स्लेजिंगला विजयानेच उत्तर द्यावे

स्लेजिंगला विजयानेच उत्तर द्यावे

सलग सहा कसोटी मालिका जिंकून आणि कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवून भारतीय संघाने चांगली प्रगती केली आहे. पुढील आठवड्यात सुरू होणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका तुल्यबळ असेल. ऑस्ट्रेलिया म्हटले, की स्लेजिंग अर्थात शेरेबाजी आलीच. कारण अशाप्रकारे प्रतिस्पर्ध्यांवर दडपण ठेवण्यात ऑस्ट्रेलिया वाकबगार आहे. जेव्हा जेव्हा दोन देशांमध्ये क्रिकेट मालिका होत असते, तेव्हा तेव्हा ऑस्ट्रेलिया स्लेजिंगच्या अस्त्राचा वापर करत असते. ते त्यांच्या रक्तातच आहे. या आधीच्या काही दौऱ्यांचा इतिहास पाहिला तर ऑस्ट्रेलियाने या मार्गाचा वापर केलेला दिसून येतो. त्यामुळे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेचा विचार करता ऑस्ट्रेलिया स्लेजिंग करणार हे उघड आहे. आता प्रश्न येतो आपण याचा सामना कसा करायचा? ‘अरे ला कारे’ असे उत्तर देण्यात आपली ऊर्जा खर्च करण्यापेक्षा शतकाने किंवा विजय मिळवूनच त्यांना प्रत्युत्तर देता येईल. आपल्या खेळाडूंची कामगिरी पाहता ते चांगले सक्षम आहेत. कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी या अगोदरही ऑस्ट्रेलियाच्या या प्रकाराचा सामना केलेला आहे. त्यांना त्याचा अनुभव असल्याने मैदानावर कसे उत्तर द्यायचे याची तयारी त्यांनी केलेली असेलच.

नुकताच आपल्याविरुद्ध ०-४ अशी हार पत्करलेला इंग्लंडचा संघही समतोल होता. पण ऑस्ट्रेलियाचे आव्हान वेगळेच असेल. ते कधीही सहजासहजी हार स्वीकारत नाहीत, अखेरपर्यंत लढण्याची जिगर ते नेहमीच दाखवतात. खरे तर या वेळी त्यांचे अस्तित्व पणास लागणार आहे. कारण आशिया खंडात त्यांनी सलग नऊ कसोटी गमावल्या आहेत. स्टीव वॉसारख्या मातब्बर कर्णधारालाही भारतात मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे या वेळी ते सर्वतोपरी प्रयत्न करणार हे उघड आहे.

भारतीय संघाची ताकद आणि ऑस्ट्रेलियाची प्रवृत्ती पाहता ही मालिका चुरशीची होईल. आपल्याला ही मालिकाही जिंकून वर्चस्व सिद्ध करायचे आहे, परंतु त्यासाठी फिरकीचा आखाडा तयार करू नये. शेवटी क्रिकेट हा खेळ महत्त्वाचा आहे. फलंदाजी आणि गोलंदाजांचा समान संघर्ष व्हायला हवा. प्रेक्षकांसाठी ती दर्जेदार क्रिकेटची पर्वणी ठरायला हवी. सहा सहा क्षेत्ररक्षक उभे करून फलंदाजाला घेरणारे चित्र पाहायला प्रेक्षकांना आवडत नाही. समतोल बाउन्स असलेल्या खेळपट्ट्या हव्यात. वेगवान आणि फिरकी गोलंदाजही यश मिळवतील आणि फलंदाजही फटकेबाजी करेल असा खेळ सर्वांनाच पाहायला आवडतो.

आपल्यासाठी विराट कोहली हा हुकमी एक्का असेल आणि त्याचा सध्याचा फॉर्म अतुल्य आहे. कर्णधार म्हणून सलग सहा मालिका जिंकत असताना तो फलंदाज म्हणून जवळपास एका कसोटी सामन्याआड द्विशतक करत आहे, हे संघासाठी आणि त्याच्यासाठी गौरवास्पदच आहे. कर्णधाराला असा चांगला सूर गवसला असेल, तर संघालाही लय सापडते आणि त्यामुळे प्रत्येकाचा विचार सकारात्मक होत असतो. परिणामी कोणत्याही परिस्थितीत कर्णधार बिनधास्तपणे निर्णय घेऊ शकतो. विराटला रोखण्यासाठी किंवा त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ‘माईंड गेम’चा वापर करणार. २०१५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही तसा प्रयत्न झाला होता, तरीही त्या मालिकेत त्याने चार शतके केली होती. विराटला डिवचले की तो अधिक तडफेने खेळतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची ही चाल त्यांच्यावर उलटू शकते.   
आपल्या संघाकडे नजर टाकली तर त्रिशतक केल्यानंतरही करुण नायर राखीव खेळाडूत राहतो यावरून आपल्या संघातील स्पर्धा लक्षात येते. गोलंदाजीत अजून थोडी अचूकता यायला हवी. अर्थात अश्‍विनचे नाणे खणखणीत वाजत आहे. सर्वात जलद अडीचशे कसोटी विकेट मिळवण्याचा त्याने विक्रम केला आहे. विराटप्रमाणे अश्‍विनवर आपली भिस्त असेल. वेगवान गोलंदाजांनाही रिव्हर्स स्विंगचा प्रभावी वापर करावा लागेल. या प्रयत्नांना चपळ क्षेत्ररक्षणाची प्रामुख्याने स्लिपमधील झेल पडण्याची साथ मिळणे आवश्‍यक आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आपण पाहिले तर स्लिपमध्ये काही झेल सुटले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध या चुका होऊ नयेत. शेवटी ‘कॅचेस विन मॅचेस’ हे उगाच म्हटले जात नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com