गुलाबी नोटेचे कपट! (ढिंग टांग)

Dhing Tang
Dhing Tang

तसे पाहू गेल्यास आमच्यासारखा संन्यस्तवृत्तीचा मनुष्य समाजात सांपडणे, कठीणच. अपरिग्रहाचे जिवंत उदाहरण म्हणून आमच्याकडे पाहिले जावे. कां की ‘सोने आणि माती आम्हां समान हे चित्ती’ ही संतवृत्ती अंगिकारूनच आम्ही कालक्रमणा करीत असतो. त्यामुळे आमचे तारणहार अखिल ब्रह्मांडनायक श्रीमान नमोजीहुकूम (नमो नम:) ह्यांनी हजार-पाश्‍शेच्या नोटा सपशेल गारद केल्यानंतर आम्ही क्षणभरदेखील विचलित झालो नाही. मोदीजी जे काही करितात, ते आमच्या भल्यासाठीच करितात!! अहो, जो कागद वर्षानुवर्षे पाहिला नाही, त्याचे आम्हांस काय होय? ह्या निर्मळ वृत्तीमुळेच आम्ही सदैव मोकळ्या मनाने (आणि खिश्‍याने) अत्र तत्र सर्वत्र हिंडत असतो. ह्या नि:संग वृत्तीमुळेच जनलोक आम्हांस प्रेमाने ‘फुकटेश्‍वर’ असे म्हणतात. असो.

सांप्रत दिवसांत जनलोक हजार-पाश्‍शेच्या नोटा बदलण्यासाठी धावाधाव करताना पाहून आम्ही दाढीतल्या दाढीत आणि मिशीतल्या मिशीत हसत असतो. काय हे! काय हे!! कायहे!!! कागदाच्या त्या कपट्यांसाठी ही इतकी धावाधाव? हे कपटे कमावण्यासाठी धावाधाव करावी लागली नाही, त्याच्या हजारपट अधिक पळापळ त्या बदलून घेण्यासाठी करावी लागत्ये आहे...अरेरे! ती पहा, ती पहा, मृगजळाच्या पाठी धावणाऱ्या प्राणिमात्रांप्रमाणे जनलोक ब्यांकरूपी पाणवठ्याकडे धावू लागली आहेत. ब्यांकेत महामूर पाणी आहे, असा गैरसमज उराशी धरोन त्यांचे असे हे असे हेलपाटणे आम्हाला तरी हास्यास्पद वाटते.

...आमच्या पाकिटात एकही नोट नसताना आम्ही सहज म्हणून ब्यांकेच्या दाराशी गेलो. तेथील म्यानेजरने माश्‍या वाराव्यात तसे ‘शुकशुक’ करून आम्हांस हांकून देण्याचा यत्न केला. पण आम्हीही माशीप्रमाणेच चिवट! ज्याम बधलो नाही...

‘‘छुट्‌टा नै, आगे जाव!,’’ ब्यां. म्यानेजर करवादला. ब्यांकेसमोर गर्दी करून ऱ्हायलेली मंडळी ही ब्यांक लुटावयास आलेली चाळीस चोरांची टोळी आहे, असे अविर्भाव त्याच्या मुखावर होत्ये. ‘छुट्‌टा नै, आगे जाव’ हे वाक्‍य वास्तविक सिग्नलवर ऐकू यावे, पण ते ब्यांकेत उमटत होते! कालाय तस्मै नमो नम:...दुसरे काय?

‘‘हमकू छुट्‌टा नै...बंदा मंगता हय!,’’ दोन बोटे दाखवून आम्ही टेचात म्हणालो. दोन हजाराची नोट कशी दिसते, ह्याचे कुतूहल कोणाला नाही?
‘‘ मिळणार नाही...ब्यांकेत पैसेच नाहीत!,’’ ब्यांक म्यानेजराने केलेली घोषणा नमोजी हुकूम ह्यांच्या घोषणेपेक्षाही अधिक जहरी होती. आमच्या खात्यात तरी कुठे आहेत? असे आम्ही मनाशी म्हटले.

‘‘ ब्यांकेत पैसे नाहीत? मग काय आहे, आँ?.. वडे?,’’ सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत येऊन उभे राहिलेले एक खातेधारक ओरडले.
‘‘ पैसे नाहीत म्हंजे नाहीत! कळलं?,’’ ब्यां. म्या.

‘‘अरे वारे वा! आम्हाला दोन हजाराची नवी गुलाबी नोट हवीये, म्हणून पहाटेपास्नं उभाय रांगेत! पैशे नाहीत, तर वायदे करता कशाला?,’’ रांगेतला एक चढेल आवाज. एव्हापर्यंत उन्हदेखील नाही म्हटले तरी चढले होते.
‘‘ गुलाबी नोट कशाला हवी आता तुम्हाला या वयात, काका? चिल्लर घ्या, हवं तर!,’’ ब्यां. म्यानेजर फावल्यावेळात टगेगिरी करीत असावा!
‘‘च्यामारी, आपलेच पैशे काढायला क्‍येवढी मरमर!ह्या:,’’ आणखी एका खातेधारकाने तोंड उघडले.
‘‘डबा आणलाय का हो?,’’ रांगेतून खोल आवाजात एक विचारणा.
‘‘आहे, पण गवार भाजी-चपाती आहे...,’’ त्याहूनही अधिक खोल आवाजात रांगेतूनच उत्तर.
‘‘ ह्या मोदींनी वडापावची सोय तरी करून द्यायला हवी होती. रांगेत किती वेळ उपाशी उभं राहायचं?,’’ एक रास्त कुरकूर झाली. फुकट वडापाव ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. असो.
...अखेर ‘उद्या या’ असे ब्यांकेतून सांगण्यात आले. गुलाबी नोटेचे स्वप्न पाहात गर्दी परतली. आम्ही मात्र रिकाम्या खिश्‍याने गेलो, आणि भरल्या मनाने आलो! कां की, ही गुलाबी नोटदेखील आणखी काही वर्षांनी अशीच रद्‌द होणाराय, हे भविष्य आम्ही जाणून आहो!! म्हणून म्हटले, आमच्यासारखा संन्यस्तवृत्तीचा मनुष्य समाजात सांपडणे, कठीणच. असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com