दिल-दिमाग
दिल-दिमाग

दिल-दिमाग

"ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति' असे श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितले आहे. ईश्वराच्या निवासाचे स्थान हृदय म्हटले आहे. तसे मनुष्याच्या दृष्टीने अवयवांचा राजा कोणत्या अवयवास म्हणावे, तर हृदयासच म्हणावे लागेल. रक्ताभिसरण करणारे हृदय हे शरीरात सर्वत्र चैतन्य पसरविणारे उपकरण आहे. प्रेमाचे अधिष्ठानसुद्धा हृदय समजले जाते. तर्काचे अधिष्ठान बुद्धी आहे. विचार करण्याचे; निर्णय करण्याचे केंद्र बुद्धी आहे. ईश्‍वराने निवासाचे स्थान म्हणून बुद्धी निवडली नसून, हृदय निवडले आहे.

जुन्या काळी एक गोष्ट वाचली होती. एकदा एका न्यायाधीशासमोर एक विचित्र खटला आला. एका शिशू अवस्थेतल्या मुलासाठी दोन आयांनी कोर्टात दावा केला. ""हा माझा मुलगा आहे, त्यामुळे तो माझ्याजवळ द्यावा,'' अशी दोघींची मागणी होती. जुन्या काळातील घटना आहे. डीएनए टेस्ट वगैरे सारखे प्रकार त्या काळी नव्हते. न्यायाधीशांनासुद्धा काय निर्णय करावा, हे सुचेना. शेवटी काहीतरी ठरवल्यासारखे ते उठले व म्हणाले, ""मुलाचे दोन तुकडे करून ते प्रत्येकीला एक एक द्यावे, असा कोर्टाचा निर्णय आहे.'' निर्णय ऐकल्याबरोबर खरी आई म्हणाली नको! त्यापेक्षा तिला देऊन टाका. मला चालेल,'' आणि न्यायाधीशांना या वाक्‍यानंतर खरी आई कोण, हे ओळखणे सोपे झाले.

ईश्वर भक्तिभावाचा भुकेला आहे व भक्तीचा उद्‌भव हृदयात होतो. "दिमाग' म्हणजे द्विमार्ग! बुद्धी द्विमार्गी असते. दुधारी शस्त्रासारखी असते. तिला हृदयाची जोड मिळाली, तर ती सद्‌बुद्धी होते अन्यथा कुबुद्धी/ दुर्बुद्धी होऊ शकते. अणुविद्युत की अणुविस्फोट या दोन्ही शक्‍यता बुद्धीमध्ये आहेत. किडनी प्रत्यारोपण की किडनी काळ्या बाजारात विकणे, हे बुद्धीच्या शरणागत असते. त्यामुळे बुद्धितर्कापेक्षा भावात्मकतेला अधिक महत्त्व दिले गेले आहे.

एकदा एका मनुष्याने नवस केला, की माझे अमुक काम झाले, तर गावापासून 50 कि.मी. दूर असलेल्या शिवलिंगाचे मी प्रत्येक महिन्यात एकदा दर्शन करीन. झाले! योगायोगाने म्हणा की ईशकृपेने म्हणा, पण ते काम झाले. आता नवस फेडण्याची जबाबदारी आली. कसे करावे. 50 कि.मी... प्रत्येक महिन्यात... बापरे... म्हणजे वर्षात 12 प्रवास आले. वेळ... पैसा खर्च होणार... काम होईपर्यंत देव... देव करणारा मनुष्य काम झाले की टाळटाळ करतो. हा हुशार मनुष्य होता. त्याने एक युक्ती केली. 31 जानेवारीला दुपारी निघावे... सायंकाळी मंदिरात पोचून दर्शन घ्यावे... रात्री तेथे थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी फेब्रुवारीचे दर्शन आटोपून परत यावे. म्हणजे त्यानंतर मग थेट 31 मार्चला जावे... "मार्च'चे दर्शन घ्यावे... आणि एक एप्रिलला एप्रिल महिन्याचे दर्शन घेऊन परत यावे... अशी चतुराई करून त्याने सहा प्रवासांत 12 महिन्यांचे 12 वेळा दर्शन आटोपले. देवाने दिलेल्या बुद्धीचा उपयोग करून देवालाही बनविणारे महाभाग भूतलावर आहेत.

बुद्धी तर्क करते व तर्काला मर्यादा आहेत. हृदयाचे आकाश अमर्याद असते. तेथे प्रेमाचा सागर उसळत असतो. प्रकाश आमटेंनी हिंस्त्र समजले जाणारे पशूही प्रेमाने जिंकले... अशी प्रेमाची शक्ती आहे. या शक्तीचे उद्‌गमस्थान हृदय असल्याने व देव भावाचा भुकेला असल्याने भाव तेथे देव... तो हृदयात राहतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com