पत्रकारितेच्या विश्‍वातील तळपता तारा

पत्रकारितेच्या विश्‍वातील तळपता तारा

दिलीप पाडगावकरच्या आकस्मिक निधनाने भारतीय पत्रकारितेच्या विश्‍वातील तळपणारा एक तारा निखळून पडला आहे. विद्वान, बहुश्रुत पत्रकार-संपादकांच्या परंपरेतील एका दुवा आपल्यातून गेला. दिलीपला स्वतःची अशी वैचारिक बैठक होती. निश्‍चित असा "वर्ल्ड व्ह्यू' होता. फ्रेंच भाषेवरील प्रभुत्व हे त्याचे खास वैशिष्ट्य. त्याचे लिखाण नेहेमीच विचारपरिप्लुत आणि संदर्भश्रीमंत असे. आमचा परिचय गेल्या पंचवीस-तीस वर्षांचा. दिलीप "द टाइम्स ऑफ इंडिया'चा पॅरिसमधील प्रतिनिधी असल्यापासून त्याची वार्तापत्रे मी वाचत असे. त्यातून फ्रान्समधील राजकीय घडामोडींच्या आतल्या गोटातील बातम्यांव्यतिरिक्त फ्रान्सची सळसळणारी संस्कृती, तेथील रुपेरी दुनिया, सामाजिक स्पंदने आणि युरोपाचे अंतरंग यांची झलक मिळत असे. 1988 मध्ये तो "द टाइम्स ऑफ इंडिया'च्या संपादकपदी आल्यावर काही महिन्यांतच त्याने येथील राजकारणात जम बसविला. आमचा परिचय घनिष्ठ झाला तो दक्षिण आशिया मुक्त पत्रकार संघटनेच्या निमित्ताने. या संघटनेत त्याच्याबरोबर काम करावयास मिळालं. ""दक्षिण आशियातील पत्रकारांची देवाणघेवाण व समन्वयातून विभागीय संवाद व शांतता प्रस्थापित करता येईल. त्यासाठी सार्क संघटनेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांवर सातत्याने दबाव आणला पाहिजे,'' असे तो परिषदातून मांडीत असे. त्याचं संभाषण असो, की भाषण, त्यातून त्याची ओघवती भाषा, कोपरखळ्या काढण्याची, कधी फिरक्‍या घेण्याची ढब खिळवून ठेवी. हातात टिपण असलं, तरी उत्स्फूर्त बोलणं त्याला आवडायचं.


संपादकपद सोडल्यानंतर दिल्लीतील मुनिरका भागात त्यानं "आशिया पॅसिफिक कम्युनिकेशन असोसिएटस (ऍपका)' या दृक्‌श्राव्य चॅनेलवजा कंपनीची स्थापना केली. तळघरातील या कार्यालयात महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा करण्यासाठी तो बोलवायचा. देशविदेशांतील घडामोडींवरही ऍपकाचे कार्यक्रम सातत्याने चालत. सूत्रसंचालन दिलीप करीत असे. त्या वेळी अनिकेंद्र नाथ सेन ऊर्फ "बादशहा सेन' त्याचा सहकारी होता. दिलीप व बादशहा ही जोडी बरेच दिवस दिल्लीतील पत्रकारितेच्या क्षेत्रात गाजली होती.


त्या काळात वर्तमानपत्राचा खप वाढावा म्हणून प्रत्येक इंग्रजी दैनिकात चढाओढ चालली होती. मुंबईच्या एका इंग्रजी दैनिकाने अंकाबरोबर टूथपेस्ट व खरेदीसाठी कूपन्स देण्याची टूम काढली होती. वाचकांना आकर्षित करण्यासाठी अन्य वृत्तपत्रे काही आमीषे दाखविण्याचा विचार करीत असता, संपादक दिलीप व "द टाइम्स ऑफ इंडिया'चे अध्यक्ष समीर जैन यांची भेट झाली. त्या वेळी, ""आपण काय करावयास हवे,'' असे जैन यांनी विचारता, त्यांची फिरकी घेत दिलीप म्हणाला, ""प्रतिस्पर्ध्यांच्या पुढं जायचं असेल, तर सकाळी अंकाबरोबर पिशवीचं दूध देण्यास हरकत नाही.'' ""त्यावर आम्ही दोघेही कितीतरी वेळ हसत होतो,'' असं दिलीप मला म्हणाला होता. (कै.) गिरीलाल जैन या प्रथितयश संपादकाच्या कारकिर्दीनंतर दिलीपनं संपादकपदाची सूत्रे हाती घेतली. त्या काळात त्याच्या लेख व संपादकीयमधील परखड मतमांडणीमुळे तो लक्ष वेधून घेत असे. 1978 ते 1986 दरम्यान पॅरिस व बॅंकॉकमध्ये त्याने युनेस्कोसाठी काम केलं. तसेच भारत व फ्रान्समधील संबंध अधिक दृढ व्हावे, यासाठी केलेल्या कार्याबद्दल 2002 मध्ये त्याला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान "लीजन ड ऑनर' बहाल करण्यात आला. मिळालेल्या मान सन्मानामुळे त्याच्यात कधी आढ्यता आली नाही. भेटला की दिलखुलास बोलणार, राजकीय नेत्यांचे चिमटे काढणार. एकदा दिल्लीतील त्याच्या घरी गेलो असता, दिलीप एकाएकी म्हणाला, "मी दिल्ली सोडायचं ठरवलंय.' मला कळेना. म्हटलं, "कारण काय,' तर तो म्हणाला, "बसं झालं आता, आता पुण्याला जायचं. अन्‌ तिथून सारं काही करायचं, वाचन लिखाण हे कुठूनही राहून करता येतं. परदेशात राहून भरघोस कार्य केलेल्या मराठी माणसांविषयी मला लिहायचंय. उदा. मेक्‍सिकोत राहिलेले पांडुरंग सदाशिव खानखोजे. आणखीही काही व्यक्ती डोळ्यांसमोर आहेत. "सकाळ'ने काही वर्षांपूर्वी दिल्लीहून प्रसिद्ध केलेल्या "इंडिया अँड ग्लोबल अफेअर्स' या नियतकालिकाचा संपादक होता.


काश्‍मीरसंबंधीच्या विशेष समितीवर त्याने उत्तम काम केले. तत्कालीन यूपीए सरकारने त्यांच्या शिफारशींची दखल घेतली नाही, याची दिलीपला फार खंत होती. 'अंडर हर स्पेल - रॉबर्टो रोझेलिनी इन इंडिया' या त्याच्या पुस्तकात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इटालियन चित्रपट निर्माते रोझेलिनी व सोनाली सेनगुप्ता यांचे संबंध व भावबंध यांचे हृद्य वर्णन असून, यांच्यावर मुंबईच्या रुपेरी दुनियाने उठवलेली राळ व पंडित नेहरू व रोझेलिनी यांची मैत्री यांचा प्रदीर्घ ऐतिहासिक आलेख आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com