7, एलकेएम! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 23 सप्टेंबर 2016

वाचकहो, खोटे कशाला सांगा? आम्ही राहतो, त्या लॉर्ड फॉकलंड आळीचे नाव बदलावे, यासाठी आम्ही अनेक वर्षे जंग जंग पछाडले. पण व्यर्थ!! नावे ठेवण्यात माहीर असलेल्या जालीम दुनियेने एक नही सुनी!! आम्ही मुंबईतील फॉकलंड रोडवर राहतो, असा कुणाचा गैरसमज झाला असेल, तर तो कृपया काढून टाकावा. आमची आळी वेगळी आहे! वास्तविक आम्ही राहतो, त्या आळीस थोर समाजसेवक लिंबाजी कोथमिरे (मुरुडकर) यांचे रीतसर नाव देण्यात आले होते; पण हल्ली आळी आमच्याच टोपणनावाने वळखली जाते!! होय, अख्ख्या आळीत आम्ही लॉर्ड फॉकलंड या नावाने जगप्रसिद्ध आहोत!! 

वाचकहो, खोटे कशाला सांगा? आम्ही राहतो, त्या लॉर्ड फॉकलंड आळीचे नाव बदलावे, यासाठी आम्ही अनेक वर्षे जंग जंग पछाडले. पण व्यर्थ!! नावे ठेवण्यात माहीर असलेल्या जालीम दुनियेने एक नही सुनी!! आम्ही मुंबईतील फॉकलंड रोडवर राहतो, असा कुणाचा गैरसमज झाला असेल, तर तो कृपया काढून टाकावा. आमची आळी वेगळी आहे! वास्तविक आम्ही राहतो, त्या आळीस थोर समाजसेवक लिंबाजी कोथमिरे (मुरुडकर) यांचे रीतसर नाव देण्यात आले होते; पण हल्ली आळी आमच्याच टोपणनावाने वळखली जाते!! होय, अख्ख्या आळीत आम्ही लॉर्ड फॉकलंड या नावाने जगप्रसिद्ध आहोत!! 

आमच्या आळीच्या मुखाशीच लिंबाजी कोथमिरे (मुरुडकर) यांचा भाजीचा गाळा होता व आमच्याच चाळीत तळमजल्यावर त्यांचे बिऱ्हाड असे. त्यांची थोरली कन्या जी की चंपावती ईचेवर काही काळ आमचे मन आरक्‍त झाल्याने लिंबाजी कोथमिरे नावाच्या खविसाने एक दिवस आमचा जाहीर गाळा केला!! ''काय रं लॉर्ड फाकलंड समजतुस काय रं पडवळ्या!! पुन्ना माज्या पोरीकडं वाकड्या नजरेने बघशीन तर...‘‘ असे म्हणून त्यांनी आम्हाला पडवळ, शिराळी, शेवगा, काकड्या असा नंबरी माल एकेक उचलून (नुसता) दाखवला!! तेव्हापासून घराबाहेर पडणे आम्ही टाळू लागलो. उगीच विषाची परीक्षा का घ्या? तदनंतर आळीतील काही चहाटळखोरांनी 'लिंबाजी कोथमिरे (मुरुडकर) आळी‘ या फलकावर कागुद चिकटवून 'लॉर्ड फॉकलंड आळी‘ असे नामकरण करून टाकिले. असो. 

आळीच्या मूल्यांशी नवे नाव बिलकुल निगडित नसून, तीस ओल्ड चार्म परत मिळवून देणे, हे आपले कर्तव्य आहे, असे आमचे मन आम्हाला सांगत होते. त्यानुसार 'लॉर्ड फॉकलंड आळी‘ हे नाव बदलण्यासाठी आम्ही सरकार-दरबारी दाताच्या कण्या केल्या. असंख्य खेटे घातले. माहिती अधिकारात अर्ज करून दबाव आणता येतो का? तेही पाहिले. पोलिस ठाण्यात खेपा मारल्या. स्थानिक नगरसेवक नानाभाऊ गाळप यांना साकडे घालावयास गेलो, तर आम्हाला बघून ते म्हणाले, ''या, लॉर्ड फॉकलंड, हिकडं कुटं?‘‘ आता काय बोलणार? निरुपाय म्हणून उपोषण करण्याचा मनोदय आम्ही जाहीर केला; पण त्यालाही आळीतील जनलोक फिदीफिदी हसले. जाऊ दे. 

यातून मार्ग कसा काढावा, या समस्येने आम्हाला ग्रासले. मार्ग सापडत नसेल तर मार्गदर्शकाला विचारावे! त्यानुसार मार्ग शोधण्यासाठी आम्ही वेळोवेळी थेट नमोजीहुकूम यांच्या चरणकमळापाशी धाव घेतो, हे सर्वविदित आहेच. अखेर निर्वाणीचा उपाय म्हणून 'काहीही करा; पण आमच्या आळीचे नाव बदला‘ अशी गळ त्यांस घालण्यासाठी आम्ही परिपाठानुसार '7, आरसीआर‘ या निवासस्थानी पोचलो... 

''शतप्रतिशत प्रणाम!,‘‘ लोटांगण घालत आम्ही. 

''शुं काम?‘‘ नमोजी. 

''आमच्या आळीचे नाव बदला बुवा!!,‘‘ आम्ही म्हणालो. 

''अलीच्या नाव बदलायच्या माने?‘‘ नमोजी. आम्ही सारी पूर्वपीठिका त्यांच्या कानावर घातली. 

''स्मॉल कॉज कोर्टातली केस थेट सुप्रीम कोर्टात कशी आणता?‘‘ त्यांनी संतापून आम्हाला विचारले. आम्ही काही बोललो नाही. लॉर्ड फॉकलंड आळीचे पुन्हा 
लिंबाजी कोथमिरे मुरुडकर आळी होणे, हे आमचे लक्ष्य होते. त्यासाठी आम्ही काहीही करावयास तयार होतो. पाहिजे तर मुंडके उडवा; पण आळीचे नाव बदला, हा आमचा पवित्रा होता. 

''मारा पण हाज प्रोब्लेम हता...,‘‘ गालातल्या गालात हसत नमोजी म्हणाले, ''आमच्या आळीच्या नाव बदलायच्या मी गेली बे वरस ट्राय करत होता. आता बदलला! हवे मारा ऍड्रेस '7, आरसीआर नथी...'7, एलकेएम‘ केहवानुं होय! कछु सांभळ्यो?‘‘ 

आम्ही काहीच सांभळ्यो नव्हतो; पण जाऊ दे. 

''तमेपण तमारा ऍड्रेस '7, एलकेएम‘ करी नाखो!,‘‘ असा आदेश नमोजींनी दिला. गुर्वाज्ञा शिरसावंद्य! 

...परत येऊन आम्ही आळीचे नाव बदलून टाकले आहे. फलकावरला 'लॉर्ड फॉकलंड आळी‘चा कागुद आम्ही टर्कावला आहे. आता 'लिंबाजी कोथमिरे (मुरुडकर)‘ यांचे इनिशियल 'एलकेएम‘ होतात, हा निव्वळ योगायोग!!. इति. 

Web Title: Dhing Tang satire in Sakal Newspaper