आजचा पवित्र दिवस! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 1 एप्रिल 2017

प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब, 

प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब, 
शतप्रतिशत प्रणाम. माझे मनपरिवर्तन झाले आहे. मी पूर्ण बदललो आहे. गेल्या काही महिन्यांत आपल्यात झालेल्या बेबनावाला काही अंशी मीच कारणीभूत आहे, असे माझे मत झाले आहे. गेल्या वर्षी मी तुमच्याकडे जेवायला आलो होतो. त्यानंतर आपले संबंध काहीसे बिनसले, असे वाटते. काय झाले असेल? असा विचार मनात डोकावतो. आमच्या घरी नागपूरला एक जण असेच जेवायला आले. त्यांनी मोजून ब्यायंशी पुऱ्या आणि रत्तलभर श्रीखंड खाल्ले. आम्ही लोक पाणी पिऊन झोपलो. पण नंतर त्यांना कधीही जेवायला बोलावले नाही. ही आठवणही मन कुर्तडते आहे. तसेच काही आमच्याबद्दल झाले नसेल ना? जे काही असेल ते असो....मघाशीच तुमच्या पक्षाचे काही शिलेदार येऊन भेटून गेले. तुम्ही आम्हाला उगीचच डावलता अशी कुरकूर करत होते. ‘पुनश्‍च असे केलिया मुलाहिजा ठेवणार नाही’ असे त्यांनी डोळे पुसत सांगितले. माझे मन द्रवले. इतके द्रवले, इतके द्रवले की शेवटी (तुमच्या) उद्योगमंत्री सुभाषजी देसायांनी त्यांच्या जवळचा रुमाल मला दिला. काम झाल्यावर परत करायला गेलो, तर त्यांनी नाक वाकडे करून ‘ठेवा तुमच्यापाशीच’ असे सांगितले. केवढे मोठे मन!! केवढा मोठा रुमाल!! यापुढे आपल्या मित्र पक्षाला बरोबरीच्या नात्याने वागवायचे, असे मी ठरवले आहे. चपातीचा एक लाडू असेल, तर अर्धा अर्धा खाऊ! दोन असतील तर एक एक खाऊ!! तीन असतील, तर एक कुणाला तरी देऊ!! निधीच्या वाटपात भेदभाव करणार नाही, असे आश्‍वासनही मी तुमच्या शिलेदारांना देऊन टाकले आहे. आपली दुश्‍मनी लोकांनी बघितली, आता मैत्री दाखवू या. ओके? कळावे. 

आपला नाना.
ता. क. :
अमित शहासाहेबांनी फोन करून मला सांगितले की, ‘उधोजीसाहेबांना सांगा की आम्हाला काहीही करून उद्या- एक एप्रिल रोजी मातोश्रीवर जेवायचे आहे!! कळावे.
* * *
प्रिय नानासाहेब, जय महाराष्ट्र. 
माझेही मन भयंकर द्रवल्याने मी राजापुरी पंचाच जवळ घेऊन बसलो आहे. सारखी तुमची आठवण येते. तुम्ही आमच्या घरी जेवायला आला होतात, ते मला चांगलेच आठवते. कित्ती मजा आली होती? अशा जेवणावळी वारंवार घडाव्यात असा विचार मनी येतो. तसे घडलेदेखील असते, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आपल्या महाराष्ट्रात नियती म्हणजे कोण ओळखा बरे! करेक्‍ट...बारामतीला राहाते तीच!! पण आपल्यातील बेबनावाचे ते काही कारण म्हणता येणार नाही. आम्हीसुद्धा यापुढे तुम्हाला दिलोजानसे साथ देऊ. धाकटा भाऊ, मोठा भाऊ असले मुद्दे काढणार नाही. गुण्यागोविंदाने नांदत महाराष्ट्राचे भले करू. तुमचे लाडके पारदर्शकतेचे तत्त्व पुरेपूर अंगी बाणवू. मुख्य म्हणजे मराठी माणसाच्या हिताच्या प्रश्‍नी यापुढे बिलकूल राजकारण करणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ!! नानासाहेब, तुम्ही कधीही जेवायला या. अमित शहा आले तर आनंदच. साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा!! आमच्या घराचे दार तुम्हाला आणि अमित शहासाहेबांना चोवीस तास उघडे आहे. 

आपला. उधोजी.
ता. क. : ‘कमळाबाई : एक सौहार्द’ असा एक छानसा लेख लिहायला आम्ही संजयाजी राऊत ह्यांना आधीच सांगून ठेवले आहे. उद्या- एक एप्रिलला लिहायला घेतो, असे म्हणाले. उ. ठा.

Web Title: Dhing tang on Holy Day