा, गेल्या जन्मी तुम्ही झुरळ होता. (समजा म्हटले आहे हं!) तर पुढील जन्मी सुसर होऊ शकता. चालू जन्मात तुम्ही मनुष्य आहां, याचा खात्रीलायक पुरावा तरी काय? आप्तांमध्ये तर आपली ओळख महागाढव अशी असते. आप्तांचे सोडा, खुद्द स्वपत्नीच्या मतानुसार आपण शुद्ध बैल या योनीत असू शकतो. थोडक्‍यात आपण महागाढव की शुद्ध बैल की मनुष्य? सांगता येत नाही...सांगता येत नाही. 

त्यानुसार माझ्या येड्या भावंडांनो, परवा जो विक्रीकर होता. तो काल व्हॅट होता. आज तो गुड अँड सिंपल ट्याक्‍स आहे!!- उद्या तो आणखी काही असेल. पण त्यामुळे आपल्या जीवनप्रवाहात काय बदल झाला? काही नाही...काही नाही.

माझ्या सौंगड्यांनो, आकाशातून पडणारे पाऊसपाणी शेवटी सागरालाच मिळते. कुठल्याही देवास नमस्कार केला असता, तो केशवाच्या पायीच पोचतो. त्यानुसार सर्व ट्याक्‍सांचा मिळून एकच जीएसटी होतो. एक जुलैच्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून आम्ही दिवसभर महागाई कुठे कुठे वाढली आहे, याचा सर्व्हे घेत फिरत होतो. मिसळ आधीच पंचावन्न रुपये प्लेट झाली होती, म्हणून आम्ही (स्वखर्चाने) मिसळ खाणे सोडले होते. वडापावदेखील पंधरा रुपये झाल्याने वडेवाल्याच्या दुकानी आम्ही तासंतास ‘गिऱ्हाईक’ शोधत थांबत होतो. काल हेच होत होते. आज तेच आहे...उद्याही असेच राहणार आहे.  जीएसटीच्या कृपाप्रसादाच्या निमित्ताने थेट परमेश्‍वराच्या दूताचे आशीर्वचन मिळवण्यासाठी आम्ही पू. सुधीरबाबाजी यांच्या ‘सुधीर दर्बारा’त गेलो. त्यांच्या पाया पडलो. 

‘‘गुरुजी, जीएसटी आ गई है. जिंदगी परेशान हो गई है. मिसलपाव पासष्ट रुपये हो गया हय, आऊर वडापाव के गाडी पे गिऱ्हाइक नही फिरक रहा!! अब क्रिपा आनी बंद होगी क्‍या?’’ आम्ही चिंताग्रस्त आवाजात विचारले.

‘‘क्रिपा आएगी...जरुर आएगी,’’ पू. सुधीर बाबाजींनी खुर्चीवर बसल्या बसल्या (डोळे मिटून) आम्हाला आश्‍वस्त केले. ते म्हणाले, ‘‘कधी झाडाले पाणी घातलं का बापा?’’ आम्ही लागलीच ओशाळलो. आमची ‘सोच’च तशी. जहां सोच वहां शोच!! छे!! आम्ही नकारार्थी मुंडी हलवली.

‘‘तो बस ऐसा करना...ये दस-बीस पौधे उठा लो!! जहां जगह मिले, लगा डालो!! क्रिपा आएगी!!,’’ आमच्या हातात डझनभर रोपटी ठेवत ते म्हणाले.

...आम्ही सारे काही विसरून रोपे लावत सुटलो आहे. खड्ड्यात गेला जीएसटी!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com